विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळायला हवे आणि त्यासाठी त्यांना हाताने काम करण्याची संधी मिळायला हवी, याकडे जगभरात सुरू असलेल्या शिक्षणविषयक संशोधनांचा रोख आहे. कार्यकेंद्री शिक्षण म्हणजे नेमके काय, त्याचा समावेश शालेय शिक्षणात कसा करता येईल आणि त्याची उपयुक्तता याचे सविस्तर विश्लेषण करणारी लेखमाला-
उत्पादक कामाचे शिक्षणाचे माध्यम म्हणून असलेले महत्त्व विविध शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण आयोगांनी मान्य केले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (२००५)मध्ये ज्ञानरचनावादाचा पुरस्कार केला आहे. अभ्यासक्रम बनवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये १) शाळेतील ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध असावा. २) शिकणे हे घोकंपट्टी नसेल ३) अभ्यासक्रम हा पाठय़पुस्तकांपर्यंत मर्यादित नसेल असे सुचवले आहे. प्रत्यक्ष कामातील सहभागातून विद्यार्थी ज्ञानाचे रूपांतर अनुभवात करू शकतील. त्यातून त्यांच्यात विविध मूल्ये, व्यवहारज्ञान, सृजनशीलता विकसित होतील व त्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच ‘कामातून’ शिक्षण देण्याचे सुचवले आहे. माध्यमिक स्तरावर शाळेत व समाजातील उत्पादन होत असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे असे अपेक्षिले आहे. मात्र प्रत्यक्ष कृती करण्याबाबत सर्व पातळीवर शांतता आहे.
शाळांमध्ये शास्त्र विषयात जे प्रकल्प केले जातात ते बऱ्याच वेळी विद्यार्थी व पालकांनी घरीच करायचे असतात. प्रकल्पांचे स्वरूप बऱ्याच वेळा सव्‍‌र्हेक्षण किंवा वहीत फोटो चिटकवणे इ.पुरते मर्यादित राहते, असा अनुभव आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ‘हाताने काम करायची संधी’ द्यायला आपण कमी पडत आहोत. अशा सर्व उपक्रमांचा समावेश हा ‘शाळाबाह्य़ उपक्रम’ किंवा शिक्षणेतर उपक्रम म्हणून केला जातो. थोडक्यात, जे शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वाचे व शिक्षणशास्त्रावर आधारलेले आहे ते सर्व अवांतर किंवा शाळाबाह्य़ उपक्रमाअंतर्गत अशी आजची परिस्थिती आहे. शिक्षणविषयक आराखडय़ातील उद्देश प्रत्यक्षात आणण्याची इच्छाशक्ती आपण दाखवणार नसू तर शिक्षणात परिवर्तनाची आशा कशी करता येईल?
‘कार्यानुभव’ विषयाची दुर्दशा
शालेय शिक्षणाची जी १५ उद्दिष्टे राज्य अभ्यासक्रम आराखडय़ात दिली आहेत त्यापकी ७ उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी व प्राथमिक शिक्षणाच्या १८ पकी नऊ उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांनी हाताने काम करणे आवश्यक आहे. मात्र कार्यानुभव विषयाला केवळ चार शालेय तासिका दिल्या आहे. त्यातील ५० टक्के वेळ हा माहिती तंत्रज्ञान विषयाला दिला आहे. म्हणजेच आठवडय़ाला केवळ दोन तासिका (एक घडय़ाळी तास) हा हाताने काम करण्यास दिला आहे. या विषयासाठी असलेला अपुरा वेळ, साधनाची कमतरता यामुळे या विषयाअंतर्गत काही ठोस होत नाही. काही शाळांमध्ये संगणक हा विषय कार्यानुभवाला पर्याय म्हणून दिला आहे. संगणक हे साधन आहे, त्याचा वापर येणे आवश्यक आहे; पण त्यासाठी विद्यार्थ्यांमधील बुद्धिमत्ता विकासासाठी आवश्यक असे विविध कार्यानुभव देणे ही शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी आहे. शिक्षण हक्क कायद्यात अर्धवेळ कार्यानुभव शिक्षकाची तरतूद केली आहे. काही प्राथमिक शाळांमध्ये गावातील कुशल व्यक्तींना या विषयासाठी मानद शिक्षक म्हणून बोलावणे सुरू झाले आहे. मात्र हे खूप तोकडे असून अजून खूप करण्याची गरज आहे.
माध्यमिक स्तर पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम
महाराष्ट्रात इ. आठवी ते इ. दहावीसाठी व  v1, v2, v3 असे तीन पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी फार गोंधळाची स्थिती आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमात इ. आठवीसाठी पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रमाचा समावेशच केलेला नाही. व्यवसाय शिक्षण खात्याने नवीन शाळांना या अभ्यासक्रमास मान्यता देण्यासाठी अनावश्यक आर्थिक व पायाभूत सुविधांच्या अटी घातल्या आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकसन अभियानाअंतर्गत इ. ९वीपासून व्यवसाय शिक्षणाचा समावेश करण्याची घोषणा झाली. इ. नववीपासून व्यवसाय शिक्षणाची स्वतंत्र व सध्याची प्रचलित पुस्तकी शिक्षणाची स्वतंत्र शाखा अशा समांतर व्यवस्था या धोरणात प्रस्तावित आहे. उद्योगांना लागणारे कुशल कामगार बनविण्यासाठी व ज्यांना उच्च शिक्षण घेता येत नसेल त्यांच्यासाठी ही समांतर व्यवस्था असेल.
‘कार्यकेंद्री’ पद्धतीत अपेक्षित, सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वागीण विकासासाठी ‘उत्पादक कामातून’ शिक्षण यात प्रस्तावित नाही. थोडक्यात, केवळ अपरिहार्य परिस्थितीमुळेच विद्यार्थी या व्यवस्थेत जातील. प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्या क्षमतेचा पूर्ण विकास करता येईल असे शिक्षण देणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असायला हवे. केवळ कुशल कामगार पुरवणे हे माध्यमिक शिक्षणाचे उद्दिष्ट कसे असू शकेल? आपल्याला या देशाची ओळख केवळ कामगारांचा देश करायची आहे की उद्योजकांचा, संशोधकांचा, कलाकारांचा, उद्दमशील समाज देश असा करायची आहे? यावरच आपल्याला केवळ नोकरी देणारे शिक्षण द्यायचे की सर्वागीण कार्यकेंद्री शिक्षण द्यायचे, हे ठरणार आहे.
मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख
(Introduction to Basic Technology (IBT) –
आपल्याकडील इ. आठवी ते दहावीचा अभ्यासक्रम (५1) हा विषय कार्यकेंद्री शिक्षणाच्या दिशेने जाणारा आहे. महाराष्ट्रातील ९०हून अधिक शाळांमध्ये हा अभ्यासक्रम राबवला जातो. यात विद्यार्थी अभियांत्रिकी, ऊर्जा पर्यावरण, शेती पशुपालन, गृह आणि आरोग्य या विविध कौशल्यांचे शिक्षण प्रत्यक्ष काम करत घेतात. शिकताना विविध समाजोपयोगी कामे विद्यार्थी करतात. उदा. तांदूळवाडीतील (सातारा) शाळेतील विद्यार्थ्यांनी दसऱ्याला झेंडूचे पीक घेतले व जवळच्या कंपन्यांना हार बनवून विकले व शाळेला सुमारे २० हजार रु. मिळवून दिले. गावडेवाडी शाळेने पाणी साठवण्याचा बंधारा बांधला व शाळेत उसाचे उत्पन्न घेऊन कारखान्याला तो पुरवला. चिखलगाव शाळेतून छएऊ बल्बचे कमी खर्चातील दिव्याचे उत्पादन व विक्री केली जाते. गावातील विहिरींची पाणी व माती परीक्षण, इंटरनेटचा वापर करून शेतीविषयक सल्ला मिळवणे, शोषखड्डे तयार करणे, फॅब्रिकेशन सेवा, इलेक्ट्रिकलच्या उपकरणांची दुरुस्ती अशा विविध ८५ प्रकारच्या तंत्रज्ञानावर आधारित सेवा कइळ शाळांमार्फत दिल्या जातात. असे शिक्षण आपल्या शाळेत नेण्याचा आग्रह आता पालक व शिक्षक यांनी धरायला हवा.
महाराष्ट्रात म. गांधींनी ‘नयी तालीम’ची सुरुवात केली. विनोबा, तुकडोजी महाराजांनी जीवन शिक्षणात कृतिशील शिक्षणाचा आग्रह धरला. महाराष्ट्रात आनंद निकेतन, सृजन आनंद, विज्ञान आश्रम यांसारख्या अनेक संस्थांनी कार्यकेंद्री शिक्षणाचे प्रयोग केले आणि समर्थ पर्याय दाखवून दिले.  राज्य सरकारनेही अशा कामांना वेळोवेळी सहकार्य केले, कामांना मान्यता दिली. त्यामुळे शालेय शिक्षणात केवळ उपजीविकेसाठी, उद्योगांची मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी म्हणून ‘व्यवसाय शिक्षण’ नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकासासाठी कार्यकेंद्री शिक्षणाचा मार्ग देशापुढे ठेवणे ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे.
(समाप्त)