ज्याविद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेश शिक्षणाचा मार्ग खुणावतो, त्यांच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी तसेच वैद्यक शाखेच्या पदवी शिक्षणासाठी बारावीनंतर प्रवेश घ्यायचा असेल तर रशिया, चीन, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन यांसारख्या देशांचा पर्याय म्हणून विचार करता येईल. जर्मनी – अमेरिकासारख्या या देशांमधील विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती संपादन करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असून गुणवान विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. रशियात वैद्यक, तसेच अभियांत्रिकीचे शिक्षण हे परवडण्याजोगे आहे.
अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण घेतलेल्या आणि पदव्युत्तर वैशिष्टय़पूर्ण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जर्मनी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तिथल्या अनेक विद्यापीठांमध्ये गुणवान विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या दिल्या जातात. केवळ इंग्रजी भाषेच्या चाचणीसाठी आय.ई.एल.टी.एस. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास जर्मन विद्यापीठातील प्रवेश सुकर होऊ शकतो. शिवाय जर्मनीमध्ये शिक्षण घेता-घेता आठवडय़ाचे २० तास काम करण्याची मुभा विद्यार्थ्यांना असते तसेच शिक्षण संपल्यानंतर दीड र्वष जर्मनीत राहण्याची सवलतही मिळते. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक संधी चालून येतात.
अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणासाठी विदेशातील एक पर्याय म्हणून अमेरिकेचा विचार करता येईल. मात्र टोफेल आणि जीआरई प्रवेश परीक्षांची उत्तम तयारी विद्यार्थ्यांना करावी लागेल. शुल्काच्या बाबतीत अमेरिका महाग असली तरी जर विद्यार्थ्यांचा स्कोअर उत्तम असेल तर शिष्यवृत्ती संपादन करता येते. ज्यांना एम.एस. न करता एम.बी.ए. करायची इच्छा असेल अशा विद्यार्थ्यांनी ‘जीमॅट’ची तयारी करावी. ज्या विद्यार्थ्यांना कमी कालावधीत डिग्री मिळवावी असे वाटते,  अशा विद्यार्थ्यांनी आर्यलड आणि ब्रिटनचा पर्याय निवडण्यास हरकत नाही. कारण इथे मास्टर डिग्री एक वर्षांची असून शुल्कही आवाक्यात आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर करिअरचे अनेक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी परदेशी स्थायिक होण्याची इच्छा असेल त्यांनी कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या पर्यायांचा विचार करावा.
प्रवेश परीक्षेचा विचार करता केवळ इंग्रजी विषयाची आय.ई.एल.टी.एस.ची परीक्षा अमेरिका आणि कॅनडा वगळता इतर सर्व देशांतील विद्यापीठांच्या प्रवेशासाठी ग्राह्य़ धरली जाते. अमेरिकेतील काही विद्यापीठांत केवळ आय.ई.एल.टी.एस. आणि १५ वर्षांची शैक्षणिक पाश्र्वभूमी ही अर्हता ग्राह्य़ धरली जाते. ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे शक्य नसते त्यांना बँकेचे शैक्षणिक कर्ज कमी व्याजदरांत उपलब्ध होऊ शकते.
परदेशी विद्यापीठांमध्ये विषय निवडीबाबत अनेक पर्याय उपलब्ध असतात आणि विषय निवडीचे स्वातंत्र्यही मुबलक असते. आज उच्च शिक्षणासाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या या देशांव्यतिरिक्त फ्रान्स, सिंगापूर, स्वीडनसारख्या देशांतील निरनिराळे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना खुणावू लागले आहेत. हॉटेल मॅनेजमेंटसारख्या विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वित्र्झलडचाही विचार करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New options of higher education
First published on: 14-07-2014 at 01:06 IST