नेहमी मनातले विचार कागदावर उतरवा. प्रत्येक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यातील कामाच्या याद्या, उपयाद्या तयार करत राहा. त्याचा पडताळा घेत तुमच्या योजनांमध्ये सुधारणा आणि उजळणी करत राहा. त्या परिपूर्ण होईपर्यंत अधिकाधिक चांगल्या बनवण्याचा प्रयत्न करा.
लक्षात असू द्या, नियोजन हे एक कौशल्य आहे. ते शिकता येते. तुमची विचार करण्याची, योजना बनवण्याची, आयोजनाची आणि तुमच्या ध्येयाच्या दिशेने कृती करायला पुढाकार घेण्याची क्षमता तुम्हाला तुमच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहोचवू शकते.
‘कागदावर विचार’ करण्याचा एक मार्ग म्हणजे बहुआयामी ध्येय साध्य करण्यासाठी प्रकल्प, नियोजनपत्रक तयार करणं. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला उचलाव्या लागणाऱ्या पावलांची एक दृश्य प्रतिमा तयार करता. नियोजनाच्या प्रक्रियेतील शक्तिस्थाने आणि कमकुवत बाबींबद्दल तुमचे डोळे उघडण्यासाठी हे खूप मदतीचं ठरू शकतं.
प्रकल्प नियोजनामध्ये तुम्ही कागदावर वरच्या बाजूला प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जितका कालावधी लागेल, त्याची नोंद करा. प्राधान्यक्रमानुसार जी कामं तुमचं ध्येयं साध्य करण्यासाठी करायला हवीतच,  अशा सर्व कामांची यादी तयार करा. त्याची क्रमवार नोंद करा.
उजवीकडील खालच्या कोपऱ्यात तुमचा अंतिम, आदर्श परिणाम कसा दिसेल ते स्पष्टपणे लिहा. इच्छित ध्येयाबद्दल तुमच्याकडे जितकी जास्त स्पष्टता असेल तितकं त्याच्यापर्यंत पोहोचणं तुम्हाला सोपं जाईल. काही कामे एकत्रितपणे केली जाऊ शकतात. काही कामं काही अवधीनंतर हाती घेता येतील. प्रकल्प नियोजन पत्रकामुळे तुमचं संपूर्ण ध्येय तुमच्यासमोर मांडलेलं असल्याने तुम्ही मोठय़ा स्पष्टपणे ते मांडू शकाल. कदाचित आयत्यावेळच्या काही बदलांमुळे तुमच्या योजनेतही फेरफार करावे लागू शकतात, हेही लक्षात असू द्या.
गोल्स – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – गीतांजली गीते, साकेत प्रकाशन,
पृष्ठे – २५६, मूल्य – २२५ रु.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Planning a skill
First published on: 02-12-2013 at 07:42 IST