Success Story: नोकरी म्हटलं की प्रत्येक नोकरदाराला कामाचा ताण, कमी पगारवाढ, सहकाऱ्यांबरोबर स्पर्धा, मालकाची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. करिअरसाठी आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अनेक जण या सर्व गोष्टी सहन करतात. पण, तरीही काहींच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते, पण प्रत्येक जण तो करू शकत नाही. परंतु, मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केले आहे. त्यांनी पाच लाखांचे कर्ज काढून व्यवसाय सुरू केला, जो आता १५० कोटींच्या घरात पोहोचला आहे.

मध्य प्रदेशातील दमोह शहरातील रहिवासी राज नवानी यांनी १९९५ मध्ये पाच लाखांचे कर्ज घेऊन सॉरी मॅडम नावाने एक छोटे कपड्याचे दुकान सुरू केले. पण, आज त्याच दुकानाचा मोठा ब्रँड तयार झाला आहे. फॅशनच्या दुनियेत या ब्रँडचा दबादबा आहे. आज त्यांच्या ब्रँडचे कपडे अनेक सेलिब्रिटीही वापरतात. परंतु, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी राज यांना खूप संघर्ष करावा लागला होता.

छोट्या दुकानापासून सुरू झाला प्रवास

दमोहमधील छोटया शहरातून राज नवानी यांनी जे करून दाखवलं ते कदाचित एखाद्या मध्यमवर्गीयाचे स्वप्न असेल. त्यांनी पुरुषांच्या कपड्यातील नॉस्ट्रम ब्रँडला १५० कोटींच्या व्यवसायात रूपांतरीत केले. हा ब्रँड बनवण्यापूर्वी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आणि एक लहान दुकान सुरू केले. खूप मेहनत केली, मार्केटमध्ये आलेल्या प्रत्येक फॅशन स्टाइलवर लक्ष ठेवून सुधारणा केली. ब्रँड मोठा करण्यासाठी अनेक ठिकाणांहून निधी मिळवला आणि हळूहळू हा ब्रँड मोठा झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज नवानी यांना लहानपणापासूनच व्यवसाय करण्याची इच्छा

राज नवानी यांना लहानपणापासून व्यवसाय करायचा होता, म्हणूनच त्यांनी त्यांच्या वडिलांचे कपड्यांचे दुकान ‘जय जवान जय किसान’ कडून प्रेरणा घेतली आणि व्यवसाय जगात प्रवेश केला. मग काही वेळातच त्यांचे दुकान शहरात प्रसिद्ध झाले. त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी व्यवसाय सुरू केला. त्यांचे नॉस्ट्रम फॅशन प्रायव्हेट लिमिटेड आज एक मोठे नाव आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात त्यांच्या कंपनीची उलाढाल १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. आता त्यांचे लक्ष्य पुढील दोन वर्षांत ५०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे आहे. ही कंपनी २५० कर्मचाऱ्यांसह काम करत आहे. नॉस्ट्रम ब्रँड आज देशभरातील १,५०० हून अधिक मल्टी-ब्रँड आउटलेट्स आणि १०० हून अधिक शॉप-इन-शॉप ठिकाणी उपलब्ध आहे.