डॉ.श्रीराम गीत

इंजिनीअर व्हायचं आहे असा हट्ट धरलेल्या मुलांसाठी जेव्हा जेव्हा सीईटी किंवा जेईईचे गुण अपुरे पडतात तेव्हा त्यांच्यासमोर सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, प्रोडक्शन, केमिकल या शाखा स्वीकारण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. खरे तर या प्रत्येकातील काम शिकल्यानंतर वा त्यात अनुभव घेतल्यानंतर उत्तम स्वरूपाची करिअर निर्माण होते. पण सध्याच्या, ‘चट मंगनी पट ब्याह’ पद्धतीत वाढवलेल्या आपल्या मुला बाळांना ते मान्य होत नाही. हाती पदवी आली पण पॅकेज नाही आलं की मुले अस्वस्थ होतात. त्यातून या आधी अनेक वेळा उल्लेख केल्याप्रमाणे, हे काम माझ्या लायकीचे नाही, हे मला आवडत नाही, हे असले मला करायचे नाही, अशा स्वरूपाच्या बडबडीपुढे काम देणारा किंवा काम शिकवायला उत्सुक असणारा कोणीही हात टेकतो. याला ‘दुर्दैवाने’ सध्याचे पालक सुद्धा खूप खतपाणी घालतात. विशेष म्हणजे अशाच स्वरूपाची कामे करत आपण मोठे झालो होतो हेही ते विसरतात. सध्या ४५ ते ५० या वयात असलेले पालक फारच क्वचित आयटीमधील सुयोग्य पदवी घेऊन तेथे कामात शिरलेले असतात. अन्य साऱ्यांनी गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी मूळ पदवी सोडून, मूळ अभ्यास सोडून, कष्ट करत आयटीत कसाबसा प्रवेश मिळवलेला असतो व नंतर ते तिथे स्थिरावून आता मोठय़ा पदावर पोहोचलेले असतात. मग अशाच स्वरूपाचे कष्ट त्यांच्या मुलांनी घेतले तर त्यांना काय अडचण वाटते?           

शाखेत लागणारी कौशल्ये शिका

वर उल्लेख केलेल्या प्रत्येक शाखेतील कामांचे स्वरूप लक्षात घेतले तर त्यात काही वेगळय़ा स्वरूपाची कौशल्ये लागतात. जसे की सिव्हिलमध्ये पायापासून तयार इमारतीचा ताबा ग्राहकाला देऊस्तोवर लागणारा काळ हा तीस महिन्यांचा असतो. हे सारे कमी पगारावर काम स्वीकारून त्यातील साऱ्या खुब्या व कौशल्ये आत्मसात करणारा इंजिनीअर पुढे खूप प्रगती करतो. या उलट सहा महिन्यांत पाया खोदून होण्याच्या आत काम सोडणारा सिव्हिल इंजिनीअर स्वत:च्या करिअरचा पायाच ठिसूळ करून ठेवतो.

आपल्या देशात मोठय़ा प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची असंख्य कामे चालू आहेत. त्यात नवनवीन तांत्रिक गोष्टींचा समावेश होतो. मेट्रो साठीचे पूल, विविध टनेल्स, एकेका दिवसात पाच पाच किलोमीटर तयार होणारे रस्ते, यासाठी वापरली जाणारी अद्ययावत मशिनरी कशी काम करते? ती कुठे उपयोगी पडू शकते? हे शिकणारा मोठय़ा स्वरूपाच्या प्रकल्पावर सहज शिरकाव करून घेतो.

केमिकल प्लांटचे काम कसे चालते हे कळायला पहिली तीन ते पाच वर्षे जावी लागतात. इथे कामगार आणि इंजिनीअर यांच्यात पगार सोडला तर फार फरक राहत नाही. कामाच्या जागा कायमच आडगावी असतात. पण नंतर स्थिरावल्यावर प्रगती खूप वेगाने होते. इन्स्ट्रुमेंटेशन आणि प्रॉडक्शन या दोन्ही शाखांमध्ये कृतिशील सर्जनता दाखवली व कामाची समग्र माहिती घेतली तर प्रगती नक्की होते. या दोन्ही शाखातून अनेक यंत्रणांच्या व्यवस्थांची निर्मिती होत असते. तिचे आकलन होण्यासाठीही चार-पाच वर्षे द्यावी लागतात.

वर उल्लेख केलेल्या प्रत्येक शाखेत आता ४० टक्के आयटीचा शिरकाव झालेला आहे. मात्र, प्रत्येक क्षेत्रातील आयटी उपयोजनाची पद्धत वेगळी. तयार पॅकेज कस्टमाईज करून त्या त्या क्षेत्रात वापरतात. यातून अनेक मुली सुद्धा या क्षेत्रात येऊ शकतात. शिवाय ज्यांना प्लांट वर काम करणे आवडत नाही त्यांच्यासाठी मार्केटिंग नावाचे एक मोठे क्षेत्र या सर्व शाखातून उपलब्ध असते. प्रॉडक्शन इंजिनअरला सप्लायचे मॅनेजमेंट व मटेरियल मॅनेजमेंटमध्ये एखादी पदविका घेतली तर छान प्रगती होते. इलेक्ट्रिकलमध्ये अल्टरनेटिव्ह, ग्रीन एनर्जीवर आता साऱ्यांचेच लक्ष केंद्रित झालेले आहे. एनर्जी सेविंग हा त्यातील फार कळीचा मुद्दा आहे. त्या संदर्भातही काही उत्तम अभ्यासक्रम पूर्ण करून करिअरची प्रगती साधता येते.

या करता एकाच गोष्टीची आवश्यकता असते. त्या क्षेत्रात नोकरी स्वीकारून पहिली दोन वर्षे तेथील काम शिकणे व त्याला पूरक अशी कौशल्य आत्मसात करणे. गेल्या सहा महिन्यांत या उल्लेख केलेल्या सर्व शाखातील नोकरी न मिळालेले विद्यार्थ्यांचा समावेश साठ टक्के होतो. तर उरलेल्या ३५ टक्क्यांमध्ये कॉम्प्युटर किंवा आयटीचा हट्ट धरून पदवी घेतलेल्यांचा होतो. तो हट्ट धरलेल्यांसाठी येत्या मंगळवारी खास लेखात.