आपला बॉस कोण असावा हे जरी आपल्या हातात नसेल तरी आपल्या वाट्याला आलेल्या बॉसशी जमवून घेणे ही एक कला आहे असं मला वाटतं. बऱ्याच जणांना दुसऱ्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली काम करण्याची सवय नसते. त्यामुळे नवीन नोकरी नवा बॉस आणि त्याबरोबरच नवीन आव्हाने आपल्यासमोर उभी असतात. त्यामुळे बॉस बरोबर डील करताना अनेक जणांना वेगवेगळ्या कारणांनी ताणतणावाला सामोरे जावे लागते.
नवीन नोकरी मिळाल्यानंतर प्रत्येकालाच आपला बॉस कसा असेल याविषयी उत्सुकता आणि पुष्कळदा थोडी भीती देखील असते. नवीन नोकरीमध्ये प्रत्येकाला स्वतःची उपयुक्तता सिद्ध करायची असते त्याचबरोबर त्या पदासाठी लागणारे आवश्यक गुण आपल्यामध्ये आहेत हे बॉस व इतर सहकाऱ्यांना पटवून द्यायचे असते. आपला बॉस कोण असावा हे जरी आपल्या हातात नसेल तरी आपल्या वाट्याला आलेल्या बॉसशी जमवून घेणे ही एक कला आहे असं मला वाटतं. बऱ्याच जणांना दुसऱ्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली काम करण्याची सवय नसते. त्यामुळे नवीन नोकरी नवा बॉस आणि त्याबरोबरच नवीन आव्हाने आपल्यासमोर उभी असतात. त्यामुळे बॉस बरोबर डील करताना अनेक जणांना वेगवेगळ्या कारणांनी ताणतणावाला सामोरे जावे लागते.
बॉसच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करताना अनेकांची दमछाक होताना दिसते. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रकारानुसार समोरची व्यक्ती कशी आहे याविषयी आपण आपली मते बनवत असतो. एकच बॉस एका कर्मचाऱ्याला आक्रमक वाटेल तर दुसऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्याबरोबर मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करताना कुठलीच अडचण जाणवणार नाही. हे आपण नक्कीच लक्षात घेतले पाहिजे. आपल्या आयुष्यात आपण विविध प्रसंगात विविध व्यक्तींबरोबर घेतलेले अनुभव,आपले पालकत्व, आपली समाज व्यवस्था यावरून आपल्या मनोधारणा विकसित होत असतात किंवा पक्क्या होताना दिसतात. बॉस ही देखील एक व्यक्तीच आहे व तिच्यातील नेतृत्वगुणांमुळे किंवा इतर कौशल्यामुळे ती त्या पदावर पोचली आहे हे समजून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. तरीदेखील नव्या नोकरीत बॉसिझमचा त्रास कमी होण्यासाठी व त्यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नक्कीच सक्षम उपायोजना करता येईल असे मला वाटते.
बॉसिझमला सामोरे जाण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना
१. बॉसचे व्यक्तिमत्व ओळखा व स्वीकारा. प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू असतात व त्याचबरोबर त्या व्यक्तिमत्त्वाच्या वागण्याच्या पद्धती विचार करण्याच्या पद्धती आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे मी जसा विचार करतो तसा समोरची व्यक्ती विचार करत नाही याचा मनोमन स्वीकार व्हायला हवा त्याचबरोबर बॉसच्या व्यक्तिमत्वातील गुणवैशिष्ट्यांचा नीट अभ्यास करून त्याचाही विनाशर्त स्वीकार व्हायला हवा. असे केल्यामुळे समोरच्या व्यक्तीला समजून घेणे सोपे जाते व छोट्या छोट्या गोष्टींमुळे ताण तणाव निर्माण होत नाहीत.
२. व्यावसायिकता जोपासा. नवीन नोकरी करताना आपण आपला दृष्टिकोन व्यावसायिक असणे व ते आपल्या वर्तनातून समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येणे खूप महत्त्वाचे आहे. नवीन नोकरी करताना आपली व्यक्तिगत मते, आपल्या मनोधारणा समोरच्याला मान्य होतील असा आग्रह धरू नये बॉसच्या आपल्याकडून नक्की काय अपेक्षा आहेत त्या समजून घ्याव्यात काही वेळा आपल्याला त्या पटल्या नाहीत तरी त्या पदाची गरज म्हणून त्या कराव्यात त्यामुळे बॉस बरोबर होणारा संघर्ष टाळता येईल.
३. संवादात स्पष्टता ठेवा. कोणतेही नाते निभावताना त्या नात्यांमध्ये मनमोकळा व सुस्पष्ट संवाद होणे महत्त्वाचे आहे बॉस बरोबर डील करताना त्याचे नक्की काय सांगणे आहे ते समजावून घ्या व त्याविषयी सुस्पष्ट संवाद प्रस्थापित करा मला वाटलं, बहुतेक, कदाचित हे शब्द संवादात वापरू नका. एखादी गोष्ट पूर्ण समजली नसेल तर जरूर तेथे शंका विचारून ती नीट समजून घ्या. संवादामध्ये होणारे अडथळेच एकमेकांविषयी गैरसमज निर्माण करण्यास कारणीभूत होतात हे लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे.
४. सक्षम नातेसंबंध निर्माण करा. कंपनीतील सहकाऱ्यांबरोबर काम करताना त्यांच्याबरोबर तुमचे सक्षम नाते असणे खूप महत्त्वाचे आहे कुठल्याही काम पूर्ण करण्यासाठी परस्पर सहकार्य करावे लागते त्यामुळे मदत द्यायला व घ्यायला शिका ज्यामुळे सक्षम नातेसंबंध निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. सहकाऱ्यांबरोबर असलेल्या सकारात्मक नातेसंबंधातूनच तुमचे उत्तम नेटवर्क निर्माण होईल.
५. संयम व शिस्त जोपासा. नवीन नोकरी लागल्यानंतर तेथे स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी काही काळ द्यावा लागतो हे समजून घ्या आपण जसे समोरच्या विषयी मते बनवत असतो तसे इतरही आपल्या वागणुकीकडे बारकाईने लक्ष देत असतात त्यामुळे स्वयंशिस्त, वेळेचे व कामाचे उत्तम नियोजन केल्यास स्वयंशिस्त नक्कीच अंगीकारता येईल आणि हे सर्व करताना संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
६. कंपनीतील वरिष्ठ नेत्यांची मदत घ्या. काम करताना कोणत्याही अडचणी आल्यास कंपनीतील एचआर आणि इतर वरिष्ठ नेत्यांची मदत घेणे नेहमीच उपयोगी ठरते. असे केल्यामुळे कंपनीची धोरणे व आपल्या रोल विषयी स्पष्टता येण्यास नक्कीच मदत होईल. वरिष्ठांचा त्यांच्या कामातील अनुभव तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
७. आत्मगौरव (सेल्फ एस्टीम) जोपासा. आपण केलेल्या प्रत्येक कामाची बॉसने दखल घेतली जावी व त्याला मान्यता द्यावी ही अपेक्षा टाळा. आपल्या स्वतःमध्ये असलेल्या क्षमतांवर विश्वास ठेवा व आपल्यातील कमतरतांचे भान देखील ठेवा तसेच तुमच्या कामगिरीकडे लक्ष ठेवा यामुळे आपल्यामध्ये आत्मगौरवाची भावना निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल.
८. तज्ज्ञांची मदत घ्या. नोकरी करताना परिस्थिती सतत आव्हानात्मक असेल व त्यातून जर वारंवार तुम्ही तणावग्रस्त होत असाल तर योग्य वेळी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. समुपदेशन व मानसोपचार यामुळे ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी निश्चितच मदत होते. एकंदरीतच नवीन नोकरी नवा बॉस व त्याबरोबर येणारी नवी आव्हाने यांचा आपण सकारात्मक मनोवृत्तीने स्वीकार करायला हवा व त्यासाठी स्वतःचा निरंतर विकास करत राहिला हवा असे मला मनोमन वाटते.