|| प्रथमेश आडविलकर

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम, डेहराडून

Loksatta explained Why different cultural groups are losing representation in Indian advertising
विश्लेषण: जाहिरातींमधून विविधता का हरवली?
Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
Indian Institute of Management Mumbai hiring post
IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये नोकरीची संधी! पाहा माहिती
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती

उत्तराखंड राज्याची राजधानी असलेल्या डेहराडून या शहरात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम (आयआयपी) ही हायड्रोकार्बन या क्षेत्रामध्ये संशोधन करणारी संशोधन संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९६० साली नवी दिल्ली येथे झाली. नंतर १९६३ साली ही संस्था डेहराडूनला हलवण्यात आली. ही सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न संशोधन संस्था आहे. तब्बल २५७ एकरांत संस्थेचा पसारा मांडलेला आहे. हायड्रोकार्बन क्षेत्राबरोबरच पेट्रोलियम रिफाइिनग, नैसर्गिक वायू, पेट्रोकेमिकल्स, केमिकल्स आणि पेट्रोलियम उत्पादनांचा वापर इत्यादी क्षेत्रांमध्येही या संस्थेत संशोधन होते. शिवाय पन्नासपेक्षाही अधिक अभिनव तंत्र येथे विकसित केली गेली आहेत.

संस्थेविषयी 

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियमची स्थापना १९६० साली झाली. आयआयपीने  १९६० ते १९६४ च्या दरम्यान युनेस्को कार्यक्रमाअंतर्गत फ्रान्समधील फ्रेंच इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम या संस्थेकडून संस्थात्मक बांधणीसाठी संघटनात्मक मदत घेतली होती. फ्रेंच इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियन ही जागतिक स्तरावरील एक महत्त्वाची पेट्रोलियम संशोधन संस्था आहे.  तेल आणि वायू क्षेत्र तीन उपक्षेत्रांमध्ये (सब सेक्टर्स) विभागले गेले आहे – अपस्ट्रीम, मिडस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम सेक्टर. यात डाउनस्ट्रीम सेक्टर म्हणजे कच्चा नैसर्गिक वायू व पेट्रोलियम क्रूड ऑइलचे शुद्धीकरण आणि क्रूड ऑइल व नैसर्गिक वायूतून घेतलेल्या उत्पादनांचे विपणन आणि वितरण करणे. आयआयपी यांपकी हायड्रोकार्बन उद्योगांच्या डाउनस्ट्रीम क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी वाहून घेतलेली संस्था आहे.  आयआयपीकडे अत्यंत अनुभवी आणि कुशल कर्मचारी वर्ग आहे. उपलब्ध मनुष्यबळापकी एकूण १३२ आर अ‍ॅण्ड डी संशोधक आहेत तर २०८ तांत्रिक कर्मचारी आहेत. तसेच संशोधन आणि विकास कार्यासाठी कॉम्प्युटेशनल फॅसिलिटीज, डिजिटल इन्फॉम्रेशन रिसोर्स सेंटर व पायलट प्रकल्पासारख्या अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. चांगल्या आणि दर्जेदार संशोधनासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा आणि जागतिक विद्यापीठांच्या तोडीचा अनुभवी संशोधक-प्राध्यापकवर्ग या बहुमोल गोष्टी संशोधक विद्यार्थ्यांना इथे मिळतात. संस्थेचा वार्षकि अर्थसंकल्प सुमारे २५ कोटी रुपयांचा असून संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकूण चौदा विद्यापीठांशी पीएच.डी. पदवी अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे.

संशोधनातील योगदान 

पेट्रोलियमसारख्या विषयाला सध्याच्या काळात प्रचंड मागणी आहे, परंतु त्या तुलनेत उपलब्ध असलेले मनुष्यबळ तुटपुंजे आहे. यामुळेच आयआयपी देश विदेशातील अनेक सार्वजनिक आणि खासगी उद्योगांना वैज्ञानिक व संशोधन सेवा पुरवते. शिवाय आयआयपीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोडही आहेच.  सध्या आयआयपी पेट्रोलियम क्षेत्रातील महत्त्वाच्या म्हणजेच पेट्रोलियम रिफायिनग, बायोमास, फ्युएल्स टू केमिकल्स, एनर्जी एफिशियंट प्रोडक्ट्स अ‍ॅण्ड प्रोसेसेस, फ्युएल्स अ‍ॅण्ड ल्युब्रिकंट्स, केमिकल्स अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स, कार्बनडाय ऑक्साईड कॅप्चर अ‍ॅण्ड युटीलायझेशन, व्हॅल्यू अ‍ॅडिशन टू रिफायनरी सिस्टीम्स, ऑटोमोटिव्ह इंजिन्स अ‍ॅण्ड इमिशन्स, ट्रायबोलॉजी, इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड डोमेस्टिक कम्बशन इत्यादी विषयांमध्ये संशोधन करते. संशोधनाव्यतिरिक्त आयआयपी तांत्रिकदृष्टय़ा सल्लागार स्वरूपाची इतर काही कामे करते. जसे की, पेट्रोलियम संबंधित उद्योगाला तांत्रिक आणि विश्लेषणात्मक सेवा पुरवणे, मागणीनुसार या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अभिनव उत्पादने विकसित करणे, पेट्रोलियम उत्पादनांच्या मूल्यवर्धनासाठी रिफायनरीजना मदत करणे, पेट्रोलियम उद्योगाला तांत्रिक सेवा पुरवणे, बी.आय.एस.मध्ये पेट्रोलियम उत्पादनांसाठी मानदंड तयार करणे, पेट्रोलियम उत्पादनांचा तांत्रिक-आíथक अभ्यास व पेट्रोलियम उत्पादनांची बाजारपेठ मागणी सर्वेक्षण करणे आणि पेट्रोकेमिकल उद्योगातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये रिफायिनग इंडस्ट्रीज, पेट्रोकेमिकल प्लँट, ऑटोमोटिव्ह सेक्टर, पॉवर प्लँट्स आणि इतर संबंधित उद्योगांतील तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी संस्थेकडून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.

विद्यार्थ्यांसाठी संधी

आयआयपी फक्त संशोधन संस्था नसून पेट्रोलियमसारख्या महत्त्वाच्या विषयातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्रदेखील आहे. शास्त्रज्ञ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांशिवाय येथे पीएच.डी.चे संशोधन करणारे अनेक संशोधक विद्यार्थी आहेत. तसेच प्रत्येक वर्षी गुणवत्ताप्राप्त जेआरएफ व एसआरएफ विद्यार्थी त्यांचे पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. आयआयपी भारतातील व भारताबाहेरील विद्यापीठांशी पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. भारतातील इतर विद्यापीठांमध्ये पीएच.डी.चे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी संशोधनाचा विशिष्ट भाग अथवा माहिती संकलन किंवा माहिती प्रक्रिया इत्यादीसारख्या बाबी पूर्ण करण्यासाठी येथे ठरावीक काळ व्यतीत करत असतात. याव्यतिरिक्त, दरवर्षी विविध महाविद्यालये व विद्यापीठांमधील पदवी/ पदव्युत्तर विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुटय़ांमध्ये त्यांचे संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात. सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला नेहमीच चालना दिलेली आहे. त्यामुळेच संस्थेच्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे येथे रसायनशास्त्र व रसायन अभियांत्रिकी शाखांतील विविध विषयांमध्ये विद्यार्थी येथे पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.

संपर्क

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम,

पोस्ट ऑफिस मोहकामपूर,

देहरादून, उत्तराखंड – २४८००५.

दूरध्वनी: +९१- १३५ – २५२५७२२, २५२५७५१.

ई-मेल  – coa@iip.res.in

संकेतस्थळ – http://www.iip.res.in/

itsprathamesh@gmail.com