आयटी क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यानंतर बहुतेक जणांना कालांतरानं व्यवस्थापकाच्या खुर्चीतच बसावं लागतं आणि ते खऱ्या कामापासून एकदम दूर जातात. साहजिकच त्यांची तंत्रज्ञानाविषयीची सगळी कौशल्यं एक तर गळून तरी पडतात किंवा मग पार कालबाह्य ठरतात. अशा वेळी एआयमध्ये कसं शिरायचं?

भारताच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रामधली एक दुर्दैवी अपेक्षा म्हणजे या क्षेत्रात काही वर्षं काम केल्यानंतर प्रत्येक माणसानं व्यवस्थापकच बनलं पाहिजे, अशी असते. अलीकडच्या काळात काही अंशी ही कमी झालेली असली तरी तिचा प्रभाव तसा चांगल्यापैकी टिकून आहे. तसंच व्यवस्थापनाच्या कामाला दिलं जाणारं अवास्तव महत्त्व आणि त्याच्याकडे एकवटले जात असलेले अधिकार यामुळे प्रत्यक्षात उच्च दर्जाचं तांत्रिक किंवा व्यवसायाशी संबंधित असलेलं काम कित्येकदा दुय्यम ठरवलं जातं. तसंच एखाद्या माणसाला आपल्या तांत्रिक कौशल्याच्या आधारेच दीर्घ काळ काम करत राहायचं असेल तर त्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये संधीच उपलब्ध नसते.

इच्छा असो वा नसो, बहुतेक जणांना कालांतरानं व्यवस्थापकाच्या खुर्चीतच बसावं लागतं. तिथे काही जणांचा जीव गुदमरून ते अस्वस्थ होतात; पण हा अपवाद ठरतो. बव्हंशी लोक सुरुवातीला काहीशी कुरकूर करतात; पण लवकरच ते यामुळे सुखावतात. प्रत्यक्षात मात्र आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत असल्याची कल्पनासुद्धा त्यांना येत नाही. कारण व्यवस्थापन करणं म्हणजे प्रत्यक्षातलं काम न करणं; असा सोयीस्कर अर्थ लावला जातो आणि ते खऱ्या कामापासून एकदम दूर जातात.

साहजिकच त्यांची तंत्रज्ञानाविषयीची सगळी कौशल्यं एक तर गळून तरी पडतात किंवा मग पार कालबाह्य ठरतात. काही वर्षं मजेत गेल्यावर कंपनीलाही हे लोक निव्वळ भार ठरायला लागतात आणि त्यांची गच्छंती होण्याची दाट चिन्हं दिसायलाल लागतात. अशा वेळी आपलं ‘बाजारमूल्य‘ जवळपास शून्य झाल्याची हताश भावना अत्यंत अस्वस्थ करून सोडणारी असते. अशा वेळी एआयमध्ये कसं शिरायचं?

अगदी सुरुवातीला एआयची तोंडओळख करून घेण्यासाठी ‘एलेमेंट्स ऑफ एआय’ याच नावानं इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या एआयविषयीच्या अगदी सोप्या आणि मोफत अभ्यासक्रमानं सुरुवात करता येईल. त्यानंतर मशीन लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, एआय यांच्याशी संबंधित असलेल्या मूलभूत संकल्पना समजून घ्याव्या लागतील. यासाठी अगदी प्रोग्रॅमिंग करणं गरजेचं नसलं तरी अगदी खूपच वरवरची माहिती मिळवूनही चालणार नाही. ही तंत्रज्ञानं काही प्रमाणात तरी समजून घ्यावी लागतील. याच्या जोडीला आपली पार्श्वभूमी, आपला अनुभव, आपली कौशल्यं, आपल्या मर्यादा हे सगळं लक्षात घेऊन आपण एआयमधल्या नेमक्या कुठल्या भूमिकेसाठी योग्य ठरू शकू, याचाही विचार करावा लागेल. याची काही उदाहरणं म्हणजे:

  • एआय प्रॉजेक्ट मॅनेजर
  • एआय प्रॉडक्ट मॅनेजर
  • एआय कन्सल्टंट
  • डेटा ॲनॅलिस्ट

या लोकांना एआय शिकण्यासाठी प्रोग्रॅमिंग शिकणं गरजेचं नसल्याचा उल्लेख आधी आलेलाच आहे. शिवाय अनेक वर्षं प्रत्यक्ष कामापासून दूर असल्यामुळे त्यांच्या मनात प्रोग्रॅमिंगविषयी एक प्रकारची भीतीही बसलेली असते. त्यांनी कित्येक वर्षापूर्वी वापरलेलं तंत्रज्ञान आणि आत्ताचं तंत्रज्ञान यांच्यात जणू जमीन-आस्मानाचा फरक असल्यासारखी परिस्थिती असते. साहजिकच अशा लोकांनी टॅब्ल्यूसारख्या गोष्टी शिकणं कदाचित उपयुक्त ठरेल. तसंच ‘ऑटोएमएल’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या गुगल ऑटोएमएल, ॲझ्यूर एआय, आयबीएम वॉटसन यासारख्या तुलनेनं शिकायला आणि वापरायला सोप्या असलेल्या गोष्टींचा अभ्यासही त्यांनी करावा. याखेरीज रनवेएमएल, डेटारोबॉट यासारख्या सुविधाही त्यांना प्रोग्रॅमिंगच्या कटकटीपासून दूर ठेवत एआयचा वापर करण्यासंबंधीच्या संकल्पना शिकवू शकतात.

तंत्रज्ञानापासून दूर राहिलेल्या किंवा एआयच्या तंत्रज्ञानाची ओळख नसलेल्या लोकांनी एआयचा वापर निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये कसा केला जातो किंवा जाऊ शकेल याविषयी जरा सखोल अभ्यास करणं आवश्यक ठरेल. किमान आपल्या कामाच्या क्षेत्रामध्ये तरी एआय कसं वापरलं जाईल याची जाण त्यांना आली पाहिजे. यासाठी ‘एआय ट्रेंड्स’ तसंच ‘हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू ऑन एआय’ या वेबसाइटचा जरूर वापर करावा. तसंच एआयचा वापर प्रकल्पांच्या व्यवस्थापनामध्ये करण्याविषयी कोर्सेरा किंवा युडेमी इथे उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांचाही जरूर विचार करावा. एआयशी संबंधित असलेली कौशल्यं विकसित झाल्याचं सिद्ध करण्यासाठी कोर्सेरावरचा ‘एआय फॉर एव्हरीवन’ हा अँड्रयू एनजी यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यासंबंधीचं प्रमाणपत्र मिळवणंही उपयुक्त ठरू शकेल. याखेरीज आपल्या दैनंदिन कामामध्ये सुलभता आणण्यासाठी एआयचा वापर कसा करता येईल याचा जरा शोध घेऊन त्या दृष्टीनं पावलंही टाकता येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सारांश म्हणजे आपण एआयपासून किंवा एकूणच तंत्रज्ञानापासून दूर असल्याचा धसका घेऊन नैराश्यात न जाता धडपड करणं ही काळाची गरज आहे! akahate@gmail.com