सैन्य दलात तसेच विविध पोलीस दलांत सामील व्हावं, असं अनेकांना वाटत असतं. मात्र त्या संदर्भातील प्रवेशप्रक्रियेबाबत तसेच परीक्षेच्या तयारीबाबत अचूक मार्गदर्शन प्रत्येकाला उपलब्ध असतेच, असे नाही. अशा सर्व तरुण-तरुणींच्या मदतीसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सैन्य प्रशिक्षणाचा उपक्रम योजला आहे. हा उपक्रम महासैनिक प्रशिक्षण केंद्रामार्फत चालविण्यात येतो.
महासैनिक वा मेस्को ही माजी सैनिकांची संघटना आहे. या केंद्राच्या पुणे, सातारा, कोल्हापूर येथील विभागीय केंद्रांतर्फे सैन्य दलाच्या विविध पदांवरील भरतीसाठी माफक दरात दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध आहे. या प्रशिक्षणात अत्याधुनिक तंत्रांचा उपयोग केला जातो.
या केंद्रात प्रशिक्षक म्हणून सैन्यदलात विविध पदांवरून निवृत्त झालेल्या व्यक्ती कार्यरत असतात आणि मोठय़ा पदावरून निवृत्त झालेला अधिकारी या केंद्राचा प्रमुख म्हणजेच कमांडंट म्हणून काम करत असतो.
सैनिक (जी.डी) ऑल आम्र्स, सैनिक (जी.डी.) शेडय़ुल ट्राइब, सैनिक (तांत्रिक), सैनिक तांत्रिक (नर्सिग), टेक्  (एम.ए.), सैनिक क्लार्क, स्टोअरकीपर टेक्निकल, सैनिक ट्रेडस्मन, कॉन्स्टेबल (जी.डी.) रायफलमन (जी.डी.) / इरा/  सीआयएसएफ/ सीआरपीएफ/ आयटीबीपी/ एसएसबी/ आसाम रायफल्स, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, नाविक नौदल (सिनीअर सेकंडरी रिक्रुटस्), नाविक नौदल (Artificer Apprentice), नाविक जी. डी. कोस्टल गार्ड, वायुसैनिक या सर्व पदांसाठी विविध कालावधीचे प्रशिक्षण या केंद्रात दिले जाते.
प्रशिक्षणात लेखी परीक्षा, मुलाखतीची तयारी करून घेतली जाते तसेच शारीरिक क्षमता विकसित कशा कराव्यात याचाही सराव करून घेतला जातो. त्यासोबत उमेदवारातील नीतीमूल्ये, देशप्रेम कसे वृद्धिंगत होईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
या केंद्रांत मुला-मुलींना प्रवेश दिला जातो. या ठिकाणी निवासाची सुविधा उपलब्ध असते. तांत्रिक तसेच लिपिक पदासाठी दहावीनंतर दोन वर्षांचा निवासी अभ्यासक्रम आहे. इथल्या प्रशिक्षणासोबत विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेत अकरावी-बारावीचा अभ्यास करत असतात. इतर पदांसाठी एक-दोन महिन्यांचा प्रशिक्षणवर्ग असतो. किमान शैक्षणिक पात्रता दहावी/बारावी उत्तीर्ण असावी लागते. सैनिक जी.डी. शेडय़ुल ट्राइबसाठी केवळ आठवी उत्तीर्ण असावी लागते.
अलीकडे सुरक्षारक्षकांना सरकारी नियमानुसार प्रशिक्षण बंधनकारक आहे. जे सध्या नोकरीत आहेत, त्यांनाही प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक बनले आहे. या प्रशिक्षणाचे वैशिष्टय़ म्हणजे १८ वर्षे ते ६० वर्षे दरम्यानच्या कुणालाही हे प्रशिक्षण मिळू शकते. हा ३० दिवसांचा निवासी अभ्यासक्रम आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता आठवी उत्तीर्ण असते. माजी सैनिकांच्या मुलांना या ठिकाणी प्राधान्यक्रम मिळतो. इथे प्रवेशजागा मर्यादित असतात. अभ्यासक्रमाचे शुल्क चार हजार रु. असते. या अभ्यासक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे यशस्वी प्रशिक्षणार्थीना हे शुल्क सरकारकडून परत मिळते. याशिवाय ‘मेस्को’कडून रु. एक हजार प्रोत्साहन रक्कम मिळते.
संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानंतर उत्तम वेतन, निवासाची सुविधा, प्रवास आणि वैद्यकीय सेवा आयुष्यभरासाठी लाभतात. मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृहाची सुविधा असते. दैनंदिन वस्तुंसाठी कँटिनमध्ये अत्यल्प दरात वस्तू मिळतात. खरे तर या सर्वापेक्षा महत्त्वाचे म्हणजे देशांतर्गत शांतता व सुरक्षितता, परकीय आक्रमणांचा सामना, अस्मानी-सुलतानी संकटांचे निवारण या कार्यात संरक्षण दलातील अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ही सर्व कामे जितक्या कार्यक्षमतेने केली जातात, तितका त्या व्यक्तीच्या प्रगतीचा आलेख चढता असतो. प्रशिक्षणाकरता दाखल होण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा- ०२३१- २६६३१३२, ९४२२०३९७१८, ९०२१५५०३६३, ८३७८८४२४४९, ९९२३४०७६५३, ९४२०६९७८०७ अथवा http://www.mescoindia.com या वेबसाइटला भेट द्यावी.
अनुराधा गोरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Military training examinations
First published on: 30-06-2014 at 01:07 IST