श्रीराम गीत
● नमस्कार, मी २०१९ ला कसबसे बी.कॉम. पूर्ण केले. परिस्थितीमुळे मिळेल ती नोकरी करावी लागली. पण ते करता करता ४ वर्षे निघून गेली. पदवी करून चांगली नोकरी मिळेल असे वाटले होते. आता स्पर्धा परीक्षा शिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. आता वय पंचवीस आहे. मार्गदर्शन करावे.
— अक्षय निकंबे, सोलापूर.
स्पर्धा परीक्षा हा तुझा रस्ता नव्हे हे प्रथम लक्षात घे. तुझाच शब्द वापरायचा तर, कसेबसे पदवी हातात घेतलेल्यांना स्पर्धा परीक्षेत यश कधीही मिळत नाही. चार वर्षे गेली. त्यात काय शिकलो, काय अनुभव घेतला नाही याचे नीट आत्मपरीक्षण कर. त्या अनुभवातूनच तुझा रस्ता पुढे जाणार आहे. विविध कामांमध्ये तू अनुभवातून कौशल्य विकसित करू शकतोस. पगार हळूहळू वाढतो. २५ व्या वर्षी हाती नोकरी आहे, पगार चालू आहे व काही कामाचा अनुभव आहे ही गोष्ट अन्य अनेक बेकार विद्यार्थ्यांपेक्षा खूप मोलाची आहे हे तुझ्या लक्षात येईल. तुझ्या सध्याच्या नोकरीचे स्वरूप कळवले नसल्यामुळे त्यातून काय करता येईल हे मी सांगू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की. अकाउंट्स कळते, गोड बोलता येते, कष्ट करण्याची तयारी आहे, त्या प्रत्येकाची सात ते आठ वर्षात उत्तम वाटचाल होते. यावर विश्वास ठेव. मात्र स्पर्धा परीक्षेच्या रस्त्याला लागलास तर नोकरीकडे पूर्ण दुर्लक्ष होईल व प्रगती थांबेल हेही येथेच नमूद करतो.
● मी फिशरी सायन्समध्ये शिकत असून सीजीपी ७.५ आहे. पुढे जॉब करावे की पीजी करावे या संभ्रमात आहे. मला अवांतर वाचनाची म्हणजेच साहित्य कादंबरी वर्तमानपत्रे वाचायची आवड आहे. तरी मार्गदर्शन करावे.
– परमेश्वर जोशी
हेही वाचा >>> UPSC ची तयारी : भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये
जॉब का पीजी या प्रश्नाचे उत्तर खरे तर तुला शोधायचे आहे. तुझ्या क्षेत्रात अनुभवाला जास्त किंमत आहे. तो जॉब करताना मिळणार. मत्स्य संशोधनात जायचे असेल तर पीजीचा रस्ता सुरू होतो. कदाचित सरकारी नोकरीचे दार उघडण्याकरता त्याचा उपयोग होतो. पीजी करायचे ठरले तर कोणत्या विषयात करायचे त्यातील माणसांना भेटून तो योग्य तो निर्णय घ्यावा.
● मी आता सध्या बी.कॉमला टी वायमध्ये शिकत असून मला १०वी ला ९० आणि १२वी ला ८१ मिळाले आहेत. गेल्या वर्षी ७८ टक्के मिळाले आहेत. तसेच मी एनसीसीमध्ये सी सर्टिफिकेट केलं आहे. ज्युडो हा खेळ राष्ट्रीय पातळी वर खेळली आहे. माझा यूपीएससी तयारी करायचा प्लॅन आहे. तर कृपया मी कोणते ऑप्शनल विषय ठेऊ , कोणच्या भाषेमध्ये परीक्षा देऊ, तसेच कोणते मॅगझिन तसेच न्यूजपेपर लावू. परीक्षेसाठी लागणार योग्य मार्गदर्शन तुम्ही मला करावे ही विनंती.
– गायत्री निकम गायत्री तुझे एनसीसी सी सर्टिफिकेट, जुडो नॅशनल पातळी आणि बीकॉम या तिन्हीचा मेळ घालून विचार केला असता, तुला यूपीएससी का करावे वाटत आहे यावर कमीत कमी सहा महिने नीट विचार करावास. तुझा रस्ता बँकांच्या परीक्षा किंवा एमबीए यातून सुरू होतो. खरे तर एनसीसी सी सर्टिफिकेटमुळे तुला स्पेशल कोट्यातून आर्मीत कमिशन्ड ऑफिसरच्या संधी उपलब्ध आहेत. तुझ्या फिटनेसमधून त्यात खूप छान यश मिळवू शकतेस. हे माझे प्राथमिक निरीक्षण. अन्यथा केवळ बीकॉमनंतर यूपीएससीमध्ये यश मिळवलेल्यांची संख्या अत्यल्प आहे ही माहिती तुझ्या निमित्ताने वाचकांना मी देतो. त्यामुळे प्रथम एमबीए फायनान्स, तेही उत्तम संस्थेत प्रवेश मिळवून पुरे करावे. त्या दरम्यान यूपीएससीची प्राथमिक माहिती गोळा करावी व नंतर त्या परीक्षा देण्याचा विचार करावा असे सुचवतो. यानंतर तुझ्या हातात प्लॅन बी म्हणून सुद्धा परिपूर्णता असेल आणि यूपीएससी करता प्रयत्न करायला चार ते पाच वर्षे हातात असतील. आई-बाबांशी पूर्ण चर्चा करून नीट विचारांती निर्णय घ्यावा.