स्वातीला नवीन नोकरी मिळून चार महिने झाले होते. तिने नवीन नोकरी मिळाल्यानंतर तिथल्या वातावरणाशी व कंपनीतील इतर सहकाऱ्यांशी जुळवून घेण्याचा व मैत्री करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु थोडेच दिवसात आपण कंपनीमध्ये नकोसे आहोत आहोत का असे तिला वाटू लागले होते. आपल्याशी सहकारी कमी बोलतात, आपल्याकडे लक्ष देत नाहीत, आपल्या सांगण्याला किंवा आपण मांडलेल्या मुद्द्यांना फारसे महत्त्व देत नाहीत असे तिला वाटू लागले. एकंदरीत आपली नोकरीची निवड आणि ठिकाण चुकले का, असा संभ्रम स्वातीच्या मनामध्ये निर्माण होऊ लागला. खरंतर स्वाती अतिशय मितभाषी, विनम्र आणि कष्टाळू मुलगी होती. आपल्याला दिलेले काम प्रामाणिकपणे करण्याचा मनोमन प्रयत्न करत होती तरीदेखील तिला आपण कंपनीत नकोसे आहोत किंवा आपली इथे काही गरज नाही असे वाटत होते.
स्वातीशी या विषयावर बोलल्यानंतर असे लक्षात आले की ती भावनिकदृष्ट्या असुरक्षित आहे. लहानपणीपासूनच घरातील लग्नकार्य समारंभ किंवा इतर लोकांशी जमवून घेताना आपण इतरांपेक्षा कमी आहोत असे तिला पूर्वीपासूनच वाटायचं. भावनिक दृष्ट्या असुरक्षित वाटत असल्याने सतत समोरच्या लोकांशी जुळवून घेणे, परिस्थितीला आहे तसे सामोरे जाणे, समोरच्या व्यक्तीचा विचार आधी करणे, आपलं काही चुकतंय का सतत तपासून पाहणे अशा अनेक गोष्टी तिच्याकडून नेहमीच होत होत्या. म्हणजेच स्वातीला भावनिक स्तरावर समोरच्या व्यक्तीने आपल्याला सतत समजून घ्यावे असे वाटत होते. कंपनीत इतर सहकाऱ्यांबरोबर काम करताना देखील ती समोरच्या व्यक्तीकडून भावनिक स्तरावरच्या अपेक्षा ठेवत होती. त्यामुळे वारंवार इतरांकडून तिचा अपेक्षाभंग होत होता. भावनाप्रधान व्यक्ती बहुतेक वेळा स्वत:च्या विश्वामध्ये रमताना दिसतात. त्याचबरोबर कुठल्याही नात्यांमध्ये किंवा कुठलीही जबाबदारी पार पाडताना त्यांना समोरच्या व्यक्तीकडून सतत कौतुकाची थाप अपेक्षित असते, तसं झालं नाही तर अशा व्यक्ती लगेच दु:खी होताना दिसतात किंवा कालांतराने निराश देखील होतात.
विचार, भावना आणि वर्तन हे तिन्ही स्तर आपल्या मनाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये भावनांना अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण कुठल्याही कृती मागे भावनांचं प्रेरणास्थान असण आवश्यक असतं. हे जरी खरं असलं तरी आपल्या भावना ही आपली वैयक्तिक निर्मिती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला भावनिक स्तरावर जे वाटेल तेच समोरच्या व्यक्तीला ही वाटेल आणि पटेल हे गृहीत धरण अत्यंत अपेक्षाभंग करणारे आहे असं मला वाटतं. स्वातीला याच गोष्टींचा खूप त्रास होत होता. आपल्या भावना या व्यक्तिगत स्तरावर आहेत हे आपण जाणून घेतले पाहिजे आणि त्या भावनांचे नियोजन देखील आपल्या वैयक्तिक पातळीवरच व्हायला हवे. आपल्या भावना आणि समोर असलेले वास्तव हे नेहमीच भिन्न असणार आहेत याची जाणीव आपल्याला हवी. त्यामुळे स्वातीच्या असलेल्या भावना आणि वास्तव यातील तफावत मी स्वातीच्या लक्षात आणून दिली.
आपल्या कामाची प्रशंसा व्हावी समोरच्या व्यक्तीने त्याचे कौतुक करावे ही स्वातीची व्यक्तिगत पातळीवरची भावनिक गरज आहे हे मी तिच्या लक्षात आणून दिले. त्याचबरोबर तिचा नोकरी करण्याचा नक्की उद्देश काय आहे? ही नोकरी स्वीकारताना तिने नक्की कुठल्या गोष्टींना प्राधान्य दिले? असे काही प्रश्न विचारल्यानंतर स्वातीला त्याची नीट उत्तरे देत आली नाहीत कारण ही नोकरी स्वीकारण्याचा निर्णय देखील तिने भावांनी स्तरावरच घेतला होता. कुठलीही नोकरी स्वीकारण्याअगोदर ती नोकरी आपण का स्वीकारत आहोत याबद्दल वैचारिक स्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे.
मला माझी आर्थिक प्रगती करायची आहे? मला मानसिक भावनिक स्तरावर समाधान हवे आहे? का व्यावसायिक स्तरावर माझा व्यक्तिमत्व व कौशल्य विकास करायचा आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला नोकरी स्वीकारण्या अगोदर माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या व्यक्तिगत व भावनिक गरजा नोकरीच्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतील असे मला वाटत नाही. नोकरीच्या ठिकाणी आपण एक पद व जबाबदारी स्वीकारलेली असते त्यामुळे आपले व्यक्तिगत असे फारसे काही राहत नाही. स्वातीची नेमकी याच स्तरावर गडबड होत होती. तिला मी व्यावसायिक स्तरावर ध्येय निश्चिती, कौशल्य विकास, व भावनांचे व्यवस्थापन व नियोजन कसे करावे याविषयी समजावून सांगितले.
आपण प्रत्येकाने कुठलीही नोकरी स्वीकारताना मी नक्की नोकरी का करतोय? मला या नोकरीतून नक्की काय हवे आहे? त्याविषयीची माझी ध्येय व उद्दिष्ट कोणती आहेत? या सर्व घटकांचा पुरेपूर विचार करून मगच नोकरी स्वीकारावी ज्यामुळे नोकरीच्या ठिकाणी असलेले वातावरण व तेथील सहकारी यांच्याबरोबर काम करताना यश व आनंदाची निर्मिती होईल असे मला मनोमन वाटते.
drmakarandthombare@gmail.com