राज्यसेवा परीक्षेतील प्रश्नांच्या विश्लेषणाच्या आधारे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विविध योजनांचा अभ्यास कशा प्रकारे करावा, याची चर्चा यापूर्वी करण्यात आली आहे. काही योजनांमध्ये शासनाकडून कालानुरूप बदल करण्यात येतात. महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या दोन महत्त्वाच्या योजनांमधील निकष/ अर्थसाहाय्य /व्याप्ती यांमध्ये महत्त्वाचे बदल जुलै २०१७ मध्ये करण्यात आले आहेत. नव्या तरतुदींसहीत या योजनांची परीक्षोपयोगी माहिती या लेखात देण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोधर्य योजना

बलात्कार, ऑसिड हल्ला याला बळी पडलेल्या महिला आणि लंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या बालकांचे पुनर्वसन व त्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी दि. २ ऑक्टोबर २०१३ पासून राज्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या मनोधर्य योजनेमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या तरतुदी पुढीलप्रमाणे –

  • घटनेचा परिणाम म्हणून महिला किंवा बालकास कायमचे मतिमंदत्व/अपंगत्व आल्यास तसेच सामूहिक बलात्कारांच्या प्रकरणात गंभीर इजा झाल्यास किंवा अ‍ॅसिड हल्ल्यामध्ये चेहरा विद्रुप झाल्यास १०लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येईल.
  • अ‍ॅसिड हल्ल्यामध्ये प्लास्टिक सर्जरी करावी लागल्यास शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयात करण्यात येईल व त्याचा संपूर्ण खर्च विधी सेवा प्राधिकरण मंजूर करेल.
  • अ‍ॅसिड हल्ल्यामध्ये जखमी झाल्यास रु. ३,००,०००पर्यंत अर्थसाहाय्य देण्यात येईल.
  • अन्य प्रकरणांमध्ये रु. १,००,००० पर्यंत अर्थसाहाय्य देण्यात येईल.
  • यापकी ७५ टक्के रक्कम १०वर्षांसाठी पीडितांच्या नावाने बँकेत मुदत ठेव म्हणून तर २५ टक्के रकमेचा धनादेश तात्काळ देण्यात येईल.
  • अर्थसाहाय्य पीडितांच्या / पीडित बालकाच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये देण्यात येईल.

माझी कन्या भाग्यश्री योजना

मुलींचा जन्मदर वाढविणे, िलग निवडीस प्रतिबंध करणे, मुलीचे शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात दि.१ एप्रिल २०१६ पासून माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) तसेच वार्षकि उत्पन्न एक लाखापर्यंत असणारी (एपीएल) कुटुंबे पात्र ठरविण्यात येत होती. दि. १ऑगस्ट २०१७ पासून सुधारित योजना साडेसात लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व घटकांतील कुटुंबांना लागू असणार आहे.

  • योजनेंतर्गत एका मुलीनंतर माता किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून मुलीच्या नावे ५० हजार रुपये, तर दोन मुलींनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येईल.
  • या मुदत ठेवीवरील व्याज मुलीला वयाच्या सहाव्या आणि बाराव्या वर्षी काढता येईल. तसेच मुद्दल आणि व्याज दोन्ही रक्कम वयाच्या १८व्या वर्षी काढता येईल.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १८ र्वष पूर्ण असणे आणि दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासह वयाच्या १८ र्वष पूर्ण होईपर्यंत ती अविवाहित असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबात पहिले व दुसरे अपत्य मुलगी असल्यास योजनेचा लाभ घेता येईल. मात्र तिसरे अपत्य जन्मल्यास त्यास या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. पहिल्या दोन्ही अपत्यांचेही लाभ बंद होतील. मात्र दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्या तर त्या योजनेस पात्र असतील.
  • बालगृहातील मुलींसाठी ही योजना लागू असणार आहे.
  • लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक असेल.
  • एका मुलीच्या जन्मानंतर एक वर्षांच्या आत तर दोन मुलींनंतर ६ महिन्यांच्या आत माता किंवा पिता यांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत लाभार्थी मुलगी व तिची आई यांच्या नावे संयुक्त बचत खाते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये उघडण्यात येईल. त्यामुळे दोघींना एक लाख रुपयांचा अपघात विमा व ५ हजार रुपये ओव्हरड्राफ्ट व इतर लाभ प्राप्त होतील.
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women schemes mpsc exam
First published on: 18-08-2017 at 02:17 IST