फारुक नाईकवाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षेतील वनसेवा मुख्य परीक्षा पेपर दोनमधील मृदा घटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. या घटकावर विचारण्यात आलेल्या मागील प्रश्नपत्रिकंमधील प्रश्नांचे विश्लेषणाच्या आधारावर तयारीसाठी लक्षात घ्यायचे मुद्दे कोणते ते पाहू.

मृदा घटकावर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या विश्लेषणाच्या आधारे या घटकाची तयारी करताना पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात:

मृदेची निर्मिती, घटक, वैशिष्ट्ये, समस्या, धूप या घटकांवर दरवर्षी प्रश्न विचारलेले दिसून येतात. त्यामुळे या मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.

मृदेच्या निर्मितीसाठी कारक घटक, मृदा निर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे आणि त्यांचे कारण व परिणाम हे आयाम बारकाईने समजून घ्यावेत. मृदा निर्मितीच्या प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर खडकांच्या विघटनातून निर्माण होणाऱ्या घटकांचे गुणधर्म, भौगोलिक स्थानवैशिष्ट्ये व घटक या सर्व घटकांचा मृदा निर्मितीवर होणारा परिणाम सविस्तरपणे अभ्यासायला हवा.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : ‘महासागर आम्लीकरण’ म्हणजे काय? त्याचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो?

मृदेतील हवा, पाणी, खनिजे, सेंद्रीय पदार्थ व सूक्ष्म जीव या मुख्य घटकांचे प्रमाण, त्यांची भूमिका, त्यांच्या प्रमाणामध्ये बदल झाल्यास होणारे परिणाम यांचा आढावा आवश्यक आहे. या घटकांचे प्रमाण आणि त्यांच्या भूमिका यांच्यावर भौगोलिक प्रक्रियांचा व विशिष्ट भौगोलिक परिस्थितीचा होणारा परिणाम समजून घ्यावा.

खडक स्त्रोतांमुळे मृदेमध्ये निर्माण होणारी रासायनिक, जैविक व भौतिक वैशिष्ट्ये, भौगोलिक स्थानवैशिष्ट्यामुळे मृदेमध्ये निर्माण होणारी जैविक वैशिष्ट्ये समजून घेतल्यास फायद्याचे ठरेल.

मृदेचे सर्वसाधारण रासायनिक, जैविक व भौतिक गुणधर्म समजून घ्यायला हवेत.

मृदेचा पोत, घनता, संरंध्रता (porosity), पार्यता (permeability). रंग, तापमान, लवचीकता या भौतिक गुणधर्मांचा स्वरूप, कारक घटक, परिणाम, असल्यास संबंधित सिद्धांत या मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करावा. यासाठी टेबलमध्ये नोट्स काढणे उपयोगाचे ठरेल.

मृदेचा सामू, मृदेची कॅटायन विनिमय क्षमता, बफर प्रक्रिया, स्फतिकाभ व कलिले (Crystelloids & colloids) व त्यांचे गुणधर्म तसेच त्यांचा मृदेच्या गुणधर्मांवर होणारा परिणाम व असल्यास त्याबाबतचे सिद्धांत यांचा अभ्यास आवश्यक आहे.

मृदेच्या जीवशास्त्रीय गुणधर्मांचा अभ्यास तिच्यामधील सेंद्रीय द्रव्ये व सूक्ष्मजीव यांवर भर देऊन करायला हवा. जीवाणू, कवक, शैवाल व आदिजीव या सजीवांचे मृदेमधील प्रमाण व त्यांचा मृदेच्या गुणधर्मांवर होणारा परिणाम समजून घ्यावा.

या व्यतिरिक्त गांडूळ व काही प्रकारचे कीटक इत्यादी सजीवांची मृदेच्या कार्यक्षमतेमधील भूमिका समजून घ्यावी. सूक्ष्मजीवांची मूलद्रव्यांच्या जैवरासायनिक चक्रातील भूमिकाही समजून घ्यायला हवी.

मृदेतील खनिजे व सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण व त्यावरून मृदेचे प्रकार समजून घ्यावेत. या घटकांची मृदेच्या उत्पादकतेमधील भूमिका समजून घ्यावी. या घटकांच्या अभावी आणि अतिरिक्त प्रमाणामुळे मृदेच्या उत्पादकतेवर होणारा परिणाम, समस्या व त्यावरील उपाय समजून घ्यावेत. या संपूर्ण मुद्द्याच्या टेबलमध्ये नोट्स काढता येतील व त्या उजळणीसाठी पुरेशा ठरतील.

मृदा रूपरेखा (soil profile) समजून घेण्यासाठी आकृती समोर ठेवून केलेल्या अभ्यासाचा जास्त चांगला फायदा होतो. मृदेच्या रचनेवर/ रुपरेखेवर हवामान, सूक्ष्मजीव, स्त्रोत खडक, कालावधी, भौगोलिक स्थानवैशिष्ट्य यांमुळे होणारा परिणाम यांचा आढावा घ्यायला हवा.

मृदेची धूप व तिचे प्रकार समजून घ्यायला हवेत. यामध्ये प्रत्येक प्रकारच्या धूपेची कारणे, स्वरूप, परिणाम, त्यामुळे होणारे मृदेची हानी, धूप रोखण्यासाठीचे विविध उपाय व्यवस्थित समजून घ्यावेत. मृदेची धूप रोखण्यामधील वनांचे महत्त्व समजून घेणे आव्श्यक आहे.

पाणलोटक्षेत्राचा अभ्यास करताना भौगोलिक वैशिष्ट्यांवर आधारीत, जमिनीच्या वापरानुसार आणि आकारानुसार पाणलोटक्षेत्राचे प्रकार समजून घ्यावेत. खोऱ्याचा क्षेत्रविस्तार, उतार, आकार आणि लांबी तसेच जलप्रवाहाची श्रेणी, उतार, लांबी व विसर्गाची घनता ही पाणलोट क्षेत्राची मुख्य वैशिष्ट्ये व्यवस्थित समजून घ्यावीत.

पाणलोटक्षेत्र व्यवस्थापनातील जमीन आणि पाण्याच्या वापराबाबतच्या प्रक्रिया व उपक्रम व्यवस्थित समजून घ्यावेत. पर्जन्यजल साठवण्यासाठीचे उपक्रम (rain water harvesting), भूजल स्त्रोतांचे पुनरुज्जीवन यांचे पाणलोटक्षेत्र व्यवस्थापनातील महत्त्व समजून घ्यायला हवे. मृदेचे संवर्धन अणि पाणलोटक्षेत्र व्यवस्थापन यातील ठळक महत्त्वाचे प्रयोग/ उपक्रम माहीत असावेत. याबाबतच्या चालू घडामोडीही माहीत असायला हव्यात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi zws 70
First published on: 22-11-2023 at 15:18 IST