आठवी ते दहावी इयत्तेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणी या स्पर्धापरीक्षेची माहिती –
सध्याचे युग हे स्पर्धा परीक्षांचे युग आहे. शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा व विविध शिष्यवृत्ती परीक्षांद्वारे स्वत:च्या क्षमतांची तपासणी करता येते. या परीक्षांच्या यादीत आणखी एक भर पडली आहे, ती राष्ट्रीय वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणीची (National Financial Literacy Assessment Test- NFLAT) आठवी ते दहावी इयत्तेच्या शालेय विद्यार्थ्यांना ही परीक्षा
देता येईल.
जगात सर्वाधिक विकासदर असणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये चीनचा प्रथम तर भारताचा द्वितीय क्रमांक लागतो. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अनेक घटक जबाबदार आहेत. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात कार्यरत स्वायत्त व मजबूत नियामक संस्था असणे हा त्यापैकीच एक घटक आहे. बँकिंग क्षेत्रातील रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया (RBI), भांडवली क्षेत्रातील भारतीय रोखे व विनिमय महामंडळ (SEBI), विमा नियमन व विकास प्राधिकरण (IRDA), पेन्शन निधी नियमन व विकास प्राधिकरण (PFRDA) व वायदे बाजार आयोग (FMC) हे नियामक आहेत. या सर्वानी मिळून भारतात वित्तीय शिक्षणासाठीच्या राष्ट्रीय केंद्राची (NCFE) स्थापना केली आहे. आपल्या देशात वित्तीय शिक्षणाच्या प्रसाराकरिता हे केंद्र कार्य करते. मुंबई येथे रोखे बाजार राष्ट्रीय संस्था (NISM) अंतर्गत या केंद्राचे कामकाज चालते.
एन.सी.एफ.ई.तर्फे प्रथमच राष्ट्रीय स्तरावर एनफ्लॅट (NFLAT) परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळांमधील आठवी ते दहावी वर्गातील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतील.
परीक्षेची उद्दिष्टे
* देशातील शालेय विद्यार्थामधील वित्तीय ज्ञानाची चाचणी घेणे.
*  वित्तीय क्षेत्रांतील संकल्पनांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणणे.
* वित्तीय क्षेत्रातील सर्व नियामकांनी वित्तीय साक्षरतेकरिता एकत्र येणे.
* वित्त क्षेत्रातील विद्यार्थी व शाळांना प्रोत्साहन देणे.
परीक्षेचा अभ्यासक्रम
*  पैशासंबंधित मूलभूत संकल्पना
* वित्तीय नियोजन-विविध मार्ग व उद्दिष्टय़े
* विमा व जोखीम व्यवस्थापन
* गुंतवणुकीची मूलभूत तत्त्वे
* बँकेच्या मूलभूत संकल्पना
* शेअर बाजाराची ओळख
* बचत, कर्ज इ.
http://www.nism.ac.in या संकेतस्थळावर अभ्याससाहित्य मोफत उपलब्ध आहे.
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
परीक्षेचा कालावधी एक तासाचा असून एकूण ७५ वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील. परीक्षेचे माध्यम इंग्रजी व हिंदी असेल. चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ (एका गुणाच्या प्रश्नासाठी), ०.५ (दोन गुणांच्या प्रश्नासाठी) आणि ०.७५ (तीन गुणांच्या प्रश्नासाठी) गुण वजा केले जातील या परीक्षेची जबाबदारी इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पसरेनेल सिलेक्शन (IBPS) कडे राहणार आहे.
शाळांसाठी प्रोत्साहन
ल्ल सर्वाधिक विद्यार्थी संख्येने या चाचणीमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या देशातील पहिल्या २५ शाळांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये व स्मृती चिन्ह.
* ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या देशातील पहिल्या पाच शाळांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये व स्मृतीचिन्ह.
* राष्ट्रीय स्तरावरील नियामकांसोबत वित्तीय साक्षरतेसाठी कार्य करण्याची संधी.
* विद्यार्थ्यांमध्ये वित्तीय व्यवस्थापनासारखे जीवनकौशल्य राबवून राष्ट्रकार्यात सहभागी होण्याची संधी.
विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन
* पहिल्या पाच विद्यार्थ्यांना लॅपटॉप, पदक व प्रमाणपत्र.
* प्रत्येक विभागातील प्रथम तीन विद्यार्थ्यांना टॅबलेट, संगणक व प्रमाणपत्र.
* देशातील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना प्रत्येकी २००० रुपयांचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र.
* परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पहिल्या ५० टक्के गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र.
* सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र.
वरीलप्रमाणे ५+१५+१००=१२० विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके मिळतील. विभागीय पारितोषिकांसाठी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर व मध्य भारत असे पाच विभाग असतील. परीक्षा देण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
या परीक्षेसाठीची नावनोंदणी १ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून ती २९ नोव्हेंबपर्यंत सुरू राहील. ही परीक्षा १२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली असून २३ जानेवारी रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर होईल.
नावनोंदणीची प्रक्रिया
* शाळांनी http://www.nism.ac.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी.
* साधनव्यक्ती म्हणून एका शिक्षकाला नियुक्त करावे व त्याचे नाव वरील संकेतस्थळावर कळवावे.
* युजरनेम व पासवर्ड वापरून विद्यार्थ्यांची नावनोंदणी करावी.
* नावनोंदणी वैयक्तिकरीत्या करता येणार नाही. शाळेमार्फतच करावी लागेल.
* ऑनलाइन प्रवेशपत्र शाळांनी डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना द्यावीत.
* मोफत अध्ययन साहित्य संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे.
संपर्क
nflat@nism.ac.in या संकेतस्थळावर परीक्षेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी nflat@nism.ac.in या ईमेलशी संपर्क करावा.
०२२-६६७३५१००/०१/०२/०३/०४/०५/०६ या क्रमांकावर सकाळी साडेनऊ ते सायं. साडेपाचपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) चौकशी करता येईल.
वित्त व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे जीवनकौशल्य आहे. वित्तीय क्षेत्रातील अनेक संकल्पना विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमाचा भाग आहेतच, त्यामुळे विद्यार्थ्यांला या परीक्षेच्या अभ्यासाचा अधिक भार पडणार नाही. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये वित्त व्यवस्थापन असतेच, त्यांच्या भविष्यातही योग्य वित्तीय निर्णय घेण्यासाठी वित्तीय बाबींचे ज्ञान आवश्यक आहे. या परीक्षेच्या निमित्ताने आपले ज्ञान तपासून पाहण्याची सुसंधी विद्यार्थाना मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व पहिल्या राष्ट्रीय वित्तीय परीक्षेला सहभागी व्हावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial literacy test
First published on: 04-11-2013 at 01:09 IST