प्रस्तुत लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर-२ मधील राज्यव्यवस्था आणि राजकीय प्रक्रियांविषयक घटकाची गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या अनुषंगाने चर्चा करूयात. या घटकामध्ये केंद्र व राज्य यांमधील सत्ता विभाजन, राज्य व केंद्र सरकारचे अधिकार व कामे, संघराज्यीय रचनेशी संबंधित मुद्दे व आव्हाने, कायदेविषयक, कार्यकारी व वित्तीय अधिकार, स्थानिक स्तरापर्यंत अधिकारांचे विकेंद्रीकरण व आव्हाने तसेच शासनाच्या कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व कायदेमंडळाची कामे आणि परस्परांच्या अधिकारक्षेत्रात त्यांचा हस्तक्षेप आदी बाबींवर प्रश्न येऊ शकतात. मागील तीन वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले काही प्रश्न आपण अभ्यासूयात. त्यायोगे आपल्याला या घटकाचे आकलन करणे सुलभ होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘२०१३ च्या यूपीएससी मुख्य परीक्षेमध्ये सर्वोच्च न्यायालय संसदेच्या घटनादुरुस्तीविषयक अर्निबध अधिकारावर मर्यादा आणते,’ टीकात्मक चर्चा करा असा प्रश्न विचारण्यात आला होता. राज्यघटनेतील कलम ३६८ नुसार घटनादुरुस्तीचे अधिकार फक्त संसदेलाच आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने आणलेल्या ‘मूलभूत संरचना’ सिद्धांतामुळे संसदेला मूलभूत संरचनेमध्ये परिभाषित बाबींमध्ये दुरुस्ती करता येत नाही. परिणामी, संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार अर्निबध नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ‘न्यायिक पुनरावलोकन’ ही बाबही मूलभूत संरचनेच्या कक्षेत आणली, पण यामुळे न्यायपालिका कायदेमंडळाच्या अधिकारक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करते, असा नेहमीच आरोप होतो. उदा. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने संसदेने केलेली न्यायिक नियुक्ती आयोग (NJAC) विषयक घटनादुरुस्ती रद्दबातल ठरवली. यामुळे न्यायपालिका व कायदेमंडळ यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. पण न्यायपालिका, कायदेमंडळ यांमधील परस्परसंबंध निकोप ठेवण्यासाठी त्यांच्या अधिकारांमध्ये संतुलन असावे. NJAC चे उदाहरण पाहता कायदेमंडळाच्या अधिकारक्षेत्रात न्यायपालिकेने किती मर्यादेपर्यंत हस्तक्षेप करावा हे ठरवण्याची गरज आहे. वरील प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपरोक्त बाबींसोबत समर्पक उदाहरणे देणे आवश्यक आहे. याकरता संविधानिक तरतुदींबरोबरच वृत्तपत्रे व मासिकांतील याविषयीचे विशेष लेख पाहावेत.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political system and the political process study in upsc exam
First published on: 11-04-2016 at 01:10 IST