मागील लेखामध्ये आपण भूगोल या विषयाचे स्वरूप तसेच या विषयामधील विविध घटक याची तपशीलवार माहिती घेतली. प्रस्तुत लेखामध्ये प्राकृतिक भूगोल या अभ्यासघटकाची पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने कशी तयारी करावी, याचा आढावा घेणार आहोत. अभ्यासक्रमामध्ये भारत व जगाचा भूगोल अशी सर्वसाधारण विभागणी केली असल्याने जगाचा व भारताचा प्राकृतिक भूगोल अभ्यासणे श्रेयस्कर ठरते. सर्वप्रथम प्राकृतिक भूगोलामध्ये अंतर्भाव असणाऱ्या घटकांची माहिती करून घेऊ या. प्राकृतिक भूगोलांमध्ये मुख्यत्वे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविक भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल यासारख्या घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांविषयीच्या मूलभूत संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े याविषयी एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकातून माहिती करून घ्यावी. याकरिता ‘Fundamentals of Physical Geography (XI)’, ‘India Physical Environment’ या पुस्तकांचा आधार घेता येईल. या पुस्तकांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्राकृतिक भूगोल या घटकाचे सरळ व सोप्या भाषेत आकलन करून घेऊ शकते. या घटकाविषयी अधिक माहिती घेण्याकरिता ‘Certificate Physical and Human Geography’ (By Goe cheng Leong) हे पुस्तक व तयारीकरिता पुरेसा वेळ उपलब्ध असल्यास ‘Fundamentals of Physical Geography’ (By Majid Husain) हा ग्रंथही उपयुक्त ठरेल.
उपरोल्लिखित संदर्भसाहित्य अभ्यासताना या विषयाच्या स्वत:च्या नोट्स तयार केल्यास परीक्षेपूर्वी व दरम्यान कमीत कमी वेळामध्ये हा घटक अभ्यासणे शक्य होते. नोट्स तयार करताना हा घटक आपण पूर्व परीक्षेकरिता अभ्यासणार आहोत हे भान ठेवावे. म्हणजे नोट्समध्ये समर्पकता व महत्त्वाच्या मुद्दय़ांचा अंतर्भाव करणे शक्य होईल. याकरिता गतवर्षीच्या परीक्षेतील प्रश्नांचे आकलन करून घेणे महत्त्वपूर्ण ठरते.
२०११ ते २०१६ या कालावधीमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊ या. २०११मध्ये जागतिक हवामानासंबंधी घटना ला-नीना आणि एल-निनोविषयी प्रश्न विचारला गेला. ऑस्ट्रेलियामध्ये अलीकडे आलेला पूर ला-नीनामुळे होता असा संशय व्यक्त केला गेला.
ला-नीना व एल-निनो हे एकमेकांपासून कसे वेगळे आहेत?
(१) ला-नीना विषुवृत्तीय हिंदी महासागरातील समुद्राच्या असाधारण थंड तापमानाने दर्शविला जातो तर एल-निनो प्रशांत महासागरातील असाधारण गरम तापमानाने दर्शविला जातो.
(२) एल-निनोचा भारतातील दक्षिण-पश्चिमी मान्सूनवर प्रतिकूल प्रभाव पडतो. परंतु ला-नीनाचा मान्सून हवामानावर कुठलाही प्रभाव पडत नाही.
असे पर्याय देण्यात आले होते.
याबरोबरच, आफ्रिकी व युरेशियन वाळवंटी पट्टे निर्माण होण्याची मुख्य कारणे कोणती?
(१) हे प्रदेश हाय-प्रेशर सेलमध्ये स्थित आहेत.
(२) हे प्रदेश उष्ण-सागरी प्रवाहांच्या प्रभावक्षेत्रामध्ये येतात, असा प्रश्न विचारला गेला.
२०१२मध्ये खाली दिलेले कारक विचारात घ्या –
(१)पृथ्वीचे परिभ्रमण
(२)वायू दाब व हवा
(३)महासागरीय पाण्याची घनता
(४)पृथ्वीचे परिक्रमण
‘वरीलपकी कोणते कारक महासागरीय प्रवाहांना प्रभावित करतात.’ असा सागरशास्त्रावर आधारित प्रश्न आला होता.
२०१३
खंडाच्या अंतर्गत प्रदेशातील वार्षकि तापमान किनारी क्षेत्राच्या तुलनेत अधिक असते याची कारणे काय?
(१)जमीन व पाण्याच्या तापमानातील अंतर.
(२)खंड व महासागर यातील उंचीचा फरक.
(३)खंडाच्या अंतर्गत भागामध्ये वेगवान वाऱ्यांची उपस्थिती.
(४)किनारी भागाच्या तुलनेत अंत:स्थ भागामध्ये जोरदार पाऊस.
२०१४
खालीलपकी कोणती/त्या घटनेने जिवांच्या विकासाला प्रभावित केले असेल?
(१)खंडीय विस्थापन (२) हिमानी चक्र
२०१५
महासागर आणि सागरांमध्ये भरती-ओहोटीचे कारण काय?
(१)सूर्याचे गुरुत्वीय बल
(२)चंद्राचे गुरुत्वीय बल
(३)पृथ्वीचे अपकेंद्रीय बल
उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न प्राकृतिक भूगोलावर विचारण्यात आलेले आहेत. प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, हवामान सागरशास्त्रांशी संबंधित घटकांवर प्रश्न आलेले आहेत. तसेच या विषयाचे पारंपरिक ज्ञान, महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडींवर अधारित प्रश्न विचारण्यात आले आहेत. म्हणून प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप पारंपरिक असले तरी चालू घडामोडींचा अभ्यास करावा लागतो. महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्न विचारण्याचा कल हा केव्हाही बदलू शकत असल्याने हा घटक र्सवकष पद्धतीने अभ्यासणे आवश्यक ठरते.