ऑफिसच्या पहिल्या वर्षांत काही यशस्वी सहकाऱ्यांकडे बघितले की, खरेच कौतुक वाटते. त्यांची कार्यक्षमता, शांतपणे, सहजपणे कुठलाही ताण न घेता विविध प्रकारची कामे एकाच वेळी हाताळायचा अष्टावधानीपणा बघितला की आपल्याच मनावर दडपण येते. कसे काय हाताळत असतील अशी कामे व तीसुद्धा दिलेल्या कालमर्यादेत?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वेळ. तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब, वेळेची उपलब्धता सगळ्यांना सारखीच असते. पण त्याचा उत्तम विनियोग कसा करायचा हे मात्र प्रत्येकाच्या वैयक्तिक सवयी व क्षमतेवर अवलंबून असते. जर वेळेच्या नियोजनाची जादू कळली तर तुम्हीही तुमच्या यशस्वी सहकाऱ्यांप्रमाणे कार्यक्षम व्हाल. मात्र त्यासाठी न कंटाळता सराव करायला हवा.

वेळेच्या गैरव्यवस्थापनेचे इशारे

तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अगदी वक्तशीर आहात, पण खाली दिलेल्या कारणांपैकी काही जर दिसत असतील तर मात्र पुनर्विचार करायला हवा.

* एखादे काम करायची किंवा कुणाला भेटायची वेळ पाळणे जमत नाही.

* प्रत्येक काम करताना धावपळ होणे.

* अकारण संयम सुटणे किंवा चिंता वाटणे; स्वत:च्या अपयशासाठी दुसऱ्याला दूषणे देणे.

* कामे करताना साध्य काय आहे हे पटकन उमगत नाही, त्यामुळे काम करायला वेळ तरी लागणे किंवा चुकीच्या पद्धतीने काम होणे.

*  ‘महत्वाचे’ काम कुठले आणि ‘तातडीने’ करायचे काम कुठले यांचा प्राधान्यक्रमच न कळणे; त्यामुळे कमी महत्त्वाचे काम तातडीने केले जाणे आणि खरे महत्त्वाचे काम मागे पडणे.

* चालढकल व आळशीपणा : वेळ असूनसुद्धा काम करण्याची चालढकल करणे व त्यामुळे कामात निर्थक विलंब होणे.

* वेळेच्या गैरव्यवस्थापनेमुळे सतत सुमार कामगिरी होणे, निराश वाटणे व काम टाळायची इच्छा निर्माण होणे.

* कुठलेही निर्णय घेताना उपलब्ध विकल्प तर्कनिष्ठतेने निवडता न येणे, विचारांची गर्दी झाल्यामुळे गोंधळून जाणे.

* स्वत:ची कामे सोडून लोकांची कामे उगीचच करत बसणे.

तुमच्या वेळेची आखणी

ऑफिसच्या या पहिल्या वर्षांत वेळ कसा कारणी लावावा याबद्दल फुकट सल्ले देणारे खूप भेटतील, पण तुमच्या वेळेचे महत्त्व तुमच्याइतके दुसऱ्या कुणालाच माहिती नाही. त्यामुळे वेळेचा उत्तम विनियोग करण्यासाठी खालील उपाययोजना करा –

* छोटय़ा छोटय़ा गोष्टींची प्रतिक्षिप्त क्रिया करा – म्हणजे सकाळी वेळेवर उठून ऑफिसला वेळेवर पोहोचण्यापर्यंत सर्व क्रिया आपोआप घडल्या पाहिजेत; त्या कशा कराव्यात यात विचार करत वेळ घालवू नका. ऑफिसमधील नित्यकर्मेसुद्धा प्रतिक्षिप्त झाली पाहिजेत, म्हणजे विशेष कामांच्या आखणीसाठी वेळ मिळेल.

* सर्व कामांची आदल्या दिवशीच यादी करून त्यांची ‘महत्त्वाचे’ व ‘तातडीचे’ याप्रमाणे प्राधान्यक्रम लावा. ही कामे क्रमवारीप्रमाणे किती वेळात पूर्ण होतील याचा अंदाज बांधा.

* सर्व कामे छोटय़ा छोटय़ा तुकडय़ांत विभागून घ्या. यामुळे मोठय़ा कामाचे दडपण कमी होते व कामांचे छोटे भाग पूर्ण करायला सोपे जाते.

*  हे सर्व करताना घडय़ाळाचे भान ठेवा. एखाद्या कामाला किंवा त्याच्या भागाला जास्त वेळ लागत असेल तर त्याचे कारण शोधून त्याच्यावर त्वरित उपाययोजना करा.

* कामामध्ये अडचण आली तर नि:संकोचपणे वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांची मदत घ्या.

* तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामात गुंतलेले असताना कुणी तुम्हाला दुसरे काम सांगितले किंवा निर्थक बडबड करून एकाग्रता भंग करू लागला तर ठामपणे त्या व्यक्तीला ‘नाही’ म्हणायला शिका. भिडस्तपणे कशालाही / कुणालाही ‘हो’ म्हणायची सवय सोडून द्या.

* वेळेचे उत्तम व्यवस्थापन ऑफिसच नव्हे तर दैनंदिन जीवनातही अत्यावश्यक असते. प्रत्येक क्षणाचा उपयोग करायला शिका. वेळेच्या व्यवस्थापनाची क्लृप्ती तुम्हाला सरावानेच उमजेल. त्यामुळे ऑफिसच्या पहिल्या वर्षांतच त्याची सुरुवात करा आणि पाहा कशी जादू झाल्यासारखी तुमची कामगिरी चमकेल ते!

dr.jayant.panse @gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of time management for career success
First published on: 18-03-2017 at 03:54 IST