गेल्या काही लेखांमधून आपण वेगवेगळ्या मैदानी खेळांबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहिले. आता आपण काही साहसी क्रीडा प्रकारांबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि काय प्रश्न इंटरव्ह्यू बोर्डाने विचारले आहेत हे पाहू या. ट्रेकिंग, हायकिंग, माउंटेनियरिंग याबद्दल डीटेल्ड अप्लिकेशन फॉर्ममध्ये उल्लेख असेल तर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे बघू
या लेखमालेच्या सुरुवातीच्या काही लेखांमध्ये आम्ही हे लिहिलं होतं की इंटरव्यू बोर्ड उमेदवारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे अनेक वेळा एखादी सिच्युएशन सांगून त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ एखादे सदस्य असा प्रश्न विचारू शकतात की मला काही ॲक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्ही काय सुचवाल, हायकिंग, ट्रेकिंग की माउंटेनियरिंग? उमेदवार या प्रश्नाचं जे काही उत्तर देईल त्यानुसार पुढे विचारलं जाऊ शकतं कि ट्रेकिंग का हायकिंग ? व माउंटेनियरिंग का नाही? या तिन्हींमध्ये नेमका फरक कोणता आहे? यालाच जोडून कुठच्या ठिकाणी जावं हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. या प्रश्नांची उत्तरं देताना प्रश्न विचारणाऱ्या सदस्यांचं वय लक्षात घेऊनच ॲक्टिव्हिटी सुचवली पाहिजे. जे ठिकाण सुचवाल तिथलं हवामान, तिथे पोहोचण्यासाठी काय प्रवास साधनं उपलब्ध असतील याचाही विचार उमेदवाराने केला पाहिजे.
महाराष्ट्रातले अनेक उमेदवार सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग किंवा गड किल्ल्यांवर ट्रेकिंग हे आपल्या DAF मध्ये लिहितात. सह्याद्रीचा उल्लेख केला की सह्याद्री किंवा पश्चिम घाट आणि हिमालयातल्या ट्रेकिंगमध्ये काय फरक आहे हा प्रश्न नक्कीच अपेक्षित आहे. तुम्ही फक्त सह्याद्रीमध्येच ट्रेकिंग का करता? किती उंचीपर्यंत तुम्ही ट्रेकिंग केले आणि कोणत्या साधनांचा वापर केला? सध्या पश्चिम घाट बचाव मोहीम राबविण्यात येत असूनही विकासाचा अति वेग हा भविष्यात ट्रेकिंग, मोउंटेनीअरिंग करायला जागा शिल्लक ठेवणार नाही असे आपणास वाटते का? माधव गाडगीळ समितीचा अहवाल काय सांगतो? कस्तुरीरंगन समितीच्या अहवालात कोणते मुद्दे आहेत? ट्रेकिंग आणि मोउंटेनीअरिंगच्या रस्त्यावर कोणत्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची गरज आहे? असेही प्रश्न उमेदवाराला विचारले जाऊ शकतात. या प्रश्नाचं उत्तर उमेदवाराने काळजीपूर्वक द्यायला हवं . महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांच्या ट्रेकिंगबद्दल उल्लेख असेल तर या किल्ल्यांची, गडांची व्यवस्थित माहिती उमेदवाराला असली पाहिजे, त्याबरोबरच या गडकिल्ल्यांची स्वच्छता, त्यांचं जतन यात ट्रेकर्स काय भूमिका बजावू शकतात याचीही माहिती उमेदवाराला असली पाहिजे. अलीकडेच महाराष्ट्रातल्या शिवकालीन ११ किल्ल्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्सचा दर्जा मिळाला आहे. हे ११ किल्ले महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यांत आहेत व तुम्ही त्या किल्ल्यांना भेट दिली का? त्याबद्दल माहिती असली पाहिजे. हा दर्जा मिळाल्याचे काय फायदे आहेत, यामुळे काय जबाबदारी इथल्या शासनावर येते याचीही तयारी उमेदवारांनी केली पाहिजे. बिहार राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी बुद्धिस्त सर्किट आहे महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांना जोडणारे असे सर्किट का नाही?
महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांना हिमालयात ट्रेकिंग करण्यासाठी संधी सहजपणे मिळत नाही आणि त्याविषयी उमेदवार नम्रपणे पॅनलला सांगू शकतो. हिमालय पर्वत रांगांमध्ये तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर तुम्ही बेसिक मोउंटेनीअरिंगचा कोर्स केला का? मोउंटेनीअरिंग करताना कोणती साधने वापरतात? ट्रेकर्स मंडळी आपल्या अनावश्यक गोष्टी अस्ताव्यस्तपणे फेकत पर्वत शिखराचे प्रदूषण करत आहेत का? ट्रेकिंगपूर्वी कोणती काळजी घ्यावी? Adventure स्पोर्टवर नियंत्रण घालणे गरजेचे आहे का? भारतात ७३% हिमालय पर्वत रांगा असूनही भारतात या हिमशिखरांना ट्रेकिंग, मोउंटेनीअरिंग करण्यात अपुरी विमान सेवा आणि सुविधाअभावी नेपाळ देशाला अधिक लाभ होत आहे का?
ट्रेकिंग, मोउंटेनीअरिंग, हायकिंगमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात काय बदल झाला?
DAF मध्ये ज्या गोष्टी लिहिल्या जातात त्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे लिहाव्यात. कुठल्याही गड-किल्ल्यावर न जाता गड-किल्ल्यांची आवड असं लिहून चालणार नाही. बोर्डचे सदस्य अतिशय अनुभवी असतात. उमेदवाराकडून योग्य ती माहिती काढून घेण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते. एकदा एका मराठी उमेदवाराने आपल्या DAF मध्ये गड-किल्ल्यांना भेट देणे ही आवड म्हणून लिहिली होती. उमेदवार पुण्याचा होता आणि सदस्यांनी त्याला विचारलं की तू सिंहगडावर जाऊन आला आहेस का? उमेदवाराने म्हटलं हो. मग सदस्यांनी पुढचा प्रश्न विचारला की सिंहगडावर कोणाचा पुतळा आहे. उमेदवाराने उत्तर ठोकलं , “ शिवाजीचा” त्याच्या या उत्तरावरून सदस्यांना लगेच लक्षात आलं की हा उमेदवार सिंहगडावर गेला नसणार कधीच. जर आपल्याला एखाद्या उत्तराची खात्री वाटत नसेल तर आपण सदस्यांना नम्रपणे सांगावं, “ सॉरी सर मला आत्ता नेमकं उत्तर आठवत नाहीये.” प्रामाणिकपणे आपली चूक किंवा माहीत नसलेली गोष्ट मान्य करणं हे महत्त्वाचं आहे.
पुढच्या लेखात इतर काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि एडव्हेंचर स्पोर्ट्सबद्दलचे प्रश्न पाहू.