प्रशासन प्रवेश
सामान्य अध्ययन पेपर १ मधील ‘भारतीय समाजातील ज्वलंत मुद्दे’ या अभ्यासघटकांतर्गत भारतीय समाजाचे अभिन्न अंग असलेल्या ‘कुटुंबपद्धती’ या उपघटकाचा अंतर्भाव केलेला आहे. कुटुंबरचनेचा अभ्यास करताना ती एक ‘सामाजिक संस्था’ आहे आणि इतर सामाजिक संस्थांशी कुटुंबसंस्थेचे नाते काय प्रकारचे राहिले आहे याही बाबी ध्यानात घ्याव्यात. कुटुंबसंस्था आकलनाच्या कक्षेत येण्यासाठी जात, वर्ग, धर्म, विवाह, रीती-परंपरा या संस्थांच्या साथीने समजून घ्यावी लागते. भारतीय समाजात कुटुंबरचनेचे विभिन्न प्रकार अस्तित्वात आहेत. त्यात वेळोवेळी बदल घडून येतात. अभ्यासाचा एक उपघटक म्हणून पाहता कुटुंबसंस्थेत खोलवर जवळीकता आणि जिव्हाळा असतो. दाट स्नेह आणि काळजी यांचे तिथे अस्तित्व असते. कुटुंबात बाईला मारहाण, संपत्तीवरून भावाभावातील भांडणे तसेच वाईट पद्धतीचे कायद्यांचे वाद हे चित्र एका बाजूला दिसत असले तरीही त्याग आणि बलिदान, परस्परांची सुरक्षितता आणि काळजी हीसुद्धा कुटुंबसंस्थेची
मूलभूत आणि महत्त्चाची वैशिष्टय़े पाहायला मिळतात.
स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरची काही दशके संयुक्त कुटुंबपद्धती आवर्जून दृष्टीस पडते. हे एका बाजूला सत्य असले तरीही वसाहतिक काळापासून शहरीकरण आणि औद्योगिकीकरण या आíथक प्रक्रियेतून संयुक्त कुटुंबरचनेवर व्यापक परिणाम घडून आला. वसाहतकाळापासून आधुनिक बनत चाललेली कुटुंबरचना संयुक्ततेकडून विभक्त कुटुंबपद्धतीकडे वळलेली दिसते. याची कारणे किंवा चलघटक अनेक असले तरी प्रामुख्याने यामध्ये आíथक कारणांचा/ चलघटकांचा वरचष्मा राहिलेला दिसतो.
परीक्षेच्या दृष्टीने विचार करू पाहता, मागील वर्षी मुख्य परीक्षेत या अभ्यासघटकांतर्गत असलेल्या संयुक्त कुटुंबरचनेवर प्रश्न विचारलेला होता. ‘संयुक्त कुटुंबाची जीवनशैली सामाजिक मूल्याऐवजी आíथक चलघटकांवर अवलंबून आहे, यावर चर्चा करा.’ प्रस्तावनेत सांगितलेली आíथक प्रक्रिया नीट समजून घेतली तरच या विधानात्मक प्रश्नाचे उत्तर देता येईल.
भारतीय समाज हा प्रामुख्याने कृषिप्रधान समाज राहिलेला आहे. खेडे ही त्याची पृष्ठभूमी राहिलेली आहे. यामध्ये संयुक्त कुटुंब हे एकक प्रधान भूमिकेत वावरत होते. त्या जोडीला संयुक्त कुटुंबाला जात-वर्गीय संरचनेचासुद्धा आधार होता. संयुक्त कुटुंबे प्रामुख्याने पितृसत्तात्मक राहिलेली आहेत. कमीतकमी तीन पिढय़ांचे त्यात अस्तित्व कायम राहिलेले आहे. त्यात बुजुर्ग पुरुष कुटुंबाचा कर्ता असतो. कर्त्यांचे प्रत्येक निर्णय कुटुंबाच्या हितासाठी असतात असे मानून कुटुंबातील सर्व सदस्य तो निर्णय पाळतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह मुख्यत: शेती असल्याने संयुक्त कुटुंबरचना दीर्घकाळापर्यंत टिकली. सर्व सदस्य एकत्रित राहण्याने आíथक बचतीचे लाभ पदरात पडू लागतात. वंशवेल, खानदान, पितृसत्ता आणि सामाजिक दर्जा या सामाजिक मूल्यांसाठी संयुक्त कुटुंबरचना महत्त्वाची मानली जात होती.
ही एक अनिवार्य वस्तुस्थिती असली तरी ब्रिटिशांच्या शहरीकरणाच्या आणि औद्योगिकीकरणाच्या धोरणाने रोजगाराचे आणि उत्पन्नाचे अन्य पर्याय समोर आले. त्यामुळेही कुटुंबांचे किंवा त्यातील सदस्यांचे स्थलांतर घडून आले. या प्रक्रियेतून संयुक्त कुटुंबरचनेला तडे जाऊ लागले. स्वातंत्र्यानंतर शहरीकरणाचे धोरण कायम राहिल्याने संयुक्त कुटुंबरचनेत मोठा बदल घडून येत गेला. रोजगार, शिक्षण तसेच जातव्यवस्थेतील वैगुण्यामुळे खेडय़ातील लोकांचे शहरांकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढत गेले. संयुक्त कुटुंबातील काही सदस्य नोकरी निमित्ताने शहरात आश्रयाला आले. अशा परिस्थितीत संयुक्त कुटुंबरचेनेचे आधार आणि गुणवैशिष्टय़ांमध्ये बदल घडून आले. थोडक्यात, सामाजिक मूल्यांऐवजी संयुक्त कुटुंबावर आíथक घटक प्रभाव टाकू लागले.
अशा परिणामातून साहजिकच विभक्त कुटुंबपद्धती उदयाला येऊन या कुटुंबांची कक्षा पती-पत्नी आणि त्यांच्या अपत्यांपर्यंत मर्यादित बनली. कुटुंबातील महिला सदस्य अर्थार्जनासाठी बाहेर पडू लागल्याने संयुक्त कुटुंबाच्या मर्यादा समोर आल्या. परिणामी, विभक्त कुटुंबाचे प्रमाण वरचेवर वाढत गेले. त्यातून शहरे विभक्त कुटुंबरचनेची मूलभूत आधार बनली. शहरातील मध्यमवर्गामध्येही विभक्त कुटुंबरचनेत मोठी वृद्धी झालेली दिसून येते. परीक्षेच्या दृष्टीने विचार करता कुटुंबसंस्थेचे संक्रमण आणि ते घडण्यात ज्या घटकांचा हातभार लागला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.
जागतिकीकरणाच्या रेटय़ातून कुटुंबातील सदस्य उपभोगाच्या संस्कृतीत अडकले आहेत, अशी कुटुंबे वर्तमान बाजारव्यवस्थेचे ग्राहक या भूमिकेत उतरू लागली. गरजा आणि हाव यांच्या मिश्रणातून अधिक अर्थार्जन कमावण्याकडे कल वाढू लागला. त्यातूनही कुटुंबरचनेला तडे जाऊ लागले. चंगळवादाने कुटुंबसंस्थेवर काय प्रकारचे परिणाम केले याचीही उत्तरे मिळवणे आवश्यक आहे.
संयुक्त कुटुंबरचनेकडून विभक्त कुटुंबरचनेकडे झालेल्या स्थित्यंतरातून अनेक मुद्दे निर्माण झाले. विभक्त कुटुंबात आई-वडील नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडणे अनिवार्य असल्याने लहान मुलांचा सांभाळ ही मोठी जिकिरीची समस्या बनली. वृद्धाश्रमांची संख्या वाढली. शहरीकरण आणि विभक्त कुटुंबे यांच्या आंतरसंबंधावर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
दुसरी समस्या म्हणजे निवाऱ्याची जागा मर्यादित असल्याने आणि कुटुंबाचा खर्च वाढण्यातून घरातील वृद्धांचे राहणीमान प्रभावित झाले. कुटुंबातील कमावत्या सदस्यांच्या स्वयंकेंद्री वृत्तीमुळेही कुटुंबातील वयोवृद्धांची आबाळ होऊ लागली. त्यातून समाजामध्ये त्यांच्यासाठी वृद्धाश्रमे उदयाला आली. या धर्तीवर वृद्धांची हेळसांड थांबवण्यासाठी सरकारने कोणती धोरणे आखली आहेत याचाही विचार करावा.
कुटुंबसंस्थेच्या संक्रमणातून ‘जनरेशन गॅप’ नावाची समस्या समोर आली. त्यातून दोन पिढय़ांतील अंतर अधिक वाढले. धारणा एकसारख्या राहत नाहीत. दृष्टिकोनामध्ये फरक पडत जातो. अशी विविध लक्षणे असलेल्या ‘जनरेशन गॅप’चा अर्थ लावणे, ती निर्माण होण्याचे आधार तपासणे तसेच या ‘जनरेशन गॅप’चे कोणत्या स्वरूपातील परिमाण समोर येतात याचाही अभ्यास अनिवार्य ठरतो.
भारतातील कुटुंबसंस्थेचा परिचय करून घेण्यासाठी कुटुंबपद्धतीचे पायाभूत घटक आणि तिची गुणवैशिष्टय़े काय होती आणि त्यात वेळोवेळी कसा फरक पडत गेला, तसेच त्यात कोणते बदल घडून आले, बदलाला जबाबदार असणारी प्रक्रिया आणि चलघटक कोणते आहेत यालाही स्पर्श करावा लागेल. त्या दृष्टीने किमान पातळीवर संकल्पनात्मक अभ्यास ‘एनसीईआरटी’ इयत्ता बारावी समाजशास्त्राच्या क्रमिक पुस्तकातून करता येऊ शकतो. ती मुख्यत: ‘इंडियन सोसायटी’ आणि ‘सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया’ या नावाने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु त्यापुढे जाऊन काही अवांतर संदर्भ पाहावे लागतील; जेणेकरून वर्तमान कुटुंबपद्धतीचे बदललेले संदर्भ आणि तिचे समग्र चित्र समोर येऊ शकेल.

Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
foreign women prostitution, prostitution Kharghar,
वेश्याव्यवसायप्रकरणी परदेशी महिलांवर कारवाई
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती
pune digitization, digitization social and political documents pune
पुण्यातील दीडशे वर्षांच्या सामाजिक-राजकीय दस्तऐवजाचे ‘डिजिटायझेशन’; पुणे सार्वजनिक सभेचा पुढाकार, निधीची मात्र चणचण