योगाचा उल्लेख ऋग्वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती, पाणिनीच्या व्याकरणशास्त्रातील आष्टाध्याय तसेच रामायण आणि महाभारतासारख्या महाकाव्यातही आलेला आहे. मुलाखतीला नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांत योग म्हणजे नक्की काय? योग आणि योगासने हे सारखेच आहेत की यात काही फरक आहे? योग तत्त्वज्ञान मांडणाऱ्या पतंजली ऋषींनी कोणत्या ग्रंथाच्या माध्यमातून ते मांडलं? अष्टांग योग काय आहे? यातली अष्ट अंग कोणती? हठ योग, विक्रम योग, पॉवर योग याविषयी तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही सूर्यनमस्कार घालता का? एका सूर्यनमस्कारात किती आसने असतात? सूर्यनमस्कारातील सूर्याची नावे कोणकोणती आहेत?

वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्नही इथे अर्थातच विचारले जाऊ शकतात. तुम्ही योगासनं किती नियमितपणे करता? तुम्हाला योगासने का करावीशी वाटली? तुम्ही कुठची आसन करू शकता? या प्रश्नाचे उत्तर देताना उमेदवाराला आसनांची नावे व्यवस्थित सांगता आली पाहिजेत. जी आसने तुम्ही नियमितपणे करत असाल त्यांचीच नावे सांगावी. उगाच इंटरव्ह्यू पॅनेलवर प्रभाव पाडण्यासाठी सगळ्या आसनांची नावे सांगू नयेत. या आसनांच्या नावाचा आणि ते करण्याच्या पद्धतीचा किंवा त्या आसनामुळे होणाऱ्या फायद्याचा संबंध असतो. याची उदाहरणे बघूया. ‘नौकासन’ याला आपण नौकासन का म्हणतो कारण हे आसन करताना शरीराचा आकार हा नौकेसारखा किंवा होडीसारखा होतो. ‘शवासन’ यात आपण शवासारखं किंवा मृत शरीरासारखं काहीही हालचाल न करता पडून राहायचं असतं. ‘पर्वतासन’ मध्ये दोन्ही हात उंच करून पर्वतासारखा आकार तयार होतो. प्राणायाम म्हणजे काय? तुम्हाला कोणते प्राणायाम करता येतात? प्राणायाममध्ये ‘भ्रामरी’ हा प्राणायाम आहे, यात भुंग्याच्या गुणगुणण्याचा आवाज असतो तसा आवाज काढायचा असतो. संस्कृतमध्ये भुंग्याला भ्रमर म्हणतात. त्या भ्रमरासारखा आवाज म्हणून तो भ्रामरी प्राणायाम.योगासने केल्यामुळे तुम्हाला काय फायदे झाले? तुम्ही योगासनांचे काही प्रशिक्षण घेतले आहे का? असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. २०१४ साली संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत १७५ सदस्यांनी २१ जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी ठराव संमत केला आणि २१ जून २०१५ रोजी तो प्रत्यक्ष अमलात आला. २१ जून या दिवसाचीच निवड का झाली? आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा योग तत्त्वज्ञानाला काय फायदा झाला ? योग प्रसार वाढवण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता ? रामदेवबाबा यांचे योगप्रसारात काय योगदान आहे आणि त्यांनी सुरू केलेल्या विविध पतंजली उत्पादनांना केंद्र सरकारने करशुल्क माफी देण्याविषयी तुमचे काय मत आहे?मेडिटेशन किंवा ध्यानधारणा ही आवड किंवा छंद म्हणून अनेक उमेदवार डीटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये हल्ली लिहायला लागले आहेत. ध्यानधारणा म्हणजे काय? ध्यानधारणा आणि एकाग्रता यात काय फरक आहे? ध्यानधारणेचा पतंजली योगशास्त्रामधल्या ध्यान, धारणा, समाधी याच्याशी काही संबंध आहे का? ध्यानधारणेचे काही प्रकार आहेत का? आणि तुम्ही करत असलेली ध्यानधारणा व इतर ध्यानधारणा यात नेमका काय फरक आहे? याबरोबर काही वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्नही विचारले जाऊ शकतात. तुम्ही रोज ध्यानधारणा करता का? किती वेळ करता? ध्यानधारणेचा तुम्हाला नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी कसा उपयोग होतो? ध्यानधारणेमध्ये कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नसतो का? डोक्यातले विचार थांबवणं हे कसं शक्य आहे? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं उमेदवारांनी द्यावीत. उगाच काहीतरी पुस्तकी ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नये. प्रश्न तुमच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल विचारलेला असतो त्यामुळे त्याचे प्रामाणिक उत्तर द्यावे.

विपश्यना मेडिटेशन हे सुद्धा अनेक उमेदवारांच्या डीटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये असते. त्यांना विपश्यना म्हणजे काय? हे तत्त्वज्ञान आहे की तंत्र आहे? गौतम बुद्धाचा आणि विपश्यनेचा काय संबंध आहे? भारतात विपश्यनेचा प्रसार करण्यात एस. एन. गोएंका यांचे काय योगदान आहे? यातही प्रॅक्टिकल स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ‘आम्ही असं ऐकलंय की विपश्यनेला गेल्यावर मौन पाळावं लागत, मोबाइल फोन आपल्याजवळ नसतो, हे सगळं करणं अतिशय कठीण आहे असं तुम्हाला वाटत नाही का?’ तुम्ही किती नियमितपणे विपश्यना करता? त्यासाठी विपश्यना केंद्रातच जावं लागतं की तुम्ही जिथे असाल तिथे करू शकता? विपश्यनेचा तुम्हाला वैयक्तिक काय फायदा झाला आहे? भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये विपश्यनेचा प्रसार कितपत झाला आणि कोणत्या स्वरूपात झाला आहे? तिहारच्या तुरुंगात कैद्यांना सुधारण्यासाठी डॉ. किरण बेदी या भारतातील प्रथम महिला आयपीएस अधिकारी महिलेने विपश्यनेचा कसा उपयोग केला? हार्टफुलनेस मेडिटेशन आणि माईंडफुलनेस मेडिटेशन या विषयी आपणास काय माहिती आहे?

उमेदवारांनी व्यक्तिमत्त्व चाचणीची तयारी करताना कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचे ज्ञान आणि माहिती याची ही चाचणी नाही. हे बोर्डातल्या सदस्यांबरोबर असणारे संभाषण आहे. त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आली नाहीत तरी काही हरकत नाही. प्रामाणिकपणे प्रश्नांची उत्तरे देणे हे महत्त्वाचे आहे.