ज्युडो-कराटे, तायक्वांडो यासारख्या मार्शल आर्ट्स आणि त्या अनुषंगाने सेल्फ डिफेन्स (स्व-संरक्षण) या विषयावर व्यक्तिमत्त्व चाचणीत काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण आजच्या लेखात पाहूया. त्याच बरोबर स्क्वॉश या खेळाबद्दलचे प्रश्नही पाहूया.
ज्युडो आणि कराटे सारखेच आहेत की वेगळे आहेत ? ज्युडो आणि कुस्तीत काय फरक आहे? तायक्वांडो म्हणजे नक्की काय? ज्युडो, कराटे आणि तायक्वांडो यात नेमका फरक काय आहे? या साहसी खेळांचा उगम कुठे झाला? आणि याचा भारतात प्रसार कसा झाला? तुम्हाला यातला कोणता प्रकार जमतो? तुम्ही किती वर्षांपासून हे प्रशिक्षण घेत आहात? कराटे किंवा ज्युडोचा स्व-संरक्षणासाठी कसा उपयोग होऊ शकतो? या साहसी खेळांचे प्रशिक्षण सर्व मुलामुलींना शालेय जीवनातच द्यावे आणि ते सक्तीचे करावे याबद्दल तुमचे मत काय आहे? कराटे प्रशिक्षणामध्ये बेल्ट असतो, तो बेल्ट काय असतो? त्याच्या वेगवेगळ्या रंगांचं महत्त्व काय? यातला प्रत्येक बेल्ट मिळायला साधारण किती वर्ष लागतात? तुमच्या कडे कोणत्या रंगाचा बेल्ट आहे? ब्लॅक बेल्ट म्हणजे काय? या साहसी खेळांच्या प्रसारासाठी भारतात कोणती पावले उचलायला हवीत?
हिंदी चित्रपटसृष्टीतले कोणकोणते नट आहेत ज्यांनी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले आहे? ज्युडो या खेळाबद्दल सोप्या शब्दात तुम्ही आम्हाला काय सांगू शकता? ज्युडो आणि कराटेचे प्रशिक्षण घेताना विशिष्ट प्रकारचे कपडे घातले जातात त्याचं कारण काय? रोजच्या जीवनात कधी स्वसंरंक्षणाची वेळ आली तर जे घातले असतील त्या कपड्यांवर कराटे किंवा ज्युडोचा उपयोग करता येईल का? ज्युडो आणि कराटे प्रशिक्षणाचे काय फायदे आहेत? याचा फिटनेस वाढवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो का?
ताई-क्वांडो या शब्दात इतर छोटे छोटे शब्द आहेत, ते तुम्हाला माहीत आहेत का? त्याचा अर्थ काय आहे? यात कुठच्या शारीरिक हालचालींना महत्व असत? या खेळाचा उगम कुठच्या देशात झाला? जुडो कराटे पेक्षा या साहसी खेळाचं वेगळेपण काय आहे? या साहसी खेळाचा ऑलिम्पिक मध्ये समावेश आहे का? ज्युडो कराटेचा ऑलिम्पिकमध्ये समावेश आहे का? या खेळणे प्रोत्साहन देणाऱ्या काही संस्था आहेत का? त्यापैकी एखाद्या संस्थेबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकता का? या साहसी खेळांबद्दल काही चित्रपट आले आहेत का? तुम्ही हे चित्रपट बघितले आहेत का? तुम्हाला त्यातला कोणता चित्रपट आवडतो? एखाद्या खेळावर चित्रपट आल्यामुळे त्या खेळाला प्रोत्साहन मिळतं का? की तो चित्रपट एक कलाकृती म्हणूनच पाहिला जातो?
आता आपण स्क्वॉश या खेळाबद्दलचे प्रश्न पाहूया. स्क्वॉश हा सर्रास खेळला जाणारा खेळ नाही. हा खेळ खेळणाऱ्यांची संख्या इतर खेळांपेक्षा कमीच असते. २०२८ च्या ऑलिम्पिक लॉस एंजिल्स येथे होणाऱ्या स्पर्धेतही स्क्वॉशचा समावेश केला आहे. या खेळात वापरली जाणारी रॅकेट आणि टेनिस किंवा बॅडमिंटनची रॅकेट सेम असते की वेगळी असते? वेगळी असेल तर वेगळेपण काय असतो? रॅकेटच्या आकारात फरक असतो की ती ज्या मटेरियल पासून बनवलेली असते ते वेगळे असते? स्क्वॉश खेळासाठी वापरले जाणारे कोर्ट हे इतर रॅकेट गेम्सच्या कोर्ट पेक्षा वेगळे असते का? या गेममध्ये पॉईंट्स कसे मोजले जातात? स्क्वॉश खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश आहे का? या खेळात जगज्जेते कोण आहेत? पाकीस्तान आणि भारतातले महत्त्वाचे स्क्वॉश खेळाडू कोणते आहेत? स्क्वॉश खेळण्याचे फायदे काय आहेत? दीपिका पाल्लीकल कार्तिक, सौरव घोषाल या स्क्वॉश खेळाडूंविषयी काय माहिती आहे?
आम्ही आतापर्यंत डीटेल्ड अप्लिकेशन फॉर्ममध्ये नमूद केल्या जाणाऱ्या अनेक खेळांबद्दल, आवडी निवडींबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे अनेक लेखांच्या माध्यमातून सांगितले आहे. प्रत्येक विषयाची सविस्तर माहिती कशी मिळवायची, कोणते रिसोर्सेस वापरायचे हेही आम्ही सांगितले आहे. मुलाखतींच्या दरम्यान काही गमतीजमती कशा होतात हेही आम्ही एका लेखामध्ये मांडले आहे. इथून पुढच्या काही लेखांमध्ये आम्ही मुद्देसूद उत्तरे कशी द्यायची, मुद्दे कोणत्या क्रमाने मांडायचे, प्रश्नांची किंवा उपप्रश्नांची सरबत्ती पॅनलने केली तर त्याचा सामना कसा करायचा याबद्दल माहिती देऊ.
mmbips@gmail.com/supsdk@gmail.com