पर्यावरणशास्त्र घटकाची तयारी
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पीएसआय, एसटीआय, असिस्टन्ट, सरळसेवा भरती तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा यांच्या एकूणच अभ्यासक्रम, परीक्षापद्धती व प्रश्नांचे स्वरूप यांमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. तसेच १० जून २०१२ रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेता अपेक्षेप्रमाणे २०१३ या वर्षी होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे स्वरूप केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर बदलले आहे. यापैकी सामान्य क्षमता चाचणी पेपर १च्या दिलेल्या अभ्यासक्रमातील भाग- ६ म्हणजेच पर्यावरणशास्त्र या विषयाच्या संदर्भात तयारीबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.
विषयाचे महत्त्व
गेल्या काही वर्षांत प्रकाशझोतात आलेल्या जागतिक तापमानवाढ, हरितगृह परिणाम, वनांची तोड, प्रदूषण, त्सुनासी लाटा या पर्यावरणातील अनिष्ट बदलांमुळे तसेच यामुळे झालेल्या जीवितहानी व वित्तहानीमुळे पर्यावरणासंबंधी अभ्यासाचे महत्त्व वाढले आहे.
रिओ-दि-जिनेरो (ब्राझील) येथे १९९२ साली
झालेल्या पहिल्या जागतिक वसुंधरा परिषद तसेच जोहान्सबर्ग (द. आफ्रिका) येथे शाश्वत विकासासाठी २००२ साली झालेल्या जागतिक परिषदेने
पर्यावरणातील होणाऱ्या अनिष्ट बदलांकडे जगाचे लक्ष वेधून घेतले. २०१२ मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या
रिओ-२१ परिषदेत असाच प्रयत्न झाला. त्यामुळे  जागतिक पातळीवर होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला अटकाव करायचा असेल, तसेच पर्यावरण संवर्धन करायचे असेल तर विविध देशांनी पर्यावरणासंबंधी केलेले कायदे व करार यांचे काटेकोर पालन
करणे आवश्यक आहे. तसेच शाश्वत विकासासाठी देशातील जनतेचा सहभाग मिळविताना अविकसित देश मागे राहणार नाहीत याची काळजी घ्यावयाची आहे. पर्यायाने एक प्रशासकीय अधिकारी म्हणून पर्यावरणासंबंधीच्या सर्व संकल्पना माहिती असणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रमाचे स्वरूप
हा अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेच्या संदर्भात जरी नवीन असला तरी व आयोगाने सध्या तरी या विषयासंदर्भात अभ्यासावयाचे मुद्दे दिले नसले तरी यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा, तसेच राज्यसेवा सामान्य अध्ययन पेपर-१, सरळसेवा भरती परीक्षा आलेल्या प्रश्नांवरून व दिलेल्या अभ्यासक्रमाशी संबंधीत मुद्दय़ांचा अभ्यास केल्यास या विषयाची परिपूर्ण तयारी होऊ शकते. वरील परीक्षांच्या संदर्भावरून या विषयासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे-
१) परिस्थिती विज्ञान व परिस्थितिक व्यवस्था- ऊर्जा प्रवाह, वस्तू-चक्र, अन्न शृंखला व अन्न जाळे.
२) पर्यावरण अवनती व संवर्धन-जागतिक परिस्थितिक असमतोल प्रदूषण व हरितगृह परिणाम.
३) हरितगृह परिणामातील कार्बन-डाय ऑक्साइड व मिथेनची भूमिका.
४)    जागतिक तापमानातील वाढ, जैवविविधतेतील घट आणि वनांचा ऱ्हास.
५)    पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे व पर्यावरणीय प्रभावाचे परीक्षण क्योटो प्रोटोकॉल व कार्बन क्रेडिट्स.
६)    शहरी कचरा व्यवस्थापन, सागरी संरक्षित क्षेत्र-१ व सागरी संरक्षित क्षेत्र -२.
७)        मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरण-पूरकविकास (शाश्वत-विकास).
८)        नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरण आपत्ती.
९)     पर्यावरणात संवर्धनात कार्यरत असलेल्या जागतिक पातळीवरील राज्य-राष्ट्र संघटना.
१०)    जैविक बहुविविधता व वतावरणातील बदल.
११)    एनर्जी पिरॅमिड, मिलेनिअम युको स्टिस्टीम असेसमेंट, फायटोप्लॅक्टॉन, मँग्रूव्ह अरण्ये, अभयारण्ये, मरीन  अपवेलिंग, बायोस्फीअर रिझव्‍‌र्ह, राष्ट्रीय अभयारण्ये, टर्मिनेटर सीड्स, ओझोन थराची झीज इ.
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
२०११ व २०१२ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये या घटकांवर १३-१४ प्रश्न विचारलेले आहेत. तसेच या घटकाला २०० गुणांपैकी २८-३० गुण होते. हेच स्वरूप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१३ तील पूर्वपरीक्षेत असण्याची दाट शक्यता आहे.
परीक्षाभिमुख तयारी
संबंधित विषयाच्या तयारीसाठी वरील अभ्यासक्रमाचे मुद्दे अभ्यासताना विद्यार्थ्यांनी संकल्पना स्पष्ट करण्यावर भर द्यावा  तसेच महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा. राज्यसेवा मुख्य  परीक्षा सामान्य अध्ययन-पेपर-१ व सरळसेवा भरती परीक्षा तसेच यूपीएससीची २०११ व २०१२ च्या पूर्वपरीक्षेतील संबंधित विषयावरील प्रश्न अभ्यासले तर नक्कीच फायदा होईल.
संदर्भ साहित्य
१)    पर्यावरणशास्त्र (मराठी):  (Textbook of Environmental (U.G.C. publication) studies By Erach Bharucha (मराठी अनुवाद कॉ. सिद्धिविनायक बर्वे)
२)    पर्यावरणीय भूगोल  (द. मेगास्टेटकार ए. बी. सवदी)
३)    स्टडी सर्कल प्रकाशन (डॉ. आनंद पाटील)
सामान्य क्षमता चाचणी पेपर-१ (नवीन अभ्यासक्रमानुसार)
४) विद्यार्थ्यांनी ‘केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालय’च्या वेबसाइटवर वेळोवेळी भेट द्यावी.
वेबसाइट पत्ता -www.enfor.nic.in.

*  डॉ. नितीन गाडिलकर
बीव्हीएससी अँड ए. एच.
 gadilkar.nitin@gmail.com.