वाटाघाटी करायला लागणे हा व्यावसायिक जीवनाचा अपरिहार्य/ अविभाज्य घटक आहे. आपण बरेचदा इतिहासात वाचतो की, युद्धात कमावले, ते तहात (वाटाघाटींमध्ये) गमावले. याचाच अर्थ वाटाघाटींसाठी मुत्सद्देगिरीची नितांत आवश्यकता असते. जॉन केनेडी यांचे खूप सुंदर वचन आहे- ‘भीतीपोटी कधीही वाटाघाटी करू नयेत, पण त्याचबरोबर वाटाघाटी करण्याची भीतीही वाटू नये.’ गेरी पॉल या विचारवंताचे म्हणणे आहे की, वाटाघाटींमध्ये फक्त आपलाच फायदा होईल, हे बघू नये. जोपर्यंत दोन्ही बाजूंना वाटाघाटींमध्ये समसमान लाभ दिसणार नाही तोपर्यंत वाटाघाटी सफल होणार नाहीत; तेव्हा आत्मसन्मान, व्यावसायिक हित यांना धक्का लागू न देता वाटाघाटींमधून जास्तीत जास्त लाभ कसा करून घ्यावयाचा, हे आता आपण पाहू या-

(१)    वाटाघाटी करताना हे सदैव लक्षात ठेवा की, समोरच्या बाजूकडून बरेचदा अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात. त्यामुळे सुरुवातीलाच हातचे राखून बोलणी करा. त्यामुळे वेळ पडल्यास दोन पावले मागे येता येते.

(२)    मानवी स्वभाव आहे की, वाटाघाटींमध्ये पहिला प्रस्ताव हा नेहमीच फेटाळण्याकडेच कल असतो तेव्हा शक्य असेल तर स्वत: प्रस्ताव प्रथम ठेवू नका. ती संधी समोरच्या पक्षास द्या.
(३) सर्वजण हातचे राखूनच सुरुवात करतात तेव्हा आपणही हे लक्षात ठेवून समोरच्या व्यक्तीचा पहिला प्रस्ताव सहसा मान्य करू नये.
(४) वाटाघाटी नेहमीच सहनशीलतेचा अंत पाहतात, तेव्हा ‘झट मंगनी पट ब्याह’ हा दृष्टिकोन ठेवून वाटाघाटीसाठी बसू नये.
(५) बरेचदा वाटाघाटीचा मसुदा आपल्या अपेक्षेप्रमाणे नसतो तेव्हा खांदे उडवून, नाक मुरडून वाटाघाटीचा प्रस्ताव मान्य नसल्याचे आपल्या देहबोलीद्वारे सुचवून समोरील पक्षास दबावात टाका. हाच हावभाव समोरच्या पक्षाला प्रस्तावाच्या अटी शिथिल करण्यास प्रवृत्त करेल.
(६) पण हेच जर वर्तन आपल्या प्रस्तावावर समोरच्याकडून झाले तर गांगरून जाऊ नका. तडकाफडकी बॅकफूटवर न जाता आपला प्रस्ताव, अटी, किंमत कशी बरोबर आहे हे शांतपणे पटवून द्या.
(७) वाटाघाटीस जाण्यापूर्वी आपला अभ्यास पक्का असावा. त्यामुळे आपली बाजू वरचढ होते. हा अभ्यास खालील गोष्टींबद्दल असावा-
    (अ) समोरच्या बाजूची गरज किती तातडीची आहे?
    (ब) आपल्या प्रस्तावावरील आक्षेप काय असू शकतात आणि ते कोणत्या कागदपत्रांद्वारे खोडले जाऊ शकतात?
    (क) आपला प्रस्ताव प्रतिस्पर्धी कंपनीपेक्षा कसा उजवा आहे वगैरे वगैरे.
(८) बरेचदा वाटाघाटी करताना आपण प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्यासमवेत  बोलत नसतो. अशा वेळी शक्यतो आपण अंतिम प्रस्ताव हा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीसोबतच्या भेटीसाठी राखून ठेवावा. बाकीच्या लोकांशी बोलताना आपले सर्व हुकमाचे पत्ते खुले करू नयेत.
(९)    समजा, वाटाघाटी करताना एखाद्या प्रस्तावावर विचार करायला, निर्णय घ्यायला जर आपणास वेळ हवा असेल तर तो अवश्य घ्या व वाटाघाटी तोपर्यंत काही काळासाठी स्थगित कराव्यात.
(१०)    वाटाघाटी करताना दोन्ही पक्ष समान पातळीवर कधीच नसतात. त्यामुळे वाटाघाटीत कधीतरी आपला विजय झाला, असा भास होतो किंवा कधीतरी आपली हार झाली, अशी भावना मनात येते. दोन्ही वेळेस आपला व्यक्तिगत अहंकार बाजूला ठेवला गेला पाहिजे. वाटाघाटी या मुद्यांवरच झाल्या पाहिजे, यात व्यक्तिगत हेवेदावे आल्यास वाटाघाटी फसतात व कधी कधी हिंसक रूपही घेऊ शकतात. वाटाघाटींमध्ये वैयक्तिक हितापेक्षा व्यावसायिक हितांना प्राधान्य दिले गेले पाहिजे.
(११) वाटाघाटींमधून काहीतरी अर्थपूर्ण तोडगा निघू शकतो, या सकारात्मक विचारांसह वाटाघाटी सुरू कराव्यात. जर वाटाघाटी ही फक्त औपचारिकता असेल तर त्या निर्थक ठरतात.
(१२)    वाटाघाटीमधून काहीच तोडगा दृष्टीपथात येत नसेल किंवा समोरचा पक्ष केवळ कालहरणासाठी तडजोडीची/ वाटाघाटीची औपचारिकता करत असेल तर वाटाघाटींमधून निषेध म्हणून बाहेर पडण्याचा मार्ग जरूर तेव्हा अवलंबवावा, पण हा शेवटचा उपाय असावा.
(१३)    सर्वात शेवटी म्हणजे वाटाघाटींमध्ये जो शब्द/ वचन दिले गेले असेल तो दोन्ही बाजूंनी प्रामाणिकपणे पाळावा. सौहार्द व विश्वासाचे वातावरण वृद्धिंगत करावे. यामुळे पुढील वाटाघाटींच्या वेळी दोन्ही पक्ष जास्त गांभीर्याने व आदराने एक-दुसऱ्यांचे म्हणणे/ आक्षेप ऐकून घेतात. यशस्वी व्यवस्थापक व्हायचे असेल तर वाटाघाटींचे कौशल्य प्राप्त करण्याला पर्याय नाही.