एआयनं मानवी रोजगार खाऊन टाकण्याविषयी केल्या जात असलेल्या भाकितांमध्ये एलएलएमचा (लार्ज लँग्वेज मॉडेल) मोठा वाटा आहे. अर्थात एलएलएम माणसासारखा विचार करू शकत नाहीत. साहजिकच त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या मदतीनं ते प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. तसंच काही प्रसंगी एलएलमनं दिलेली उत्तरं साफ चुकीचीही असू शकतात.

नवनिर्मितीक्षम ऊर्फ ‘जनरेटिव्ह’ एआयच्या संकल्पनेच्या मुळाशी असलेली संकल्पना म्हणजे भाषेची विशाल प्रारुपं. तांत्रिक भाषेत याला ‘लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम)’ असं म्हणतात आणि आपणही क्लिष्टपणा टाळण्यासाठी एलएलएम हाच शब्द वापरणार आहोत. अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर एलएलएम हा संगणकामधला एक अत्याधुनिक प्रोग्रॅमच असतो. माणसाची लवचीक भाषा समजू शकणारा आणि तशाच भाषेमध्ये माणसाशी संवाद साधू शकणारा किंवा माणसाच्या प्रश्नांना उत्तरं देणारा हा प्रोग्रॅम असतो. चॅट जीपीटीचं तंत्रज्ञान अशाच एलएलएमवर आधारलेलं असल्यामुळे चॅट जीपीटी इतक्या सहजपणे आपला जवळपास कुठलाही प्रश्न पटकन समजून घेऊ शकतो आणि त्याला आपल्याला कळेल अशा भाषेत उत्तर देऊ शकतो.

एखादा अतिविशाल शब्दकोश आणि त्याच्या जोडीला तसाच अतिविशाल ज्ञानकोष यांचा संगम झाला तर काय होईल? याच्या जोडीला त्यात कुणीही काहीही विचारलं तर ते समजून घेण्याची, त्यानुसार आपल्याकडच्या सगळ्या माहितीची सांगड घालण्याची आणि विचारलेल्या प्रश्नाला अत्यंत समर्पक उत्तर देण्याची क्षमता मिसळली तर जे तयार होईल, ते म्हणजे एलएलएम. पुस्तकं, लेख, संकेतस्थळं यांच्या मोठमोठ्या साठ्यांमधली माहिती घेऊन एलएलएमला ‘प्रशिक्षित’ केलं जातं; म्हणजेच एलएलएमला हे सगळं शिकवलं जातं. साहजिकच एलएमएलकडे आपल्या जगाविषयीचं अफाट ज्ञान गोळा झालेलं असतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ज्ञान नुसतं त्याच्याकडे साठवलेलं असतं असं नाही, तर त्याचा वापर करून विचारलेल्या प्रश्नाचं शक्य तितकं अचूक आणि समर्पक उत्तर देण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण केलेली असते.

ओपन एआय कंपनीनं विकसित केलेलं चॅट जीपीटी हे आपल्याला ठाऊक असलेलं सगळ्यात लोकप्रिय एलएलएम असलं तरी खरं म्हणजे ते पहिलं यशस्वी एलएलएम नव्हे. त्यापूर्वी गुगल कंपनीचं बर्ट नावाचं एलएलएम खूप लोकप्रिय होतं आणि त्याचा वापरही मोठ्या प्रमाणावर होत असे. चॅट जीपीटीचं खरं यश म्हणजे माणसाच्या भाषेमधले प्रश्न समजून घेऊन त्यांना माणसासारख्या भाषेतच उत्तरं देण्याची किमया साधणं. म्हणजेच दृश्य स्वरूपात चॅट जीपीटीनं मोठी बाजी मारली. अभ्यासक, प्रोग्रॅमर अशा लोकांनी मात्र बर्ट या एलएलएमचा वापर अनेक वर्षांपासून केला आहे.

सर्वसामान्य लोकांना बर्टविषयी फारशी माहिती नसली तरी त्यांना चॅट जीपीटी मात्र ठाऊक असतं; यामागचं कारणही हेच आहे. बर्ट हे मुख्यत्वे नॅचरल लँग्वेज प्रॉसेसिंग (एनएलपी) वापरून माणसाची लवचीक भाषा समजून घेण्यासाठीचं आणि माहिती शोधण्यासाठीचं एलएलएम आहे. चॅट जीपीटी मात्र आपण गप्पा मारून हवी ती माहिती मिळवावी, अशा स्वरूपाचं एलएलएम आहे. चॅट जीपीटीची चौथी आवृत्ती सगळ्यात आधुनिक मानली जाते. तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कमालीची अचूक तर असतातच, पण शिवाय ती अगदी माणसाच्या भाषेसारख्या भाषेत दिलेली असतात.

जवळपास कुठल्याही गोष्टीसंबंधीचा प्रश्न विचारला तरी एलएलएम अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यासारखं उत्तर घेऊन तयार असतंच. तसंच प्रश्न विचारणाऱ्या माणसानं जरा चुकीच्या भाषेत किंवा स्पेलिंग चुकीचं टाईप करून जरी प्रश्न विचारला तरी त्याला एकंदर काय म्हणायचं आहे, हे एलएलएमला ‘समजतं’! हा खरोखरच चमत्कार आहे आणि म्हणूनच माणसाच्या जागी एलएलएमचा वापर विलक्षण झपाट्यानं वाढण्याची चिन्हं जागोजागी दिसतात. एआयनं मानवी रोजगार खाऊन टाकण्याविषयी केल्या जात असलेल्या भाकितांमध्ये एलएलएमचा मोठा वाटा आहे. अर्थात एलएलएम माणसासारखा विचार करू शकत नाहीत. साहजिकच त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या मदतीनं ते प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. तसंच काही प्रसंगी एलएलमनं दिलेली उत्तरं साफ चुकीचीही असू शकतात. त्यामुळे आपण दर वेळी त्यांच्यावर पूर्णपणे विसंबून राहणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं.

एलएलएमशी संबंधित असलेले अनेक रोजगार निर्माण होताना दिसतात. आपण त्याविषयी वेळोवेळी बोलणार आहोतच. त्यापूर्वी नवनिर्मितीक्षम एआय म्हणजेच एलएलएम असं आपण अगदी पूर्णपणे म्हणू शकत नाही. या दोघांमधलं नातं अत्यंत घट्ट असलं तरी नवनिर्मितीक्षम एआयमध्ये एलएलएमखेरीज इतरही घटक असू शकतात. उदाहरणार्थ एलएलएम हे मुख्यत्वे लिखित मजकुरासाठी असतं. त्यात चित्रं, चित्रफिती हे नसतं. तसंच समजा माहिती लिखित स्वरूपात असली तरी ठरावीक प्रकारच्या साचेबंद रूपात असेल तरी नवनिर्मितीक्षम एआयला ती वाचण्यात अडचणी येऊ शकतात. या सगळ्यासाठी आपल्याला एलएलएमपलीकडे जाण्याची गरज भासते. अशा अनेक मुद्दयांविषयी पुढच्या वेळी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

akahate@gmail.com