फारुक नाईकवाडे
मागील लेखामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास घटकाच्या मूलभूत व संकल्पनात्मक मुद्यांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये अर्थव्यवस्था घटकाच्या चालू घडामोडींची तयारी कशी करावी याबाबत चर्चा करण्यात येत आहे.
संकल्पनांच्या आधारे चालू घडामोडींचा अभ्यास करणे हाच अर्थव्यवस्था या विषयाच्या अभ्यासाचा पाया आहे. या क्षेत्रामध्ये घडणाऱ्या ‘चालू घडामोडी’ या विषयाला नेहमीच गतिमान व अद्ययावत ठेवत असतात. त्यामुळे राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या ठळक व महत्त्वाच्या अर्थविषयक घडामोडी, दूरगामी परिणाम करणारे आंतरराष्ट्रीय ठराव, करार, प्रकाशित होणारे नियतकालिक अहवाल, वेगवेगळे जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील निर्देशांक अभ्यासणे अर्थव्यवस्था विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक आहे. याबाबतीत भर द्यायचे मुद्दे कोणते, हे पाहू.
आकडेवारी
ऊर्जा, कृषी उत्पादन, वेगवेगळया क्षेत्रांचा GDP मधील वाटा वरील स्रोतांमधून अभ्यासायचा आहे. नवे करांचे दर, नवे व्याजदर, सार्वजनिक वित्तामधील सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत व त्यांची टक्केवारी आणि खर्चाचे मुद्दे व त्यांची टक्केवारी, परकीय कर्ज इत्यादीबाबतीत अद्ययावत आकडेवारी अर्थसंकल्पातून जमवायची आहे.
परदेशी व्यापारातील सर्वात मोठे व कमी भागीदार, परकीय गुंतवणूक (सर्वात जास्त व कमी करणारे देश तसेच कोणत्या राज्यात सर्वात जास्त / कमी गुंतवणूक, कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त /कमी गुंतवणूक इ.) इत्यादीबाबतची अद्ययावत आकडेवारी माहिती असणे आवश्यक आहे.
आयात व निर्यातीच्या बाबतीत सर्वात कमी व जास्त अशा बाबी, देश, देशांचे समूह, वस्तू, सेवा, उत्पादने या मुद्यांबाबत पाहायला हव्यात. जागतिक व्यापारातील वाटा हा मुद्दाही उत्पादन सेवांबाबत महत्त्वाचा आहे.
ही आकडेवारी भारताचा आर्थिक पाहणी अहवाल व महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल यातूनच पाहायची आहे.
भारताचे इतर देशांशी झालेले महत्त्वाचे आर्थिक करार संबंधित देश व मुख्य तरतुदी अशा कॉलममध्ये तयार करावेत.
महाराष्ट्रातील काही प्रकल्प, योजना यांसाठी आंतरराष्ट्रीय संस्था / दुसऱ्या देशांशी करार झालेला असल्यास त्याचाही अभ्यास आवश्यक आहे.
साक्षरता, लोकसंख्येची रचना (वय, लिंग, गुणोत्तर), बाल लिंग गुणोत्तर, नागरी व ग्रामीण लोकसंख्या या मुद्दय़ांच्या आधारे देशातील राज्ये व राज्यातील जिल्ह्यांचा तुलनात्मक अभ्यास करायला हवा.
यामध्ये प्रत्येक मुद्यातील पहिले व शेवटचे तीन घटक, महाराष्ट्राच्या मागची व पुढची राज्ये अशी तथ्ये मांडून नोट्स काढता येतील.
राज्यातील जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारेच पहिले व शेवटचे तीन तीन जिल्हे घेऊन नोट्स काढता येतील.
केंद्र व राज्य सरकारच्या प्रस्तावित / नव्या योजना
केंद्र व राज्य शासनाच्या विशेष प्रसिद्धी दिल्या जाणाऱ्या योजनांवर भर देऊन आरोग्य, शिक्षण, रोजगार, कृषी, लघु उद्योग, सामाजिक विमा, सामाजिक प्रवर्गासाठीच्या विशेषत: महिलांसाठीच्या योजना यांचा अभ्यास करावा.
योजनेचे ध्येय, उद्दिष्टे, स्वरूप, खर्चाची विभागणी, अंमलबजावणी करणारी यंत्रणा, असल्यास लाभार्थ्यांचे निकष, शिफारस करणारा आयोग / समितीचे नाव इ. बाबी प्रस्तावित योजनांच्या संदर्भात पाहाव्यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्त्वाचे जागतिक अहवाल आणि निर्देशांक
विविध आंतरराष्ट्रीय अहवालांतील भारताचे, शेजारील देशांचे स्थान (व प्राप्त अंक) आणि या अहवालामधील प्रथम व शेवटच्या स्थानावरील देश माहीत असायला हवेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व महाराष्ट्र या तिन्ही पातळय़ांवरील मानव विकास अहवाल (HDI)माहीत असावेत.
UNO, जागतिक बँक समूह व त्यांच्या सहयोगी संस्थांकडून प्रकाशित होणारे जागतीक भूक निर्देशांक, लिंगभाव असमानता निर्देशांक, ईझ ऑफ डुइंग बिझनेस अहवाल, जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक, जागतिक जोखीम निर्देशांक अशा निर्देशांकांबाबत अद्ययावत माहिती करून घ्यावी. चालू घडामोडींच्या अद्ययावत संदर्भ साहित्यातून ही आकडेवारी मिळते मात्र यासाठी संबंधित संस्थांचे संकेतस्थळ वापरणे जास्त उपयुक्त ठरते.
दारिद्रय़/ भूक/ लिंगभाव असमानता/ मानव विकास या निर्देशांकाच्या मापनाची पद्धत, त्यातील घटक यांची माहिती असायला हवी.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc mantra economy study current affairs financial social development component current affairs economy amy
First published on: 04-05-2022 at 00:57 IST