कामाच्या ठिकाणचे वातावरण, कंपनीची कार्यसंस्कृती आणि कर्मचाऱ्यांची नैतिकता या साऱ्याचा कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होत असतो. त्याविषयी..
आपल्या कामाच्या ठिकाणी ज्या नतिक तत्त्वांचे, वर्तणुकीच्या नियमांचे अथवा मूल्यांचे आपण पालन करतो त्याला आपल्या कामाशी निगडित असलेले नीतिशास्त्र म्हणता येईल.
ऑफिसमधले वातावरण, कंपनीची कार्यसंस्कृती आणि आपले नीतिशास्त्र याची सांगड घालताना अनेकांना त्रास होऊ शकतो. नतिक जबाबदाऱ्यांची जाणीव नसणाऱ्या किंवा नीतीमूल्यांचे पालन न करणाऱ्या सहकाऱ्यांशी जुळवून घेणे कष्टाचे होते आणि मनस्ताप वाढतो.
कामाच्या जागी वरिष्ठ अथवा कनिष्ठ सहकारी आणि ग्राहकवर्ग अशा तीन प्रकारच्या व्यक्तींसोबत सतत संबंध येत असतो. प्रत्येकाच्या वर्तणुकीतून नीतिमत्तेचे दर्शन इतरांना कधी कळत-नकळत घडत असते. ही गोष्ट केवळ त्यांच्या वागणुकीतूनच नव्हे, तर ऑफिसमधल्या वस्तूंच्या दुरुपयोगातून किंवा गरवापरातून दिसून येतो. आता ऑफिसमध्ये गरवापर करण्याजोग्या कुठल्या वस्तू असू शकतात? कंपनीहिताविरुद्ध केलेले कोणतेही बेकायदेशीर, अनतिक किंवा बेजबाबदार कृत्य म्हणजे गैरवर्तणूकच म्हणायला हवी. यात  पशांची किंवा सामानाची चोरी, लाच घेणे, लाभ पदरात पाडण्यासाठी कारण नसताना सवलत देऊ करणे, सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे, सामानाची तोडफोड, रेकॉर्डसमध्ये फेरफार करणे, हिशेबात फेरफार करणे, गोपनीयताचे उल्लंघन करणे, गोष्टींचा विपर्यास करणे, इत्यादी.
साधारणत: वरिष्ठ अधिकारी लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतात- पेन्सिल, रबर सारख्या स्टेशनरी वरचेवर गायब होणे, व्यक्तिगत कामाच्या फोटो कॉपीज काढणे, कार्यालयीन दूरध्वनीवरून बाहेरगावचे फोन लावणे वगैरे. मात्र, जेव्हा या गोष्टी हाताबाहेर जाऊ लागतात, तेव्हा नियमांचा बडगा उगारला जातो आणि मग सर्वाच्याच अधिकारांवर गदा येते.
एका कार्यालयात कागदपत्रांचे फारसे काम नसलेल्या एका कर्मचाऱ्याकडून स्टेशनरीच्या मागणी यादीत लाल पेनांची संख्या जरा जास्तच आढळून आली. त्याच्या इतर सहकाऱ्यांकडे चौकशी केल्यावर कळले की, त्याची पत्नी शिक्षिका असून त्या लाल पेनांची गरज तिला अधिक होती! विमान प्रवासाचा भत्ता मिळत असताना रेल्वेचा प्रवास करून वरची रक्कम स्वतच्या खिशात घालणे हे तर सर्रास आढळून येते. अनुभवाने शहाणे झालेल्या कंपन्या आता भत्ता देण्याआधी विमानाचे तिकीट न मागता बोर्डिंग पास म्हणूनच मागतात.
ही सारी कृत्ये गैर नव्हेच, अशीच या कर्मचाऱ्यांची मानसिकता असते.  ‘एकच पेन्सील तर आहे’, ‘कंपनीला काय फरक पडतो मी विमानाने आलो की ट्रेनने? पोहोचल्याशी मतलब’, ‘मी तर कधीतरीच कलकत्त्याला फोन करते. माझ्या एका फोनने कंपनीच्या बिलात असा कितीसा फरक पडणार आहे?’, ‘सर्वच करतात. मग मी का करू नये?’ अशी तकलादू समर्थनेही दिली जातात. मात्र, जर हजारो कर्मचारी असे वागू लागले की, कंपनीचे काय होऊ शकते हा विचार त्यांच्या मनाला स्पर्शही करत नसेल.
‘कॉस्ट कटिंग’ च्या जमान्यात मोठय़ा कंपन्यांनी अशा अनेक गैरवर्तणुकीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. नोकरीच्या सुरुवातीसच बहुतांश सर्वच कार्यालयांमध्ये होणाऱ्या ‘इंडक्शन प्रोग्राम’मध्ये ‘वर्क प्लेस एथिक्स’ची सविस्तर माहिती दिली जाते. कर्मचाऱ्यांकडून कशा प्रकारचे वर्तन अपेक्षित आहे हेही सांगितले जाते. शिवाय सर्वाना समान वागणूक, उत्कृष्ट कामगिरी बजावल्याचे कौतुक, योग्य वेतन आणि कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण निर्मिती ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
कामाचे नीतिशास्त्र राखण्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. ‘वर्क प्लेस एथिक्स’ चे अनुकरण न केल्यास ते कर्मचाऱ्यांचा विश्वास गमावून बसतात. गरकृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे कर्मचारी सर्वासमोर उघडे पाडतात, ज्याला इंग्रजीत ‘व्हिसल ब्लोईंग’ म्हणतात.
आपल्याभोवती अशा गोष्टी होत असताना एक प्रामाणिक कर्मचाऱ्याची भूमिका काय असू शकते? सर्वसाधारणपणे अशा गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करणे ते पसंत करतात, अन्यथा इतर सहकारी/वरिष्ठांबरोबर या मुद्दय़ावर चर्चा केली जाते आणि अगदीच सर्व असह्य झाले तर नव्या नोकरी शोधण्याच्या प्रयत्नाला ते लागतात.
आपल्या कामाचे वातावरण, कंपनीची कार्यसंस्कृती आणि नीतिशास्त्र हे आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करते. तेव्हा काही करण्याआधी आपण या सर्वाचा विचार करून पाऊल उचलले, तर ते आपल्याच फायद्याचे ठरू शकते.