डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटतर्फे राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एमफिल व पीएचडी करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे देण्यात येणाऱ्या विशेष शिष्यवृत्तींसाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनेअंतर्गत उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या २५ असून या शिष्यवृत्ती पात्रताधारक विद्यार्थ्यांना ह्य़ुमॅनिटीज, सामाजिक विज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान व अभियांत्रिकी यासारख्या विषयांतर्गत भारतीय विद्यापीठ वा संशोधन संस्थांमध्ये एमफिल वा पीएचडी करण्यासाठी देण्यात येणार आहेत.
विशेष सूचना : उपलब्ध शिष्यवृत्तींपैकी ३०% शिष्यवृत्ती महिला विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे निवासी असावेत व ते अनुसूचित जातींमधील असायला हवेत. त्यांनी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संशोधनपर शिष्यवृत्ती योजनेशिवाय एमफिल/ पीएचडी करण्याची तयारी असायला हवी.
योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची निवड झाल्यापासून दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्या संबंधित विषयातील संशोधनपर कामासाठी निर्देशित विद्यापीठ वा संशोधन संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांची निवड त्यांची पात्रता व गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.
उपलब्ध शिष्यवृत्तीचा तपशील : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल ज्युनिअर फेलोशिप व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल सीनिअर फेलोशिप देऊन त्यानुसार शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : योजनांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जून २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, पुणेची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि प्रस्तावित संशोधन विषयाच्या आलेखासह असणारे अर्ज डायरेक्टर जनरल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिचर्स अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, २८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे- ४११००१ या पत्त्यावर ३१ ऑगस्ट २०१३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.