संशोधन हे केवळ अत्याधुनिक प्रयोगशाळेमध्येच केलं जातं, असं नाही. उपलब्ध साधनसामग्रीमधून वेगवेगळे प्रयोग करून त्यामधून नवनवीन उपकरणांची बांधणी करणारे अनेक ‘धडपडे’ लोक आपल्या देशात आहेत. हे लोक मिळेल त्या जागेत प्रयोग करत राहतात आणि मग हळूहळू ती जागाच प्रयोगशाळा होऊन जाते. या जागेत प्रयोग करणाऱ्या धडपडय़ा लोकांमध्ये दडलेला संशोधक जागा होतो आणि मग आपल्या रोजच्या जगण्यात भेडसावणाऱ्या समस्येवर तोडगा सापडतो. अशाच काही धडपडय़ा लोकांपकी एक आहेत सुखराम मिस्त्री!
झारखंडमधल्या पूर्वीच्या रांची जिल्ह्य़ाचे तीन जिल्ह्य़ांमध्ये विभाजन होऊन रांची, गुमला आणि लोहारडगा असे तीन जिल्हे निर्माण झाले. त्यापकी लोहारडगा या तुलनेने अप्रगत असलेल्या जिल्ह्य़ात सुखराम मिस्त्री हे राहतात. शिक्षणाबाबतीत म्हणाल तर ‘काला अक्षर भस बराबर’. पण आपल्या कामाची मात्र अत्यंत बारीकसारीक माहिती असणारा हा तुमच्या-आमच्यातील एक संशोधक. शिकण्याचं जेव्हा वय होतं, त्या वयात सुखराम मिस्त्रीच्या हातात कागद-पेन्सिलऐवजी स्क्रू ड्रायव्हर आणि पान्हे आले आणि गेल्या चार दशकांपेक्षा जास्त काळ सुखरामजी वेगवेगळी यंत्रं तयार करण्यात गढून गेले. सुखरामजींचे वडील हेच त्यांचे गुरू. सुखरामजी सांगतात, ‘माझे वडील म्हणायचे, आयुष्यात पशाच्या मागे लागलास तर फार तर इमारती बांधशील. पण स्वतला जर चांगला कारागीर समजतोस तर काहीतरी निर्माण कर आणि तुझी ही निर्मिती समाजाला उपयुक्त ठरायला हवी!’
तसं पाहिलं तर सुखराम मिस्त्रींचा मुख्य व्यवसाय इलेक्ट्रीशियनचा. जनरेटर, इंजिन अशा प्रकारची उपकरणं दुरुस्त करण्याचं काम सुखराम मिस्त्री करतात. इलेक्ट्रीशियनचा व्यवसाय सांभाळत असताना वेगळं काहीतरी निर्माण करण्याची ऊर्मी सुखरामना स्वस्थ बसू देईना. त्यादृष्टीने सुखरामजींनी वेगवेगळे प्रयोग करणं सुरू ठेवलं आणि त्यातूनच साकार झालं ते अनोखं वेल्डिंग मशीन!     
आपल्याला माहिती आहे की वेल्डिंग करण्यासाठी जे मशीन वापरलं जातं, ते थ्री फेज इलेक्ट्रिक सप्लायवर चालतं. पण सुखराम मिस्त्री यांनी तयार केलेलं वेल्डिंग मशीन सिंगल फेज इलेक्ट्रिक सप्लायवर चालतं. विशेष म्हणजे, सतत अनेक तासांसाठी हे मशीन वापरलं तरी ते फारसं गरम होत नाही की बंद पडत नाही. ग्रामीण भागात विजेचा प्रश्न गंभीर आहे आणि दिवसेंदिवस ही समस्या आणखीनच बिकट स्वरूप धारण करेल अशी चिन्हं आहेत. या पाश्र्वभूमीवर सुखरामजींनी तयार केलेलं वेल्डिंग मशीन म्हणजे वरदानच ठरावं. वीजपुरवठा अनियमित दाबाने जरी झाला तरी हे वेल्डिंग मशीन चांगल्या प्रकारे कार्यरत राहतं, असं सुखराम मिस्त्री म्हणाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लोहारडगामध्ये आज त्यांनी तयार केलेली ७० ते ८० वेल्डिंग मशीन वापरात आहेत.        
या वेल्डिंग मशीनची चाचणी रांची इथल्या बिर्ला इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयात कार्यरत असणाऱ्या संस्थेतल्या तज्ज्ञांनीसुद्धा घेतली आहे आणि त्यांनी दिलेल्या अहवालानुसार मिस्त्री यांनी तयार केलेलं वेल्डिंग मशीन खरोखरच चांगल्या गुणवत्तेचं आहे.
जनसामान्यांमधला संशोधक शोधून त्याने लावलेल्या शोधाला मान्यता प्राप्त करून देण्याचं महत्त्वाचं कार्य करणाऱ्या अहमदाबादच्या नॅशनल इन्होवेशन फाऊंडेशन या संस्थेने सुखराम मिस्त्री यांनी तयार केलेल्या वेल्डिंग मशीनची पाहणी गौहाटी आय. आय. टी. मधल्या तज्ज्ञांकडूनसुद्धा करवून घेतली. त्यांनीही या मशीनची प्रशंसा केली आहे. सुखराम मिस्त्री यांनी केलेल्या या निर्मितीबद्दल नॅशनल इन्होवेशन फाऊंडेशनने त्यांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवही केला आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये अशी शंभराहून अधिक वेल्डिंग मशीन तयार करून त्यांनी विकली आहेत. एक मशीन तयार करण्यासाठी सुखरामजींना साधारणपणे पाच ते सात दिवसांचा अवधी लागतो. ४० किलोग्रॅम वजन असलेल्या या वेल्डिंग मशीनची किंमत १२ हजार रुपये आहे. आता सिंगल फेजवर चालणाऱ्या मशीनबरोबरच डबल फेजवर चालणारं वेल्डिंग मशीनसुद्धा सुखरामजींनी तयार केलं आहे.
सुखराम मिस्त्री यांनी वेल्डिंग मशीनबरोबरच इतरही अनेक वेगवेगळी यंत्रं तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. विशेषत शेतीशी संबंधित यंत्रं तयार करण्यात त्यांना रुची आहे. हे सगळं करत असताना आपल्या वडिलांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता केल्याचं समाधान त्यांना लाभलं आहे.