शेती क्षेत्रात दिवसेंदिवस आमूलाग्र बदल होऊ लागले आहेत. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने शाश्वत पर्याय म्हणून शेती क्षेत्राकडे विद्यार्थी आशेने पाहू लागले आहेत. कृषी विद्यापीठांमध्येसुद्धा संशोधनाबरोबर शेतीपूरक उद्याोगाकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत.

शेतीपूरक उद्याोगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेतीसुद्धा आज एक उद्याोग म्हणून उदयास आलेली आहे. शेतकरी आणि ग्रामीण समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा हा त्याचा उद्देश आहे. शेती क्षेत्रामध्ये झालेल्या मूलभूत संशोधनामुळे अन्नधान्याबरोबरच दूध उत्पादनामध्ये सुद्धा भारत जगातील सर्वात मोठा देश म्हणून नावारुपाला आला आहे. जागतिक दूध उत्पादनात देशाचा वाटा २५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दूग्ध व्यवसाय हा भारतातील सर्वात मोठा कृषीपूरक उद्याोग आहे. देशातील आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट रोजगार देतो. दूध आणि दूग्धजन्य पदार्थ, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारख्या खनिजांचे उत्कृष्ट स्राोत आहेत. त्यामुळे दूध निरोगी आणि संतुलित आहारासाठी पोषणमूल्य पुरवते.

दुधापासून दही, चीज, तूप, लोणी आणि दूध भुकटीसह इतर अनेक पदार्थांचे उत्पादन करता येते. यांसह दुग्ध व्यवसाय आणि संबंधित क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. खवा, कुल्फी, सुगंधी दूध, लस्सी सारखे लघु आणि मध्यम उद्याोग सुरू करता येतात.

गावोगावी दूध संकलन केंद्रे आहेत. दूध व्यवसायासाठी जनावरांच्या गोठ्यापासून ग्राहकांपर्यंत व्यवस्थापनाची गरज लागते. तरुण शेतकरी आधुनिक ज्ञानाचा उपयोग करून दुग्ध व्यवसायातून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल याकडे लक्ष देत आहेत.

दुग्ध व्यवसायातील सुवर्णसंधी म्हणजे सध्याच्या आणि भविष्यातील अशा क्षेत्रांचा विचार जेथे दूध उत्पादन, प्रक्रिया आणि विक्रीतून अधिक नफा आणि स्थिर उत्पन्न मिळवण्याची क्षमता आहे. दुग्ध व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी नियोजन आणि सातत्य महत्त्वाचे आहे. दुग्ध व्यवसायाची सुरुवात दर्जेदार आणि पौष्टिक दूध उत्पादनाने होते. दर्जेदार दूध उत्पादनाने दुधाच्या पौष्टिकतेमध्ये गुणवत्ता पूर्ण वाढ होते. त्यामुळे दुधाचे पोषणमूल्य वाढते. दूध जर शुद्ध आणि रसायनमुक्त असेल तर असे दूध बाजारात चढ्या दराने विकले जाते. आज जागरूक ग्राहक ऑरगॅनिक किंवा A2 प्रकारच्या दूध मागणी करत आहेत.

शहरांमध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट, चोखंदळ ग्राहक ते ऑनलाइन डिलिव्हरीद्वारे थेट विक्री केली जाते. अतिरिक्त दूध उत्पादनाचे मूल्य प्रक्रिया केल्याने वाढते. दूध पावडर ,पनीर, चीज, रसगुल्ले, पेढे बर्फी, गुलकंद, बासुंदी, आईस्क्रीम, खवा इत्यादी पदार्थांना आज बाजारात मागणी आहे. सणासुदीला आणखी मागणी वाढते. देशांतर्गत मागणी बरोबरच दुग्धजन्य उत्पादनांना परदेशामध्ये सुद्धा मागणी वाढतीच आहे. आज देशी गायीच्या दुधाला सुद्धा वाढती मागणी आहे. त्यामुळे स्थानिक देशी गाईंच्या जाती जसे गीर, साहिवाल, थारपारकर यांसारख्या देशी गाईंचे संवर्धन शेतकरी करू लागले आहेत. A2 दुधाच्या वाढत्या मागणीमुळे दुधाला जास्त दर मिळू लागले आहेत.

दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रिसिजन फार्मिंग, स्वयंचलित मिल्किंग मशीन, आरएफआयडी टॅगिंग यासारख्या गुणवत्तापूर्ण पद्धतींचा आज शेतकरी वापर करू लागले आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पहावे म्हणून शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांना साहाय्य म्हणजे पशुधन विमा, पशुखाद्या अनुदान, डेरी विकास योजना यांसारख्या विविध योजना शासन स्तरावर तयार केल्या जात आहेत. कमी दराने अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्ड, आनंद, राष्ट्रीय डेअरी विकास संस्था शेतकऱ्यांना सहाय्य करत आहेत. तसे दुग्ध उत्पादन वाढावे म्हणून भारतीय पशुवैद्याकीय संशोधन संस्था प्रयत्न करत आहेत.

ग्रामीण भागांमध्ये तसेच देशांतर्गत शेती व शेती पूरक उद्याोगांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा म्हणून शासन स्तरावर महिलांचे बचत गट तयार केले जात आहेत. त्यांना कमी दराने अर्थसहाय्य पुरवठा करून शासन उद्याोगधंद्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवा म्हणून विविध योजना त्यामार्फत राबवत आहेत.

स्थानिक भागातील दूध संकलित करून बचत गटामार्फत प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. खवा, पेढा, बर्फी, कलाकंद असे विविध पदार्थ बचत गटामार्फत वितरित केले जातात. दुधाला पूर्णान्न असे म्हटले जाते. वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी हरितक्रांती द्वारे अन्नधान्य उत्पादन वाढवले गेले तसेच दूध उत्पादन वाढवण्यासाठी श्वेतक्रांतीद्वारे प्रयत्न केले गेले.

sachinhort. shinde@gmail. Com