डॉ. उमेश करंबेळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिमखाना हा आपल्या रोजच्या वापरातला शब्द आहे. जिमखाना म्हणजे व्यायामशाळा किंवा विविध खेळ जेथे खेळले जातात अशी जागा, असा व्यवहारात अर्थ घेतला जातो. या शब्दाचे ‘जिम’ आणि ‘खाना’ असे दोन भाग आहेत. त्यातील ‘खाना’ हा मूळ फारसी शब्द. तो िहदीतही रूढ झाला आहे. तसेच त्याचा अर्थ खोली, कक्ष किंवा विभाग असा आहे. अंती खाना असलेले दवाखाना, फरासखाना, तोफखाना, कबुतरखाना, जिरायतखाना, हथियारखाना, किताबखाना, जनानखाना, हत्तीखाना असे अनेक शब्द आपल्या परिचयाचे आहेत. हत्तीखान्याला पिलखाना असाही शब्द आहे. या सर्व शब्दांचा अर्थही आपल्या चटकन ध्यानात येतो. विशिष्ट वस्तू ठेवण्याची खोली किंवा विशिष्ट कामाची जागा असा अर्थ त्यातून दिसून येतो. याशिवाय शेवटी ‘खाना’ असलेले काही अपरिचित शब्दही आढळतात. नंदकिशोर पारिक यांच्या ‘जयपूरजो था’ या जयपूर शहराच्या इतिहासावर आधारलेल्या गाजलेल्या पुस्तकात अनेक मजेशीर गोष्टी वाचनात येतात. महाराजा रामसिंह यांना पतंगबाजीचा षौक होता. त्यांचा पतंगखाना ‘पतंगोंकी कोठडी’ या नावाने ओळखला जाई. रामसिंहांचा मुलगा माधोसिंह पुस्तकप्रेमी होता. पहाटे उठल्यावर प्रथम सवत्स धेनूंचे शुभदर्शन होऊन दिवस चांगला जावा यासाठी त्याच्या सज्जापुढून गाईवासरं नेली जात. त्यासाठी ‘गौळखाना’ किंवा ग्वालेरा नेमलेला असे. हे सर्व शब्द बहुतांशी मुघलांच्या काळात किंवा मुघल साम्राज्यात रूढ झाले. उत्तरेकडील हिंदी भाषिक संस्थानांमध्ये या नावांचे विभाग असत आणि त्यात काम करणारे अनेकजण असत. कधी कधी या विभागांच्या प्रमुखांची आडनावेही त्यावरून तयार झालेली आढळतात. जसे, तोफखाने, जिरायतखाने, शिकारखाने इत्यादी. एकंदरित अंती खाना असलेले शब्द हिंदी भाषेतील आहेत हे आपल्या लक्षात येते, पण म्हणूनच जिमखाना हा शब्द कसा तयार झाला याचे कोडे आपल्याला पडते. कारण जिमखानामधील ‘जिम’ हा शब्द हिंदी नसून इंग्रजी आहे. आजकाल आधुनिक व्यायामशाळांना नुसतेच जिम असे म्हटले जाते.  मुळात जिम हा शब्द जिम्नॅस्टिक आणि जिम्नॅशियमचे लघुरूप आहे. शिवाय व्यायामशाळेसाठी तालीमखाना हा हिंदी शब्द पूर्वापार वापरात आहेच. मग जिमखाना शब्द कसा तयार झाला? असा प्रश्न पडतो. काही तज्ज्ञांच्या मते, जिमखाना हा शब्द गेंदखाना या शब्दापासून तयार झाला आहे. गेंद म्हणजे चेंडू. चेंडू खेळण्याची जागा म्हणजे गेंदखाना. कालांतराने ब्रिटिश राजवटीत खेळांच्या स्पर्धा जिथे आयोजित केल्या जात त्याला जिमखाना असे म्हटले जाऊ लागले असावे. अशा तऱ्हेने हिंदी आणि इंग्रजीच्या  मिश्रणातून हा शब्द तयार झाला. हल्ली अनेक वाहिन्यांवरील मालिकांत, कार्यक्रमांत हिंदी आणि मराठीचे मिश्रण होऊन तयार झालेली भाषा आपल्या कानी पडते. जिमखाना हा शब्द या हिंग्लिश भाषेच्या शब्दकोशातील एक आद्य शब्द समजण्यास हरकत नसावी.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Word sense gymkhana abn
First published on: 18-07-2019 at 00:32 IST