अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण योजना

या योजनेची अंमलबजावणी तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक (तंत्र शिक्षण) यांच्यामार्फत करण्यात येते.

 

नुकताच राज्य शासनाने मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, पारसी, शिख व बौद्ध यांसोबतच ज्यू धर्मीयांचादेखील अल्पसंख्याकांमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या आणखी दोन योजनांची माहिती पाहू.

प्रशिक्षण योजना –

अल्पसंख्याक समाजातील युवक / युवतींना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या प्रगतीमधील अडथळे समजून त्यांच्यात जागृती करणे आवश्यक आहे. यासाठीच या समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहेत. रोजगाराभिमुख फी प्रतिपूर्ती प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये निरंतर प्रशिक्षण योजना / तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ / मुक्त  विद्यापीठ यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण योजना समाविष्ट करण्यात आली आहे.

तंत्र निकेतने, अभियांत्रिकी महाविद्यालये यांमधून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या मान्यतेने निरंतर प्रशिक्षण योजनेंतर्गत राबविण्यात येणारे विविध अभ्यासक्रम, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या मान्यतेने चालविण्यात येणारे विविध अभ्यासक्रम व मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त विविध अभ्यासक्रम यामध्ये चालू शैक्षणिक वर्षांत प्रशिक्षण घेत असलेले निवडक अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ  शकतात.

अल्पसंख्याक समाजातील तरुणांना रोजगारक्षम बनवणे आणि त्यांच्यासाठी नियमित उत्पन्नाचा स्रोत तयार करणे, हे या योजनेमागचे उद्दिष्ट आहे.

या योजनेअंतर्गत उल्लेखित अभ्यासक्रमांमध्ये तसेच  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती म्हणून प्रतिविद्यार्थी प्रशिक्षण शुल्काची प्रत्यक्ष  रक्कम किंवा चार हजार रुपये यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम अदा करण्यात येते. या योजनेची अंमलबजावणी तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक (तंत्र शिक्षण) यांच्यामार्फत करण्यात येते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवे अभ्यासक्रम –

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मांडवी (मुंबई शहर) व चांदिवली (मुंबई उपनगर) येथे नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि विद्यमान ४२ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सप्टेंबर २०१०पासून दुसऱ्या तिसऱ्या पाळीमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण देणे हा या अभ्यासक्रमामागचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत ४४१६ विद्यार्थी सामावून घेता येऊ शकतील. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक (प्रशिक्षण) या योजनेची अंमलबजावणी करतात.

वर्षां फडके

varsha100780@gmail.com

(लेखिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ साहाय्यक संचालक असून अल्पसंख्याक विकास विभागाच्या संपर्क अधिकारी आहेत.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Minority students training plan