(Je pense, donc je suis/ज पॉन्स दॉन्क ज स्वी = I think, therefore I am) जीवन हे खरोखरच अस्तित्वात आहे का? अशा तत्त्वचिंतनात्मक कूटप्रश्नाची उकल करणारे हे वाक्य आहे. ज्या अर्थी मी विचार करतो, त्या अर्थी मी अस्तित्वात आहे असा साधासोपा अर्थ इथे अभिप्रेत आहे. या वाक्यातील ‘मी’ हा बदलणारा नाही. म्हणजेच जे जीवन संपुष्टात येते, अशाश्वत असते किंवा बदलते त्या प्रकारच्या जीवासाठी हे वाक्य नाही. अशा जीवाच्या मनात दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या प्रकारचा विचार येईल. परंतु या वाक्यातील ‘मी’ हा शाश्वत, कधीही न बदलणारा, कालातीत आणि कायमस्वरूपी असा आहे आणि म्हणूनच या ब्रह्मवाक्याची पाश्चात्त्य चिंतकांना गोडी लागली. याचा सुप्रसिद्ध लॅटिन अवतार म्हणजे कोजितो अर्गो स्युम (Cogito, ergo sum)..
‘मी विचार करतो, म्हणून मी आहे,’ (I think, therefore I am), हे ब्रह्मवाक्य जगाला बहाल करणारे थोर फ्रेंच गणितज्ज्ञ, तत्त्ववेत्ते आणि लेखक म्हणजे रेने देकार्त. (३१ मार्च १५९६ ते ११ फेब्रुवारी १६५०) आपल्या ऐन उमेदीचा जास्तीत जास्त काळ त्यांनी डच रिपब्लिकमध्ये व्यतीत केला. पाश्चात्त्य विचारधारेतील आधुनिक तत्त्वज्ञानाचे जनक अशी रेने देकार्त यांची ओळख आहे. त्यांच्या लेखनाला प्रतिक्रिया अशा स्वरूपातच बहुतांश पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची निर्मिती झाल्याचे आढळते. गणितातील ‘कार्टीझीयन कोऑर्डीनेट सिस्टीम’ची संकल्पना ही देकार्त यांनी मांडली.(त्यांच्या लॅटिन प्रकाशनांवरील नाव म्हणजे  रेनाती डेस कार्टेस (Renati Des-Cartes)  असे आहे. यावरून ‘कार्टीझीयन’ हा शब्द आला आहे.) बीजगणितातील समीकरणांची भूमितीय आकारांतील अभिव्यक्ती ही द्विमिती समन्वयन व्यवस्थेचा (two-dimensional co-ordinate system) सिद्धान्त सादर करून कशी शक्य होते, ते त्यांनी कथन केले. भूमितीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्यांनी बीजगणिताचा वापर केला. बीजगणित आणि भूमिती या दोन ज्ञानशाखांमध्ये सेतू बांधण्याचे महान कार्य त्यांनी केले. विश्लेषणात्मक भूमिती या ज्ञानशाखेचे ते जनक आहेत.
वस्तुनिष्ठपणे विचार करताना सगळे जीवन म्हणजे जणू स्वप्नवत् असू शकते, असे ते सांगतात. त्यांच्या असामान्य प्रतिभेला फुटलेले धुमारे हा मानवी जीवनाचा एक प्राण आहे. मानवाच्या संस्कृतीची शान आहे. रेने देकार्त यांचे विचार जाणल्यावर खरोखरच एखादी पदवी मिळवल्याचा आनंद होतो. त्यांचे विचार जाणून घेऊयात-  
‘पूर्णाक (परफेक्ट नंबर्स) हे पूर्ण पुरुषांप्रमाणे (परफेक्ट मेन) असतात. सापडण्यास फार दुर्मिळ. माझ्याबरोबर सगळे काही बीजगणितच होऊन जाते. गणितातील जो प्रत्येक कूटप्रश्न मी सोडवला त्याचा पुढे नियम बनला आणि मला दुसरी इतर समीकरणे सोडवताना त्याचा उपयोग झाला.
दर्जेदार पुस्तकांचे वाचन हे गतकालीन महान व्यक्तींशी सुखद वार्तालाप केल्याचा आनंद देणारे असते. लोक नक्की काय विचार करतात, ते जाणून घेण्यासाठी ते जे काही बोलतात त्यावर लक्ष देण्यापेक्षा ते जे कार्य करत असतात, त्याचा आदर करा. महान बुद्धिमत्ता ही आत्यंतिक वाईटपणा आणि आत्यंतिक चांगुलपणा या दोन्हीची क्षमता बाळगून असते.
सर्व गोष्टींमागची यंत्रणा ही असेच काम करत असते. सर्वच चांगल्या गोष्टी या कष्टसाध्य तर वाईट गोष्टी या सहजसाध्य असतात. नुसती चांगली बुद्धी / मानसिक क्षमता असणे पुरेसे नाही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे, त्यांचा योग्य वापर करणे.
विज्ञानामध्ये कोणतीही नवीन सत्यं सापडली तर मी असे म्हणू शकतो की, ज्या पाच-सहा मूलभूत कूटप्रश्नांची उकल करण्यामध्ये मला यश आले, त्यावर ही नवीन सत्यं अवलंबून तरी आहेत किंवा त्यांच्याच अनुषंगाने मांडली जात आहेत. हे मूलभूत कूटप्रश्न सोडवणे माझ्यासाठी त्या लढाया होत्या ज्या वेळी युद्धाच्या दैवताने माझ्या बाजूने कौल दिला. केवळ आपले विचार सोडले तर जिच्यावर आपला संपूर्ण ताबा आहे अशी दुसरी कुठलीच गोष्ट अस्तित्वात नाही.
पुढील चार नियम मी स्वत:साठी आखून घेतले तसेच ते पुरेसे होतील, अशी माझी खात्री होती. होय, पण त्यासाठी त्यांचे निक्षून पालन करण्याचा दंडक मी स्वत:लाच घातला. त्यांचे काटेकोर आणि कठोररीत्या पालन करताना तिळमात्रही कसूर मी केली नाही. पुराव्याने सिद्ध करण्याएवढे ज्ञान जवळ नसेल तर कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारायची नाही, हा पहिला दंडक. (घायकुतीला येणे आणि पूर्वग्रह इत्यादी काळजीपूर्वक बाजूला ठेवणे हे क्रमप्राप्तच होते. माझ्यातील नीरक्षीरविवेकासमोर आणि माझ्या मनचक्षूंसमोर नि:संदिग्ध रोखठोकपणाने जे समोर आले त्यालाच मी जवळ केले. कारण अशा निवाडय़ांपुढे कुठलीही शंका टिकाव धरूच शकत नव्हती.) दुसरे म्हणजे, शक्य तितक्या छोटय़ा छोटय़ा भागांमध्ये मी माझ्यासमोरील कूटप्रश्नाचे विभाजन केले. त्या समस्येचे भाग/उपभाग केले. समस्येचे निराकरण करण्यासाठी ती आवश्यक अटच होती आणि त्यामुळेच मी त्या कूटप्रश्नाची उकल करू शकलो. समस्यांच्या समाधानापर्यंत पोहोचलो. तिसरे म्हणजे, माझ्या विचारांना मी शिस्तबद्ध अशी दिशा दिली. आकलनासाठी सोप्या गोष्टीपासून सुरुवात करत एक एक पायरी वर चढत समजण्यास अवघड आणि व्यामिश्र अशा विषयाच्या आकलनापर्यंत क्रमाक्रमाने मी प्रवास केला. या अभ्यासाच्या बाबींमध्ये नैसर्गिकरीत्या एक प्राथमिक व दुसरी बाब जरा प्रगत अशी प्रतवारी नसली तरी माझ्या विचारांमध्ये एक शिस्त आणि सुसंगती मी प्रस्थापित केली. चौथे आणि शेवटचे म्हणजे, या संपूर्ण अभ्यासामध्ये अत्यंत बारीक तपास, छडा लावण्याची कसोशी, सर्वसाधारण सर्वेक्षण तसेच आपल्या हातून कुठलाही दुवा निखळून किंवा निसटून जात नाही ना, याची डोळ्यात तेल घालून मी काळजी घेतली.
संशोधनामध्ये ज्या बाबी मी स्पष्ट केल्या आहेत, त्यासाठी तसेच इतरांना संशोधनाचा आनंद मिळावा यासाठी बुद्धय़ांकाच्याच काही गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. त्या स्पष्ट न केलेल्या गोष्टींसाठीसुद्धा भावी पिढी माझे योग्य मूल्यांकन करेल, अशी आशा मला वाटते. शंका हे ज्ञानाचे उगमस्थान आहे. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी, सत्य आत्मसात करण्यासाठी आपल्या संपूर्ण जीवनाच्या कालावधीत निदान एकदा तरी मनात शंका डोकावायला हवी. शक्यतोवर प्रत्येकच गोष्टीबद्दल शंका घेता आली पाहिजे. जागृत अवस्था आणि स्वप्नावस्थेकडे काळजीपूर्वक पाहिल्यानंतर या दोन्ही स्थिती अगदी खात्रीलायकरीत्या वेगळे वेगळे करणारा असा एकही घटक किंवा गुणधर्म मला आढळला नाही. तुमचे संपूर्ण आयुष्यच एक स्वप्न नाहीये, याबद्दल तुम्ही कशी काय खात्री देऊ शकाल?
‘कॉमन सेन्स’चे वाटप खूप न्याय्यरीतीने झाले असावे. कारण कुणालाही असे वाटत नाही की, आपल्याजवळ जो काही ‘कॉमन सेन्स’ आहे, त्यापेक्षा जास्तीची गरज आपल्याला आहे.. खऱ्याखुऱ्या दुखापेक्षा आनंदाची भ्रांतीसुद्धा जास्त मौलिक असते. उजेड नसतानाही आशावादी व्यक्तीला प्रकाशाचा किरण दिसतो, परंतु निराशावादी माणसाने तो विझवण्यासाठी प्रत्येक वेळी धावलेच पाहिजे का? ज्या राज्यामध्ये मोजकेच कायदे आणि  मुख्य म्हणजे त्या कायद्यांचे/नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन जिथे केले जाते ते राज्य उत्तमरीत्या सुसंघटित आणि अनुशासित असे असते.
ज्ञानेंद्रिये वेळोवळी आपली फसगत करतात आणि एकदा जरी ज्याने आपल्याला फसवले असेल त्याच्यावर संपूर्ण विश्वास कधीही न टाकणे हेच समंजसपणाचे आहे. माझ्या डोळ्यांनी पाहिले असे जे मला वाटले/वाटते, खरे तर ते आत्मसात करण्याचा सर्वथव मार्ग म्हणजे बुद्धीमध्ये वास करणारी निष्कर्ष काढण्याची क्षमता होय. तुम्ही फक्त पुढे ढकलत राहा. फक्त पुढे पुढे (आपला अभ्यास विषय) नेत राहा. शक्य कोटीतील प्रत्येक चूक मी केली, परंतु फक्त मी पुढे पुढे ढकलत राहिलो. ज्ञानार्जन करताना- एक म्हणजे प्रतिभाज्ञान आणि दुसरे म्हणजे युक्तिवादाचे तार्किक निगमन (deduction) – आकलन प्रक्रियेच्या या दोन कार्यावर फक्त आपल्याला विश्वासून राहता येते.
तिरस्कार करणे खूप सोपे आहे, प्रेम करणेच खूप कठीण असते. ज्यावेळी कोणी माझा अपराध करून मला वाईट वागवतात तेव्हा माझ्या जीवाला मी फार उन्नत स्थानावर नेतो.. इतक्या उंचच उंच ठिकाणावर की, तिथपर्यंत तो अपराध ती वाईट वृत्ती पोहोचू शकतच नाही. आपल्या बुद्धीची आणि मनाची योग्य मशागत करण्यासाठी आपण शिक्षण कमी घेतले पाहिजे आणि चिंतन जास्त केले पाहिजे.
सत्य नेमके काय आणि कसे आहे, हे निश्चित करणे जेव्हा आपल्या अधिकाराच्या कक्षेत येत नसते तेव्हा जे जास्तीत जास्त संभाव्य आहे तेच आपल्याला अनुसरावे लागते. मी बघतो त्या सगळ्या गोष्टी भासमान आहेत. मला वाटते की, सर्व काही भ्रम आहे. खोटे सांगत असलेली माझी स्मृती ज्या कशाचे मला स्मरण देते, त्यातील काहीही अस्तित्वात नव्हते. माझा असा विश्वास आहे की शरीर, आकार, विस्तार, क्रिया, ठिकाण ही फक्त काय्रे आहेत. मग असे काय आहे की, जे सत्य म्हणून स्वीकारता येईल? कदाचित फक्त ही एकच गोष्ट की, काही म्हणजे काहीही शाश्वत नाही..
सर्व ज्ञानाची खात्री आणि सत्यता ही केवळ खऱ्याखुऱ्या परमेश्वराच्या ज्ञानावरच अवलंबून असते, हे मी नि:संदिग्धपणे मान्य करतो. हे इतके खरे आहे की, ‘त्याला’ जाणण्यापूर्वी (त्याला जाणण्याच्या आधीच) दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचे बिनचूक ज्ञान होणे कसे काय शक्य आहे? शाश्वत सत्यापेक्षा अतिप्राचीन असे काहीच नाही..
अशा रीतीने सर्व तत्त्वज्ञान हे एखाद्या झाडाप्रमाणे आहे. Metaphysics हे ज्याचे मूळ आहे. पदार्थविज्ञानशास्त्र हे या झाडाचे खोड आहे आणि इतर सर्व विज्ञान शाखा या त्याच्या फांद्या आहेत. खोडापासून फुटून या फांद्यांचा विस्तार होतो आहे. यांत्रिकी, वैद्यक आणि नीतीशास्त्र या त्यातील तीन महत्त्वाच्या फांद्या होत.’
चिंतनाच्या गूढ क्षणामध्ये सर्व ज्ञानाचे एकच बीज पाहणारा, त्या ज्ञानवृक्षाच्या विस्तारामध्ये सर्वच ज्ञानाची व्यवस्था करणाऱ्या असामान्य प्रतिभेच्या तत्त्ववेत्त्या रेने देकार्त यांना लाख लाख सलाम!

Constitution of India
संविधानभान: मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे
loksatta analysis about future of maharashtra ownership of flats act
विश्लेषण : महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट कायद्याचे अस्तित्व का धोक्यात? सामान्यांसाठी का महत्त्वाचे?
sc verdict on arvind kejriwal bail
अग्रलेख : नियामक नियमन
Indian Army also has a suicide dron How will Nagastra 1 expand its power
भारतीय सैन्याकडेही आत्मघाती ड्रोन…‘नागास्त्र-१’ मुळे सामर्थ्य कसे विस्तारणार ?
Loksatta chaturang Menstrual cycle maternity leave Professionals of women Parental Leave
स्त्री ‘वि’श्व : मातृत्वाच्या रजेतील ताणेबाणे
MPSC Mantra  Gazetted Civil Services Joint Prelims Exam Intelligence Test
MPSC मंत्र : राजपत्रित नागरी सेवा सयुक्त पूर्व परीक्षा: बुद्धिमत्ता चाचणी
What makes mosquitoes suck blood
डासांनी रक्त शोषण्यामागचे कारण काय?
Ancient 'scholar warriors' now in the Indian Army; What exactly is this concept?
प्राचीन ‘विद्वान योद्धा’ आता भारतीय लष्करात; काय आहे नेमकी ही संकल्पना?