कोणत्याही विषयाची तयारी करताना, त्यात कुठे आणि कशा अडचणी येणार आहेत, हे लक्षात घेऊन तयारी केल्यास ती अधिक उत्तम होते. या लेखात आपण निबंध लेखनाविषयीचे अजून काही मुद्दे पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने निबंध लिखाणाला सुरुवात केल्यानंतर प्रभावी सुरुवात आणि शेवट कसा करावा हे आपण पाहणार आहोत. तसेच एकंदरीत निबंध लेखनासाठी आवश्यक भाषा व शैली याचा विचारही आपण करणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रस्तावनेचा परिच्छेद –

प्रस्तावनेच्या परिच्छेदाने वाचणाऱ्याचे लक्ष वेधून घेतले गेले पाहिजे. दिलेल्या विषयाची प्रमुख भूमिका निश्चित करणे आणि प्रमुख मुद्दा ठामपणे मांडणे हे या परिच्छेदाचे महत्त्वाचे काम आहे. पुढे येणाऱ्या गुंतागुंतीच्या लेखनाला दिशा देणारा हा परिच्छेद आहे. वाचणाऱ्याचे लक्ष वेधून घेणारी वाक्ये येथे असली पाहिजेत. अशा प्रकारची सुरुवात खालीलपकी एखादी मांडणी करून केली जाऊ शकते.

  • माहितीचा रंजक नमुना
  • आश्चर्यकारक माहिती
  • विषयास लागू असणारा सुविचार
  • आपल्या आजूबाजूला असणारा पण सहज लक्षात न येणारा विरोधाभास
  • अवघड संकल्पनेचे स्पष्टीकरण
  • एखाद्या घटनेचे थोडक्यात वर्णन
  • विचार करण्यास प्रवृत्त करणारा प्रश्न

थेट विषय प्रवेश

साधारणत: ८०० शब्दांपेक्षा कमी शब्दात लिहिलेल्या निबंधाकरता खूप मोठी प्रस्तावना आवश्यक नाही. परंतु १२०० शब्दांचा निबंध लिहीत असताना सविस्तर प्रस्तावनेतून निबंधाची भूमिका स्पषष्ट करणे शक्य होते. अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतर इतर स्पष्टीकरणांवर वेळ अथवा शब्द वाया न घालवता प्रमुख मुद्दय़ांच्या मांडणीला सुरुवात करावी. आपण लिहीत असलेल्या विषयांच्या संदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांचा दाखला देऊन मूळ लिखाणाला सुरुवात करता येते. मात्र अशी सुरुवात करत असताना तोचतोचपणा टाळावा. तसेच ‘सध्या क्ष हा अतिशय कळीचा प्रश्न बनला आहे..’ किंवा ‘मनुष्य कायमच क्ष प्रश्न सोडवण्यात व्यग्र आहे..’ अशा ठोकळेबाज वाक्यांचा वापर टाळावा. इतकी व्यापक मांडणी जवळपास कोणताही महत्त्वाचा मुद्दा कवेत घेऊ शकते, म्हणूनच आपली सुरुवात ही अचूक भूमिका असणाऱ्या वाक्यांनी व्हावी.

अतिशय व्यापक- गुन्हेगारी ही सर्वच काळातील एक मोठी समस्या आहे.

मुद्देसूद- बालगुन्हेगारांच्या शिक्षेची तीव्रता व त्यासंबंधीच्या समस्यांनी सध्याचे चर्चा विश्व व्यापले आहे. गेल्या काही वर्षांतील बालगुन्हेगारांच्या वाढत्या नोंदींमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

निष्कर्ष

निबंधाच्या शेवटचे परिच्छेद प्रभावी असणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. निष्कर्षांचे परिच्छेद डौलदार भाषेत, योग्य शैलीचा वापर करून लिहावेत. एखादा संस्मरणीय विचार, चलाख तार्किक युक्तिवाद किंवा सामाजिक परिप्रेक्ष्यातील प्रश्न सोडवण्यासाठीचा कृतीक्रम या किंवा अशा मुद्दय़ांनी निबंधाचा शेवट करावा. निबंध वाचून पूर्ण झाल्यानंतर वाचणाऱ्याच्या मनात कोणती छाप असावी असे आपल्याला वाटते? त्यास धरून निष्कर्ष लिहावा.

निष्कर्षांच्या परिच्छेदामधील आधी लिहिलेले मुद्देच परत लिहिण्याने निष्कर्ष प्रभावी होत नाही. असे केल्याने निष्कर्ष एकसुरी व निष्प्रभ ठरतो. प्रभावी शेवट करण्यासाठी वरती दिलेल्या मुद्दय़ांव्यतिरिक्त विषयाचे महत्त्व पुन्हा एकदा, अर्थपूर्ण शब्दांची योजना करून वाचणाऱ्याच्या लक्षात आणून दिले जाऊ शकते.

निष्कर्षांचा परिच्छेद आटोपशीर असावा. २० ओळींपेक्षा मोठा निष्कर्ष लिहिण्याचे टाळावे. अतिशय हुशारीने तुम्ही विषयाच्या गुंतागुंतीतून बाहेर पडत आहात, अशा भूमिकेतून निष्कर्ष लिहिला जाणे अपेक्षित आहे. पूर्णत: नवीन संकल्पना, विचारांची साखळी या परिच्छेदात मांडू नये. परंतु असे करत असताना निबंधातील मुद्दे पुन:पुन्हा देण्याचे टाळावे. अशाप्रकारचा निष्कर्षांचा परिच्छेद लिहिण्यासाठी पुरेसा सराव अत्यावश्यक आहे.

भाषा व शैली

व्याकरणाच्या दृष्टीने योग्य, सुटसुटीत व प्रभावी वाक्ये कोणत्याही चांगल्या निबंधाचे महत्त्वाचे घटक असतात. सुटसुटीत भाषा म्हणजे बोलीभाषा नाही. यूपीएससीच्या परीक्षेमध्ये दिल्या जाणाऱ्या निबंध विषयांवर लेखन करताना मजकुराबरोबरच भाषेचीही प्रगल्भता दिसणे आवश्यक आहे.

एखाद्या मुद्दय़ाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कशाप्रकारे भर द्यावा, दोन वाक्यांमधील तर्कसंगती स्पष्ट  करण्यासाठी कोणते शब्द वापरावेत, आपल्याजवळील माहितीचा वापर करून ठामपणे मत मांडत असताना अनावश्यक अधिकाराचा सूर कसा टाळावा या सर्व गोष्टी योग्य भाषेच्या वापरामधून साध्य होतात.

प्रगल्भ विचार व भाषा यांचा वापर म्हणजे केवळ जड व मोठय़ा शब्दांची खिरापत नाही. ज्या शब्दांच्या अर्थाबद्दल आपल्याला खात्री नाही, असे शब्द वापरणे टाळावे. तसेच फार मोठमोठे, अलंकारिक शब्द वापरल्यामुळे आपले लिखाण दिखाऊ होत नाही ना याची काळजी घ्यावी. आपले लिखाण जर नसर्गिकरीत्या गुंतागुंतीचे व अनेक पातळ्यांवर विश्लेषण करणारे असेल तर, शब्दांचा वापर आपोआपच अधिक प्रगल्भ होत जातो.

प्रत्येक वाक्य छोटे व सुटसुटीत असेल याची खबरदारी घ्यावी. वाक्य मोठे झाल्यास योग्य ठिकाणी स्वल्पविराम, अर्धस्वल्पविराम, विसर्ग चिन्हांचा योग्य वापर करावा. संपूर्ण अर्थबोध होऊ शकणार नाही इतकी मोठी वाक्ये करण्याचे मुळातच टाळावे. कोणतेही अर्थपूर्ण लेखन करण्याकरिता वरील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Essay writing problems upsc exam
First published on: 01-03-2018 at 01:06 IST