यूपीएससी मुख्यपरीक्षेतील ‘जीएस ३’ या पेपरमधील ‘अंतर्गत सुरक्षा’ हा घटक आपण या लेखात समजून घेणार आहोत. अंतर्गत सुरक्षा हा यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेचा एक महत्त्वाचा घटक असून यात दहशतवाद, सायबर गुन्हे, सीमा व्यवस्थापन, संघटित गुन्हे आणि विविध सुरक्षा संस्थांची भूमिका यांसारख्या विस्तृत विषयांचा समावेश आहे. या विभागात चांगले गुण मिळवण्यासाठी एक संरचित आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन महत्त्वाचा आहे.
‘अंतर्गत सुरक्षा’ या घटकासाठी आयोगाने यासाठी दिलेला अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे –
- अतिरेकीवादाचा विकास आणि प्रसार यांच्यातील संबंध.
- अंतर्गत सुरक्षेला आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राष्ट्रे आणि राष्ट्राबाहेरील घटकांची भूमिका.
- संप्रेषण नेटवर्कद्वारे अंतर्गत सुरक्षेला आव्हाने, अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांमध्ये मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साइट्सची भूमिका, सायबर सुरक्षेची मूलतत्त्वे; मनी-लाँडरिंग आणि त्याचे प्रतिबंध.
- सीमावर्ती भागात सुरक्षा आव्हाने आणि त्यांचे व्यवस्थापन – संघटित गुन्हेगारीचे दहशतवादाशी संबंध.
- विविध सुरक्षा दल आणि एजन्सी आणि त्यांचे आदेश.
२०२४ च्या मुख्य परीक्षेत याच्याशी संबंधित पुढील प्रश्न बघा. यापैकी खालील एका प्रश्नांच्या उत्तरातील अपेक्षित मुद्दे बघूयात –
प्र. देशभरात नार्को-दहशतवाद हा एक गंभीर धोका म्हणून कसा उदयास आला आहे ते स्पष्ट करा. नार्को-दहशतवादाचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना सुचवा. (१५० शब्दात उत्तर द्या) १० गुण
अमली पदार्थांच्या तस्करी आणि दहशतवादी कारवायांचे एकत्रीकरण म्हणजेच अंमली पदार्थ-दहशतवाद वा नार्को-दहशतवाद होय.
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी यातून पुढीलप्रमाणे गंभीर धोके निर्माण होतात –
१. दहशतवादाला निधीचा पुरवठा करणे : अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळणारे उत्पन्न, विशेषतः गोल्डन क्रेसेंट (अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण) पासून, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांना थेट वित्तपुरवठा करते, जम्मू आणि काश्मीर सारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये बंडखोरींना चालना देते.
२. अस्थिरता निर्माण होणे : पंजाब सारख्या राज्यांमध्ये व्यापक अमली पदार्थांचा वापर आणि व्यसन, सामाजिक रचनेला अस्थिर करते आणि अतिरेकी आणि दहशतवादी गटांद्वारे भरतीसाठी योग्य वातावरण तयार करते. यामुळे भारतातील मानव संसाधनांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित होतात.
३. सीमा असुरक्षितता वाढते : सच्छिद्र सीमा सीमापार तस्करीला प्रोत्साहन देतात, अनेकदा यासाठी ड्रोन वापरले जातात. अंमली पदार्थ आणि दहशतवादी घटकांना देशात घुसखोरी करण्यास यामुळे बळ मिळते.
४. संघटित गुन्हेगारी संबंध: अमली पदार्थ-दहशतवाद संघटित गुन्हेगारी सिंडिकेटला बळकटी देतो, ज्यामुळे कायदा अंमलबजावणी संस्थांसमोरील आव्हान आणखी वाढते.
या समस्यांसाठीच्या उपाययोजना –
१. सीमा सुरक्षेत वाढ करणे : संवेदनशील सीमांवर तस्करीच्या कारवाया रोखण्यासाठी ड्रोन, सेन्सर्स आणि एआय सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा पाळत ठेवणे आणि देखरेख वाढवणे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करणे ही काळाची गरज आहे.
२. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी : नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, १९८५ ला बळकटी देणे. ड्रग्ज कार्टेल आणि दहशतवाद्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या नेटवर्कना लक्ष्य करण्यासाठी नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) सारख्या एजन्सींची क्षमता वाढविणे.
३. आंतरराष्ट्रीय सहकार्य : गुप्तचर माहिती सामायिकरण आणि समन्वित ऑपरेशन्ससाठी शेजारील देश (पाकिस्तान, म्यानमार, अफगाणिस्तान इ.) आणि यूएनओडीसी आणि इंटरपोल सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य मजबूत करणे ही काळाची गरज आहे.
४. जनजागृती आणि पुनर्वसन: ड्रग्जची मागणी कमी करण्यासाठी आणि कट्टरतावाद रोखण्यासाठी जागरूकता मोहिमा राबवणे आणि पुनर्वसन केंद्रांचा विस्तार करणे विशेषतः पंजाब सारख्या राज्यांसाठी.नार्को-दहशतवादाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी आणि भारताची राष्ट्रीय सुरक्षा व सामाजिक कल्याणाचे रक्षण करण्यासाठी मजबूत सीमा सुरक्षा, कायदा अंमलबजावणी कारवाई, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सामाजिक हस्तक्षेप यांचा समावेश असलेली एक व्यापक, बहुआयामी रणनीती आवश्यक आहे.
प्र. भारताची चीन आणि पाकिस्तानशी असलेली दीर्घ आणि अशांत सीमा वादग्रस्त मुद्द्यांनी भरलेली आहे. सीमेवरील परस्परविरोधी मुद्दे आणि सुरक्षा आव्हानांचे परीक्षण करा. सीमा क्षेत्र विकास कार्यक्रम (BADP) आणि सीमा पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन (BIM) योजनेअंतर्गत या क्षेत्रांमध्ये करण्यात येत असलेल्या विकासाची माहिती देखील द्या. (२५० शब्दात उत्तर द्या) १५ गुण
प्र. सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टिंग मेसेजिंग सेवा एक गंभीर सुरक्षा आव्हान निर्माण करतात.सोशल मीडियाच्या सुरक्षा-परिणामांना तोंड देण्यासाठी विविध स्तरांवर कोणते उपाय अवलंबले गेले आहेत? या समस्येचे निराकरण करण्यासाठी इतर कोणतेही उपाय देखील सुचवा. (२५० शब्दात उत्तर द्या) १५ गुण
‘जीएस ३’ मध्ये २५० पैकी ४५ गुणांचे प्रश्न अंतर्गत सुरक्षा या घटकावर विचारले आहेत. तेव्हा आगामी परीक्षेसाठी या घटकाची तयारी वरील विश्लेषणाच्या आधारे करा.
sushilbari10@gmail.com