डॉ श्रीराम गीत

मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं तर वेगवेगळे कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. दर महिन्याला एक आगळीवेगळी करिअर घेऊन त्यातील हे कंगोरे खरे किती, का खोटे याचं वास्तव दाखवण्याचा हा आरसा’. जेव्हा एखादा मला गायनातच करिअर करायचे आहे असे म्हणतो तेव्हा समाज त्याच्याकडे, ‘हे काय नवीन खूळ काढले आहे? छंद म्हणून हवा तेवढा जोपासावा’, अशा नजरेने पाहिले जाते.

सर्व प्रकारच्या कलांमागे लागलेला राजाश्रय का लोकाश्रय, हा गुंता अजूनही सुटता सुटत नाही. शतकांनुशतके राजेरजवाडे होते तेव्हा गोष्ट फारच सोपी होती. राजद्वारी जायचे कला सादर करायची. नशीब फळफळले तर राजमहाला जवळच मुक्काम करायचा. जितके दिवस राजाची मर्जी तितके दिवस सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि ऐश्वर्याचे सुद्धा. असे नशीब कोणाचे, कधी, कोणत्या वयात उजळेल याची कधीही शाश्वती देता येत नसे. लोकाश्रय असलेले अगदी मोजके कलाकार स्वत:च्या ताकदीवर, देवालयांच्या देवडीवर, जत्रेतील फडामधे सेवा रुजू करत. ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्यांना धनिक आणि गावकरी याजकडून बिदागी मिळत असे. गेल्या शतकातील पहिली ७५ वर्षे हीच पद्धत रुजलेली होती. राजा हा शब्द जाऊन सरकारी संस्थांनी ज्यांना गुरुकुल पद्धतीत जागा दिल्या मदतीचा हात पुढे केला, ललित कला संस्था व विद्यापीठे स्थापन केली गेली तेथे ही कला रुजत गेली. संगीत व नाट्य यांना भरपूर लोकाश्रय मिळायला सुरुवात झाली ती सत्तरच्या दशकामध्ये. मात्र अजूनही चित्रकला, शिल्पकला, चलत चित्रपट यांचे नशिबी यशाची शक्यता पाच सहा टक्के पलीकडे जात नाही. प्रत्येकाला रोजी रोटी मिळण्याबद्दल हे वाक्य नसून कौतुक, मान्यता, पदके मिळून राजाश्रय /लोकाश्रय या संदर्भात आहे.

हेही वाचा >>> MSCE Pune Recruitment 2024 : पुणे शहरात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ पदांवर होणार भरती

संगीत क्षेत्रातील करिअर

शास्त्रोक्त संगीतासाठी आयुष्य वाहून द्यावे लागते हे आजही सर्व मान्य वाक्य आहे. किंबहुना संगीताच्या प्रांतातील अन्य कलाकारांना या मूळ स्राोताकडे जावेसे वाटते यातच सारे काही आले. मात्र गेल्या तीन दशकांमध्ये दूरदर्शन सोडून अन्य विविध संपर्क साधने अस्तित्वात आली आणि चित्र पालटू लागले. गाण्यांचे रिअॅलिटी शो या प्रकाराने तर सारीच धामधूम उडवून दिली आहे. सुरश्री लता मंगेशकर यांनीही या साऱ्या बद्दल बहुतेक वेळा प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पण जेव्हा दिल्या त्या वेळेला नाराजी व्यक्त केली. माध्यमांची संख्या वाढत गेली त्याच वेळेला यू-ट्यूब, स्पॉटिफाय, अशी विविध मोबाइलवर सुद्धा उपलब्ध असलेली अॅप्स सहजपणे सर्वांना उपलब्ध झाली. काराओके ही तर मोठीच क्रांती होती. कोणीही साथीदार नसताना स्वत: वाटेल त्या गाण्याची हवी तशी प्रॅक्टिस करता येणे घरोघरी अनेकांना शक्य होऊ लागले. अस्सलची हुबेहूब नकल करण्यासाठी कोणतीही साधने लागत नाही हे जेव्हा घरोघरी कळाले त्या वेळपासून संगीताचा ओढा केवळ ऐकण्या पुरता राहिला नाही. बाथरूम सिंगर या शब्दाला विसरायला लावून सहजपणे तो उपलब्ध झाला.

एक नामवंत संगीतकार सांगत होते, डॉल्बीमुळे गायकाच्या आवाजाचा अस्सल पोत काय आहे हे ओळखणे अशक्य बनते. त्यातून जेव्हा डिस्को जॉकी नावाचे भानगड अवतरली तेव्हापासून सलग गाणी ऐकण्याऐवजी मागणी केलेल्या गाण्याचे एखादे कडवे ऐकवायचे किंवा अनेक गाण्यांचा मॅशअप तयार करायचा यात जो जास्त माहीर त्याला मागणी व तीच करिअर बनू लागली. याचे आधी विविध ऑर्केस्ट्रांनी बऱ्यापैकी स्वत:चे बस्तान बसवले होते. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची कामे मिळणे कठीण झालेले अनेक नामवंत संगीतकार व गायक यांच्या जोड्या केवळ भारतातील विविध शहरातच नव्हे तर परदेशात सुद्धा दौरे करून मोठी कमाई करायला सुरुवात झाली होती.

हेही वाचा >>> MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

साथीला किंवा मध्ये मध्ये गायला उपलब्ध बरे कलाकार निवडून त्यांना संधी दिली जायची. अशा पद्धतीत दर दोन वर्षांनी नवनवीन कलाकारांना साथीला संधी मिळत असे. त्यातील काही मोजके स्वत:चे नाव प्रस्थापित करून छोटे मोठे कार्यक्रम करायला सुरुवात करत. असे सारे असले तरी गायक म्हणून प्रस्थापित व्हायला किंवा त्यातून बऱ्यापैकी उत्पन्न सुरू होण्यासाठी नवोदित गायकांना एखादे दशक सहज जाते. अतिशय उत्तम गाणारा गायक किंवा गायिका नवीन चालीवर नवीन संगीतकाराकडे काम करत नाही. सहसा जुनी गाजलेली गाणी पुन्हा मागणीनुसार म्हणणे हा पायंडा आता रुळून २५ वर्षे होतील. केवळ मराठी गाणी गाणारे गायक बहुतेक दुर्लक्षित राहतात. कारण ती गाणी सातत्याने जनतेच्या कानावर पडावीत अशी कोणतीही सुविधा सध्या सहज उपलब्ध नाही. संगीतकार कौशल इनामदार यांनी त्यासाठी खूप प्रयत्न केले. तरीही पुढे काय हा प्रश्न संपलेला नाही. संदीप व सलील यांचा खूप गाजलेला ‘आयुष्यावर बोलू काही’, या कार्यक्रमाची वेगळी आवृत्ती दुसरा कोणी अजून काढू शकलेला नाही.

पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये दर महिन्याला शास्त्रोक्त संगीताचे अनेक कार्यक्रम होतात. पण भारतीय दर्जाचे निमंत्रित गायकांच्या कार्यक्रमालाच भरगच्च प्रतिसाद मिळतो. अनेक बुजुर्ग गायक अश्या मैफिली असून अजूनही बाजूलाच पडले आहेत हेही समाज बघत असतो. सध्या वयाच्या २५ मध्ये कोरी करकरीत गाडी, तिशीमध्ये स्वत:चे घर, दरवर्षी एखादा परदेश दौरा अशा जीवन शैलीची स्वप्ने पाहणाऱ्यांना गायक बनण्याचे स्वप्न पाहणे अशक्य वाटते. तरीही हिंदी सिनेमा सृष्टीतील चकचकीत आकर्षक स्वप्नांमागे धावणाऱ्यांची संख्या अजूनही खूप मोठी आहे. समाजातील समजदार मंडळींना हे सारे माहीत असल्यामुळे जेव्हा एखादा मला गायनातच करिअर करायची आहे असे म्हणतो तेव्हा त्याचेकडे, ‘हे काय नवीन खूळ काढले आहे? छंद म्हणून हवा तेवढा जोपासावा’, अशा नजरेने पाहिले जाते. तीच अपेक्षा मल्हारकडून त्याचे बाबा करत होते. समाजातील अनेकांना, नातेवाईकांना अजूनही असच वाटत की मल्हारला नोकरी नसती तर हा खेळ यशस्वी झाला असता का? उत्तर शोधणे हे तर वाचकांचे काम.