व्यक्तिमत्त्व चाचणी हा स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातला शेवटचा टप्पा असतो आणि त्यामुळे त्याचा उमेदवाराच्या मनावर ताण असणं हे साहजिकच आहे. पण आत्मविश्वासाने तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडतील असे उत्तर देता आले तर तुम्हीच यशाचे शिलेदार आहात.

वाचक मित्रहो, या लेखमालेत आपण आता पर्यंत व्यक्तिमत्त्व चाचणीच्या तयारीचे अनेक पैलू बघितले. वेगवेगळ्या विषयांवर काय आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे आपण पाहीलं. हा झाला कंटेंटच्या तयारीचा भाग. पण व्यक्तिमत्त्व म्हणजे आत्मविश्वास, आपले विचार किंवा मते नेमक्या शब्दात मांडता येणे, कठीण परिस्थिती अचानक समोर आल्यास त्यातून शांतचित्ताने मार्ग काढणे, भावनिक आव्हान देणाऱ्या प्रश्नांना भावनेच्या भरात वाहून न जाता बुद्धिने उत्तर देणे.

कोणत्याही स्पर्धा परीक्षांच्या व्यक्तिमत्त्व चाचणीचे बोर्ड किंवा पॅनल हे तीन किंवा पाच सदस्यांचे असते. व्यक्तिमत्त्व चाचणी हा स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातला शेवटचा टप्पा असतो आणि त्यामुळे त्याचा उमेदवाराच्या मनावर ताण असणं हे साहजिकच आहे. अनेकवेळा उमेदवारांना इतर उमेदवारांकडून मुलाखतीबद्दल काही ऐकायला मिळत असतं. याचं उदाहरण म्हणजे, अमुक अमुक बोर्ड जास्त गुण देत नाही, अमुक अमुक बोर्डाचे सदस्य स्ट्रेस इंटरव्ह्यू घेतात, अमुक अमुक बोर्ड डीटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्ममधून काहीच प्रश्न विचारत नाहीत. ही फक्त काही उदाहरणं झाली. असे अनेक समज आणि गैरसमज असतात. आणि या सगळ्या चर्चांचा प्रत्यक्ष मुलाखतीवर बरा-वाईट परिणाम होत असतो. अनेकवेळा चांगली तयारी असली तरी उमेदवाराला अचानक सगळं विसरायला होतं, प्रश्नांची उत्तरं देताना अचानक घाम फुटतो, आत्मविश्वास गमावल्यासारखं होतं. परिणामी आवाज पडतो, उत्तरातले मुद्दे विसरायला होतात, उत्तर देताना अडखळायला होतं, अनावश्यक हालचाली व्हायला लागतात. आपल्या उत्तरांवर काहीच प्रतिक्रिया न देणाऱ्या सदस्यांकडे बघण्याची हिंमत होत नाही. या आणि अशा अनेक अडचणी उमेदवारांपुढे असतात. या सगळ्याचा सामना कसा करायचा याबद्दल थोडं मार्गदर्शन आम्ही करणार आहोत.

प्रयत्नांचे सातत्य

यापूर्वीच्या अनेक लेखांमध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे व्यक्तिमत्त्व ही एक दोन आठवड्यात घडणारी गोष्ट नाही. रोजच्या आयष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत असतात. त्यामुळे रोजच्या आयुष्यातही आपण अधिक सजगपणे वावरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला आपले विचार, मते, आवडीनिवडी मुद्देसूदपणे व्यक्त करता येतात का हे सतत पाहात राहिले पाहिजे. आपल्याला आपल्याच वागण्या बोलण्यात काय आणि कशा सुधारणा करता येतील हे पाहिले पाहिजे.

दीर्घ श्वासोच्छवासाचे फायदे

कोणत्याही ताणाचा सामना करण्यामध्ये आपल्या श्वासोच्छ्वासाचा मोठा वाटा असतो. आपण डॉक्टरांकडे जातो आणि ते आपल्याला इंजेक्शन देणार असतात तेव्हा ते आपल्याला दीर्घ श्वास घ्यायला सांगतात. आपणही मुलाखतीत एखादा कठीण प्रश्न आला तर उत्तर द्यायला सुरुवात करण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्यावा, याचा एक फायदा असा की आपल्या मनात गोंधळ घालणाऱ्या विचारांची गती कमी व्हायला मदत होते, आपल्या मेंदूला विचारांचे व्यवस्थित पृथक्करण करायला वेळ मिळतो. संपूर्ण परीक्षेच्या काळातच उमेदवारांनी रोजच थोडा वेळ प्राणायाम केला पाहिजे. याचा मन शांत आणि स्थिर राहण्यासाठी खूपच उपयोग होतो.

मेंदूला आराम

उमेदवारांना परीक्षेची तयारी म्हणून खूप अभ्यास वाचन करावं लागतं यात काही शंकाच नाही. पण नुसते वाचन किंवा अभ्यास करून मेंदूला शीण येऊ शकतो, नुसते वाचत राहिले आणि वाचन केलं आहे त्याची उजळणी किंवा त्यावर चिंतन आणि मनन केलं नाही तर योग्य वेळी ती माहीती आठवणार नाही, किंवा त्या माहितीवर आधारित उपयोजित (अप्लाइड ) प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत. अनेकवेळा उमेदवारांना वाटत राहतं, ह्यअरे हे वाचलं होतं पण आता नेमकं काहीच आठवत नाही.ह्ण हे होण्याचं कारण हेच आहे की आपण नुसतं वाचलेलं असतं पण त्यावर सखोल विचार केलेला नसतो. मेंदू हा डायनॅमिक असतो, आपण अभ्यास करत नसलो आणि इतर काहीतरी करत असलो तरी आपण वाचलेल्या, पाहिलेल्या गोष्टींचं प्रोसेसिंग मेंदू करतच असतो. रोज जर थोडा व्यायाम-प्राणायाम केला तर मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढेल, मेंदूला येणारा थकवा कमी व्हायला मदत मिळेल आणि केलेला अभ्यास अधिक प्रभावी व्हायला मदतच होईल.

पुरेशी झोप

इंटरव्ह्यूच्या आदल्या रात्री पुरेशी झोप घेणे हे मानसिक थकवा घालविण्यासाठी खूपच महत्वाचे आहे. रात्री व्यवस्थित झोप नाही आणि इंटरव्ह्यूमध्ये काय प्रश्न विचारले जातील याचे टेन्शन यामुळे मुलाखती दरम्यान प्रश्नाचे उत्तर माहिती असूनही वेळेवर न आठवणे किंवा बोलण्यात स्पष्टपणा नसणे या गोष्टी होऊ शकतात.

‘मॉक इंटरव्ह्यू’चा ताण

मुलाखतीला जाताना मॉक इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काही मार्गदर्शनपर सूचना कोणी केल्या असतील आणि त्या पूर्णपणे अंमलात आणणे शक्य नसेल किंवा काही तुम्हाला मानसिकरित्या खच्चीकरण करणाऱ्या गोष्टी उदाहरणार्थ ह्यतुम्ही या सेवेसाठी पात्र उमेदवार नाही, उगाचच वेळ वाया घालवू नकाह्ण वगैरे, अशा बाबी मनाला लावून घेऊ नका. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात तेव्हा तुम्ही कसे आहात हे तुम्हाला अधिक माहिती आहे. अनेक वेळा मॉक इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारणारी एका विशिष्ट विचारसरणीची मंडळी व्यावहारिक प्रश्न विचारत नाहीत किंवा त्यांच्या विचारसरणीशी सुसंगत नसलेल्या उमेदवारांच्या उत्तरांची चिरफाड करत त्यांना नाउमेद करतात. प्रत्यक्ष मुलाखत जवळ आलेली असते आणि उमेदवार तणावाखाली राहतात. सर्वप्रथम हे समजून घ्या की प्रत्यक्ष मुलाखतीचे पॅनेल हे अनेकवेळा मॉक इंटरव्ह्यू पॅनेलपेक्षा सहृदयी असल्याचे तुम्ही अनुभवाल. त्यामुळे मुलाखतीला जाताना मॉक इंटरव्ह्यूचे ओझे आपल्या डोक्यावर घेऊन जाऊ नका.

आत्मविश्वास, विनम्रपणा बाळगत प्रश्न व्यवस्थित ऐकून घेत, दीर्घ श्वास घेत, समतोल असे उत्तर ज्यातून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडतील असे देता आले तर तुम्हीच यशाचे शिलेदार आहात. व्यक्तिमत्त्व चाचणीच्या दरम्यान येणाऱ्या ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल आणखी काही टिप्स पुढच्या लेखामध्ये देऊच. तोपर्यंत शुभेच्छा.

mmbips@gmail. com

supsdk@gmail. Com