‘हा अभ्यासक्रम का बरं निवडला,’ या प्रश्नाचे उत्तर अनेक विद्यार्थ्यांपाशी नसते किंवा ते चुकीच्या निकषांवर बेतलेले असते. आणि म्हणूनच अभ्यासक्रम निवडताना विद्यार्थ्यांनी ‘क’च्या बाराखडीची उजळणी करणे आवश्यक ठरते.
आज उच्च शिक्षणात अभ्यासक्रमांचे असंख्य पर्याय विद्यार्थ्यांना निवडीसाठी उपलब्ध आहेत. मात्र त्यातून आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडण्याचा अधिकार बजावताना विद्यार्थ्यांनी का, कुठे, केव्हा, कसे या ‘क’च्या बाराखडीला सामोरं जाण्याची तयारी करायला हवी.
दहावी-बारावी, प्रवेश परीक्षा यामध्ये मनाजोगे मार्क्स मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध असतात. ‘तुला झेपेल आणि आवडेल ते कर,’ असं आपल्या मुलांना सांगणाऱ्या पालकांची संख्या आज वाढू लागली आहे. अशा वेळेस अमूक एका अभ्यासक्रमाची निवड करून विद्यार्थी आपल्या निवडीचा अधिकार बजावतात खरे, मात्र जर कुणी त्यांना विचारलं, ‘या अभ्यासक्रमाची निवड का बरं केलीस?’ तर अनेक विद्यार्थ्यांकडे एक तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर नसतं. जे उत्तर असतं ते अगदीच चुकीच्या निकषांवर आधारलेलं असतं.
निवड केलेल्या विषयाबाबत फारसं जाणून घेण्याचा प्रयत्न त्या विद्यार्थ्यांने केलेला नसतो. तो विषय तिच्यासाठी अथवा त्याच्यासाठी योग्य आहे का, हेही अनेकांना ठाऊक नसतं.
उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची निवड करण्याचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात येणारा तो क्षण त्याा हवेत नेणारा असतो. समोरच्या पर्यायांमधून आपल्याला काही निवडायचंय, ही भावना विद्यार्थ्यांला सुखावणारी असते. मात्र त्याचबरोबर हा क्षण त्याला पुरता गोंधळवून टाकणाराही असतो. नक्की काय निवडायचं आणि आपली निवड योग्य ठरेल ना, हाही संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात पिंगा घालत असतो, आणि म्हणून आपल्या अभ्यासक्रम निवडीबाबत त्यांच्या मनात काहीशी अनिश्चितताही असते.
अमेरिकन असोसिएशन ऑफ कॉलेजेस अॅण्ड युनिव्हर्सिटीजच्या एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे, की तिथल्या महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ५३ टक्के विद्यार्थी अभ्यासाच्या तयारीत काहीसे पिछाडीवर असतात. आपल्याकडच्या महाविद्यालयात अथवा विद्यापीठांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल अशा प्रकारचा अहवाल जरी प्रकाशित झालेला नसला, तरी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आपापल्या अभ्यासक्रमाच्या निवडीबाबतची समज आणि तयारी पुरेशी नसण्याचे प्रमाण याहूनही अधिक असण्याची साशंकता व्यक्त करायला बराच वाव आहे.
अमेरिकेसह अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये अशा प्रकारच्या ‘अंडरप्रीपेअर्ड’ विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या पंगतीत आणण्यासाठी अनेक कृतीगट काम करत असतात. विद्यार्थ्यांचे करिअर निवडीच्या बाबतीत सबलीकरण करावे आणि आपली निवड निभावून नेण्याची जबाबदारी त्यांना पेलता यावी, या दृष्टीने हे मदतगट काम करत असतात.
विद्यार्थी नेमक्या कुठल्या गोष्टींत मागे आहेत, याची चाचपणी हे साहाय्यगट करतात. अनेकदा असे लक्षात येते की, या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक योजना निश्चित करण्याचे कौशल्य नसते. अशा विद्यार्थ्यांना समुपदेशन उपलब्ध करून दिले जाते. समुपदेशक विद्यार्थ्यांच्या क्षमता, कौशल्ये लक्षात घेतात. प्रश्नतंत्रांचा उपयोग करतात. उदा. आतापर्यंत कुठल्या विषयांचा अभ्यास आनंदाने केला? कुठल्या प्रकारे अभ्यास केल्याने त्या विषयात उत्तम तयारी करता आली? विद्यार्थ्यांची बलस्थाने कुठली आणि त्यांच्यात कुठल्या कौशल्यांचा अभाव आहे, हे जाणून घेतले जाते आणि त्यांच्या सद्य कामगिरीवर आधारित असे योग्य अभ्यासक्रम सुचवले जातात. विद्यार्थ्यांची अध्ययन शैली कशी असावी त्याविषयी मार्गदर्शन केले जाते. या विद्यार्थ्यांना अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येय निश्चित करून दिले जाते आणि त्यासाठी कृतीयोजना बनवली जाते. विद्यार्थ्यांच्या मदतीकरिता स्टुडंट्स प्रोग्राम्स, स्टडी सेंटर्स, स्किल्स क्लासेस, कॉलेज सव्र्हायव्हल कोर्सेस, ओरिएंटेशन, करिअर डेव्हलपमेन्ट सेंटर यासारखी मदत केंद्रे तिथे उपलब्ध असतात. जर विद्यार्थ्यांला वित्तीय साहाय्यतेची आवश्यकता असेल तर त्याला कॅम्पसमध्ये अमूक एक तास काम करण्यासाठी वर्क – स्टडी पोझिशन उपलब्ध करून दिली जाते.
आज आपल्याकडे करिअर निवडीबाबत विद्यार्थ्यांची असलेली संभ्रमावस्था आणि अयोग्य निवडीमुळे अनेकांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा होणारा चक्काचूर आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना घेरून राहिलेल्या नैराश्याचा विचार करता करिअर निवडीत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर मदत केंद्रे उभारण्याची आवश्यकता आहे. अशा विद्यार्थ्यांची क्षमता आणि कल लक्षात घेऊन त्यांच्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम आखणे, त्यांना निवड केलेल्या अभ्यासक्रमाबाबत पाठय़ेतर ज्ञान देण्यासाठी उपक्रम राबवणे, ध्येयाच्या दिशेने विद्यार्थी प्रगती करत आहे का, याचे निरीक्षण करणे, अध्यापनासंबंधित समस्या सोडविण्याच्या तंत्रांचा वापर करणे, अशा अनेक प्रकारे विद्यार्थ्यांना करिअरच्या दिशेने आगेकूच करण्यात मदत करता येऊ शकेल..
आपण मोठे होत जातो, तसे अधिकाधिक गोष्टींकडे आपण ग्राहकाच्या नजरेतून आणि केवळ उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून आपण गोष्टींकडे बघायला शिकतो. करिअर निवडतानाही अनेकांचे असेच काहीसे होते. आज विद्यार्थी करिअरची वाट निवडताना, त्या विषयांमध्ये कुठल्या संधी उपलब्ध आहेत, वेतनाची रक्कम किती असेल.. या दृष्टिकोनातून विद्यार्थी विषयांच्या निवडीकडे बघतात आणि मग अधिक गोंधळात पडतात. याचे कारण असे करताना विद्यार्थी ग्राहकाच्या दृष्टिकोनातून या बाजारपेठेकडे पाहत असतात. खरे तर तो विषय त्यांच्या बुद्धिमत्तेला, मानसिकतेला, कौशल्यांना साजेसा असतो का, हे जाणून घेणे आवश्यक असते.
आजच्या खुल्या बाजारपेठा ग्राहककेंद्रित असतात. हा नियम शिक्षणाच्या बाजारपेठेलाही काहीसा लागू होत असला तरी तो तंतोतंत लागू होत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तसेच जेव्हा आपण एखादी निवड करतो, त्याबरहुकूम एखादी कृती करतो, तेव्हा त्याचे बरेवाईट परिणाम होत असतात आणि त्यातील काही अनपेक्षितही असू शकतात, हा दृष्टिकोनही विकसित करायला हवा.
एखाद्या निवडीमुळे जसे आपण जगाला गवसणी घालू शकतो, त्याचप्रमाणे कधीकधी आपलं जगही आक्रसू शकतं. आपण जर अभ्यासाकडे केवळ ग्राहकाच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर पद्धतीने पाहिलं तर स्वत:ला कम्फर्टेबल ठरणाऱ्या गोष्टींना आपण अधिक महत्त्व देतो.. म्हणजे अमुक एका करिअरमध्ये संधी आहे तर त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊयात. अशा वेळी एखाद्या दुसऱ्या विषयात आपल्याला मार्क्स अधिक आहेत किंवा गती आहे, वेगळ्या तऱ्हेचं कौशल्य आपल्यात आहे, याकडे आपण दुर्लक्ष करतो.. आणि यश मिळवण्यासाठी ठरावीक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतो. अशाने आपलं वर्तुळ अधिकाधिक लहान होत जातं. त्या वर्तुळाबाहेर जे असतं, त्याकडे आपण दुर्लक्ष करू लागतो. हे अभ्यासक्रमांच्या बाबतीत, मित्र-मैत्रिणींच्या निवडीबाबतीत होऊ शकतं. अशा वेळेस आपण निवडलेल्या एखाद्या पर्यायात एखादा लहानसा अडथळा जरी आला तरी अनेक जण पूर्णपणे हलून जातात. कारण विविधता नसल्याने आपलं अनेकांशी कनेक्टेड असणं कमी झालेलं असतं आणि आपल्याला सोयीच्या ठरणाऱ्या आणि आवश्यक असलेल्या निवडक गोष्टींवरच आपण अधिक अवलंबून राहू लागतो. त्यामुळे त्या प्रक्रियेला बाधा आणणारी एखादी लहानशी गोष्टही आपला अभ्यासातील जोश कोलमडून टाकते.
म्हणूनच करिअर निवडीचे स्वातंत्र्य हे विद्यार्थ्यांना असायलाच हवे. मात्र ती निवड करताना का, कुठे, केव्हा आणि कसे या प्रश्नांच्या मुळापर्यंत जाण्याचाही विद्यार्थ्यांनी नक्की प्रयत्न करायला हवा, कारण या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपला निर्णय अधिकाधिक समंजस होत जातो.
 सुचिता देशपांडे
suchita.deshpande@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to select higher studies courses
First published on: 22-09-2014 at 01:08 IST