पात्रतेपासून क्षमतेपर्यंतचा प्रवास सुकर करण्यासाठी क्षमताबांधणी आवश्यक असते. त्यासाठी ज्ञान आणि अनुभवासोबत जाणीवपूर्वक कष्टांची तयारी हवी.
दहावी, बारावी, नवीन नोकरी-व्यवसाय किंवा नवीन प्रोजेक्ट अशा कुठल्याही नव्या माहोलात आपण प्रवेश करतो ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठीची पात्रता (एलिजिबिलिटी) मिळविलेली असते म्हणून. मागची इयत्ता/ प्रवेशपरीक्षा चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण केलेली असते, मुलाखत चांगली दिलेली असते किंवा नवीन प्रोजेक्टमध्ये निवडलं जाण्याएवढं काम आधीच्या प्रोजेक्टमध्ये केलेलं असतं. ही पात्रता म्हणजे नव्या दरवाजापर्यंत पोहोचवणारा गेटपास असतो. पात्रतेच्या पुढची पायरी असते ती आपली क्षमता पूर्णपणे वापरून स्वत:ला सिद्ध करण्याची.
आपल्या क्षमतेबद्दल आपल्या स्वत:च्या किंवा जवळच्यांच्या काही कल्पना असतात. आपली पूर्ण क्षमता वापरली जावी अशी इच्छा तर सर्वाचीच असते, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. माझ्याकडे मुलांच्या समस्या घेऊन येणाऱ्या बहुतेक पालकांची मुलांबद्दल एक ठरलेली तक्रार असते. ‘खरं तर तो/ती खूप हुशार आहे, पण तो/ती त्याच्या क्षमतेएवढं करत नाही.’
अकरावी-बारावीतली मुलं सांगतात, ‘शाळेत असेपर्यंत आम्ही खूप छान करत होतो, पण कॉलेजमध्ये तसं जमत नाहीये.’ तर नोकरी-व्यवसाय करणारे काही वैफल्यग्रस्त होऊन येतात तेव्हा त्यांच्या क्षमतेएवढं काम त्यांना दिलं जात नसतं किंवा नोकरीतला पगार, व्यवसायातला पसा त्यांच्या कष्टांपेक्षा, क्षमतेपेक्षा खूपच कमी वाटत असल्याने ते असमाधानी असतात.
याबद्दल प्लेसमेंटवाल्यांशी किंवा एचआरवाल्यांशी बोललं तर ते सांगतात, ‘क्षमता (पोटेन्शिअल) असणारे खूप असतात, त्यात काही फार विशेष नाही. स्वत:चं पोटेन्शिअल समजून पुरेपूर वापरणारे सापडत नाहीत, ही खरी समस्या आहे. ‘करीन तर हजाराला भारी.. पण वेळेला घात करी’ असंच बहुतेकांचं असतं. त्यामुळेच तर एकीकडे लाखोंमध्ये बेकारी आणि दुसरीकडे योग्य माणसांची कायमच कमी असा टोकाचा विरोधाभास आपल्या देशात दिसतो.
पात्रतेपासून क्षमतेपर्यंतचा हा प्रवास एवढा अवघड का बनतो? याकडे प्रामाणिक त्रयस्थपणे पाहावं लागेल. त्यानंतर तो सुकर करण्यासाठी काय करावं याचा विचार करता येईल. आपल्या क्षमतेपर्यंत पोहोचता न येण्याचं पहिलं कारण सहसा ‘आळस’ हेच असतं. तत्त्वत: सर्वानाच माहीत असतं की पुढे जायचं असेल तर चालायला हवं. आपण जेवढी पावलं टाकू तेवढेच पुढे जाणार हेही सरळच आहे. त्यामुळे, आपल्या आळसावर पांघरूण घालताना कुठलीही समर्थनं आपण देत असलो तरी समजणं आणि उमजणं यातलं पुष्कळसं अंतर आळसानं व्यापलेलं असतं ही वस्तुस्थिती स्वीकारल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
काम पुढे ढकलणं, चालढकल करणं हे आळसाचेच भाऊबंद असतात. बहुतेक विद्यार्थी परीक्षा ऐन तोंडावर आली की जागे होतात. ऑफिसमधला नवा प्रोजेक्ट सुरू झाल्यावर सुरुवातीला बराचसा वेळ कँटीनमध्ये किंवा चर्चा-चर्चा खेळण्यामध्ये जातो. सगळं गळ्याशी आल्यावरच प्रत्यक्ष काम सुरू होतं आणि तेव्हा रात्रंदिवस अभ्यास/ काम करावं लागतं. ‘काम वेळेत आणि नीट करावं’ हे तत्त्व सर्वमान्य असलं तरीही प्रत्यक्षात ते घडत नाही. मग आपली चूक जेव्हा मान्य करायचीच नसते, तेव्हा मनाची स्वसंरक्षण यंत्रणा जागी होते. आपण वेळेवर काम करत नाही/ केलं नाही हे मान्य करण्याऐवजी आपण शेवटच्या टप्प्यात रात्रंदिवस काम/ अभ्यास केल्याचा एक अभिमान त्यातून बाळगला जातो. ‘शेवटच्या क्षणाच्या एवढय़ा दडपणातदेखील मी शक्य ते सारे प्रयत्न केले,’ यावर स्वत:पाशीसुद्धा फुशारकी मारणं सोपं असतं. शिवाय, ‘मी करायचं ठरवलं तर काहीही करू शकतो, तेवढी धमक (पोटेन्शिअल) माझ्यात आहे’, ‘एक दिवसाच्या अभ्यासावर जर मला एवढे मार्क पडू शकतात तर नीट अभ्यास केल्यावर किती पडतील?’ अशी स्वत:च्या सक्षमतेच्या प्रमेयाची तिरपागडी सिद्धतादेखील मांडता येते.
यातली खरी मेख अशी की, ‘आपण ठरवलं तर शेवटच्या क्षणी काहीही खेचून नेऊ शकतो,’ अशी स्वत:बद्दलची एक पक्की धारणा करून घेतली की पुन्हा तशी वेळ येईपर्यंतचा काळ आळसात काढायला मोकळीक मिळते आणि हे चक्र अव्याहत चालू राहातं. खरं तर हे स्वत:ला कुरवाळणंच असतं. एक प्रकारे कल्पनारंजनात रमणं असतं. आपल्यालाही माहीत असतं की शेवटच्या क्षणी आपल्याकडून घडतं तसं जबरी काम आपण सलग पूर्ण महिनाभर करू शकत नाही. पण अनेकदा आपलं प्राधान्य असतं ते वेळ मारून नेण्याला, श्रेय घेण्याला किंवा ‘हा/ही ग्रेट आहे. जबाबदारी निभावून नेतो/नेते’ अशा आपल्याबाबतच्या चच्रेला.
कधी कधी खरंच वेळ थोडा आणि लक्ष्य मोठं असतं तेव्हा असं रात्रंदिवस काम करावंच लागतं आणि त्यातूनच परिणाम साध्य होतो, हे खरं; पण तो अपवाद असावा. कायमची घिसाडघाई अंगवळणी पडण्यातून सततचं दडपण हीच जीवनशैली बनते. संपूर्ण कामाचा किंवा काही वर्षांचा एकत्रित विचार केला तर समाधानापेक्षा अस्वस्थतेची सोबत जास्त असते. कामात/ अभ्यासात दर्जा, सातत्य आणि सहजता राहात नाही. क्षमता मोजताना सातत्य अभिप्रेत आहे, पण आपलं मन स्वत:चं पोटेन्शिअल मोजतं ते त्या शेवटच्या टप्प्यातल्या घाईच्या दिवसांतलं. त्या हिशोबानं महिन्याच्या किंवा वर्षांच्या कामाला गुणत राहिलं की, ‘माझ्या पोटेन्शिअलएवढं मला मिळत नाही’ किंवा ‘माझं पोटेन्शिअल वापरलं जात नाही’ ही तक्रार मनात कायम घुमत राहणारच.
या स्व-संरक्षणातून कधी कधी फाजील अवास्तव आत्मविश्वास निर्माण होतो. वास्तवाशी नाळ थोडीशी तुटते. काहींना पुढे भान येतं तर काही शेवटपर्यंत तसेच तक्रारी करत राहतात.
दहावीपर्यंत खूप हुशारांत गणला जाणारा एक विद्यार्थी फाजील आत्मविश्वासामुळे बारावीला वर्षभर गाफील राहिला. एवढय़ा तयारीवर इंजिनीअिरगच्या प्रवेशाएवढे मार्क्स मिळणार नाहीत या भीतीतून त्याने शेवटच्या क्षणी बारावीला ब्रेक घेतला. मात्र पुढच्या वर्षी सगळे मित्र पुढे गेल्यावर एकटय़ानेच बाहेरून अभ्यास करणं जमलं नाही. जेमतेमच मार्क्स पडले. पुढे दहावीच्या मार्कावर इंजिनीअिरगचा डिप्लोमा आणि नंतर डिग्री त्याने मिळवली, परंतु तीन र्वष वाया गेल्यासारखं झालं. या अनुभवाबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘वर्षभर तर माझ्या हुशारीच्या गर्वात टाइमपास केलाच, पण निकालानंतरसुद्धा आपल्याला एवढे कमी मार्क मिळालेत आणि पुढची दारं बंद झाली आहेत हे मला खूप काळ पटतच नव्हतं. माझ्या जुन्या क्षमतेच्या भ्रमातून बाहेर पडायला मला खूप वेळ लागला. क्षमता निर्वविादपणे सिद्ध व्हावी लागते हे तेव्हा समजलं. दहावीला केलेले कष्ट आयुष्यभर पुरत नाहीत, दर वेळी नव्यानं परिश्रम घ्यायला लागतात हे समजलं. तेव्हाच्या दहावीच्या कष्टांनीच तरीही मला तारलं, डिप्लोमाला जाऊ शकलो हे उमजल्यानंतर मात्र आळस पळाला. करिअरबद्दल गंभीर झालो.’बाहेरच्या परिस्थितीसोबत आपण कुठे आहोत, याचं त्रयस्थपणे आणि प्रामाणिकपणे भान घेतलं पाहिजे. मग तक्रारीची जागा जाणीव घेते. एका मार्केटिंग मॅनेजरशी बोलताना एकदा मंदीचा विषय निघाला. ‘सध्याच्या मंदीच्या दिवसांत काम करणं तुम्हाला पूर्वीपेक्षा जड जात असणार’ असं मी म्हटल्यावर ते हसून म्हणाले, ‘प्रत्यक्षातल्या मंदीपेक्षा तिची चर्चा करून स्तोम माजवणं जास्त असतं. त्यातून हळूहळू मंदीबद्दल दहशतच पसरते. पण भिऊन काय करणार? असाही तुमच्याकडे कामाशिवाय पर्यायच नसतो. माझ्या दृष्टीनं मंदीचा अर्थ असा असतो की, आता विक्री वाढवण्यासाठी मला पूर्वीपेक्षा दुप्पट काम करावं लागणार आहे. रूढ पद्धतींपेक्षा वेगळ्या पद्धती वापरायला लागणार आहेत. हे लक्षात घेऊन नियोजन केलं की मंदीचा स्वीकार होतो. दहशत उरत नाही. आता नवे सर्जनशील उपाय शोधणं हे माझ्या बुद्धीला आव्हान असतं. कष्ट जास्त पडले तरी मजा येते, कारण माझ्यातली क्षमता नव्या दिशांनी वापरली जाते, चतुरस्र वाढते.’‘कष्ट केल्यानं माणूस मरत नाही, उलट नवीन काहीतरी शिकायला मिळतं,’ असा दृष्टिकोन असणाऱ्यांचा स्वभावच स्वत:ला वाढवत राहणं हा असतो. तो ध्यास त्यांची क्षमता दिवसागणिक वाढवत राहतो. काहींची परिस्थितीच अशी असते की, जिद्दीनं आणि कष्टानं मार्ग काढत राहण्याला पर्यायच नसतो. त्यातून आपोआप त्यांची क्षमताही वापरली जाते, वाढते. थोडक्यात आपला स्वभाव आणि परिस्थितीमुळे अनेकांची क्षमताबांधणी होत राहते. अडचण असते ती मधल्यांची. ज्यांना सुखकर आयुष्य मिळतं आणि स्वभावही धडपड टाळण्याचा असतो. त्यामुळे वैयक्तिक किंवा परिस्थितीची गरज नसेल तर आपल्या ‘कम्फर्ट झोन’मधलं आरामदायी काम निवडलं जातं, त्याच्याबाहेर न पडण्यासाठी समर्थनं शोधली जातात आणि तोंडी लावायला ‘माझी क्षमता वापरलीच जात नाही,’ ही तक्रार उरतेच.
मनातल्या मनात ‘करीन तर हजाराला भारी..’ असं म्हणत राहिल्याने आपण स्वत:ला फसवू शकतो, पण क्षमता वाढवू शकत नाही. क्षमता वाढवण्यासाठी कृती हवी. ‘मला खूप अभ्यास करायचाय/ खूप काम करायचंय,’ असली ध्येयं फसवी असतात. त्यासाठी ‘मी काय कृती करणार आहे?’ ते त्यातून स्पष्टच होत नाही. या क्षणी मी जिथे आहे, तिथून एक पाऊल पुढे टाकण्यासाठी जी पहिली छोटी कृती मी करायला हवी, ते ध्येय हवं. म्हणजे उदा. ‘पुढील आठ दिवस मी रोज पहाटे पाचला उठून दोन तास अभ्यास करेन’, असं काहीतरी स्पष्ट आणि छोटं ध्येय हवं. आजचा अडसर लवकर उठता न येणं हा आहे. त्यासाठी ‘मी आयुष्यभर पहाटे पाचला उठेन’ असं ध्येय ठेवण्याची गरज नाही, जे ठरवतानाच भीती वाटेल. पण आठवडाभर पहाटे उठणं आटोक्यातलं वाटतं. आपण सातातले पाच दिवस जरी ठरवल्याप्रमाणे अभ्यास करू शकलो तरी त्यातले फायदे जाणवतात. आपण ठरवलं ते करू शकलो यातून आत्मविश्वास वाढतो, आठवडय़ाभरात पहाटे उठायची सवय लागली की पहिला टप्पा पार झाला. मग पुढच्या टप्प्यासाठीचं छोटं ध्येय ठरवायचं. या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं ध्येयाकडे जायला लागल्यावर हळूहळू त्यातले बारकावे कळायला लागतात. नवे रस्ते सापडायला लागतात, सर्जनशीलता वाढते, रस वाढतो आणि आपोआपच सातत्यदेखील येतं. सक्षम किंवा पारंगत होता येण्याचं एकूणच तंत्र इथे हातात यायला लागतं. आपण सिद्ध होऊ लागतो. मग पुढचा प्रवास असतो तो, ही सिद्धता दुसऱ्यापर्यंत नीटपणे पोहोचवण्याचा, तिच्या मांडणीचा म्हणजेच चांगल्या अभिव्यक्तीच्या टप्प्यापर्यंतचा.