सागर भस्मे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण पैशाचे गुणधर्म आणि पैशाची महत्त्वाची कार्ये याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण पैसा आणि चलन यातील फरक, तसेच आभासी चलन म्हणजे काय? याबाबत जाणून घेऊ या.

पैसा म्हणजे काय?

पैसा आणि चलन हे आपल्या दैनंदिन जीवनात वापरले जाणारे दोन महत्त्वाचे शब्द आहेत. पैसा आणि चलन या शब्दाचा अर्थ शक्यतोवर समानच समजला जातो. तथापि, त्यांचे अर्थ भिन्न आहेत. पैसा ही एक व्यापक संज्ञा आहे; जी मूल्याच्या अमूर्त प्रणालीचा संदर्भ देते. पैशामुळे वस्तू आणि सेवांची देवाण-घेवाण आता आणि भविष्यात शक्य होते.

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : पैसा व चलन भाग – २

चलन म्हणजे काय?

चलन हे पैशाचे फक्त एक मूर्त स्वरूप आहे. पैसा आणि चलन यांच्यातील मुख्य फरक हा आहे की, पैसा हा संपूर्णपणे संख्यात्मक असतो म्हणजेच तो केवळ अमूर्त असतो. त्याला स्पर्श करता येऊ शकत नाही. याउलट आपण चलनाला अनुभवू शकतो, स्पर्श करू शकतो. पैसा ही मोजण्यास कठीण संकल्पना आहे; तर चलन मोजता येऊ शकणारी संकल्पना आहे.

वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याकरिता देय म्हणून वापरात येणाऱ्या कोणत्याही वस्तूला पैसा, असे म्हणता येते. त्यामध्ये ऑनलाईन व्यवहार, धनादेश, तसेच बँक पैसा इत्यादीचा समावेश पैसा या संकल्पनेमध्ये होतो. याच पैशाचा एक प्रकार म्हणजे चलन होय. चलन हे पैशाला जिवंत ठेवण्याचे कार्य करीत असते. चलनामध्ये नाणी, नोटा म्हणजेच आपल्याजवळील दैनंदिन व्यवहारातील सर्वमान्य स्वीकृती असलेला एक प्रकारचा पैसाच आहे. त्याला आपण अस्वीकृत करू शकत नाही. याउलट धनादेश, तसेच ऑनलाईन व्यवहार या पद्धतीचा व्यवहार आपण नाकारू शकतो. वैध चलन हे मध्यवर्ती बँकेने निर्गमित व नियंत्रित केलेला सर्वमान्य स्वीकृती असलेला पैसा आहे. यावरून एक महत्त्वाची बाब आपल्या निदर्शनास येते ती म्हणजे सर्व चलने हे पैसे असतात; परंतु सर्वच पैसे हे चलन नसतात.

आभासी चलन :

आधुनिक काळात चलनाचा एक नवा प्रकार उदयास आला आणि तो म्हणजे आभासी चलन. आभासी चलन म्हणजेच बिटकॉइन. बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे. या डिजिटल चलनाद्वारे पैसे जगभरात कोठेही पाठविता येतात. ही एक क्रिप्टोग्राफी प्रकारातील हॅशिंग कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे. बिटकॉइन जागतिक सुरक्षित करमुक्त आभासी चलन आहे. अलीकडे बिटकॉइनसारखी अनेक आभासी चलने अस्तित्वात आली आहे. जसे लाइटकॉइन, रिपल, इथेरियम, डॉजकॉइन, कॉइन्ये, नेम, डॅश, मोनेरो, ब्लॅक कॉइन इत्यादी.

आभासी चलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आजपर्यंत जगात कुठलीही केंद्रीय यंत्रणा तयार झालेली नाही. हा डिजिटल पैसा पारंपरिक वित्तीय संस्थांद्वारे नियमन केला जात नाही; तो विकसकांद्वारे जारी केला जातो आणि नियंत्रित केला जातो. हा पैसा कुठल्याही मध्यवर्ती बँकांनी किंवा कोणत्याही वैध यंत्रणेद्वारे जारी केलेला नाही. हे व्यवहार संगणकीय जाळ्यांद्वारे चालविले, तसेच सोडविले जातात. यामधील चलनाची किंमत ही निश्चित नसते; परिस्थितीनुसार ती कमी-जास्त होत असते. या व्यवहारांमध्ये कुठलाही मध्यस्थ नसतो. त्यामुळे कुठलेही सरकार किंवा मध्यवर्ती बँकेला या व्यवहाराचा काहीच पत्ता लागत नाही. या व्यवहारांमध्ये गोपनीयता राखली जाते. त्यामध्ये नाव, पत्ता, कुठलीही व्यक्तिगत माहिती प्रत्यक्ष जोडली नसल्यामुळे गोपनीयता राखण्यासाठी हा एक योग्य पर्याय‌ आहे. याचा वापर मर्यादित असल्याने सर्वच व्यवहार याद्वारे शक्य होत नाहीत.

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : पैसा आणि चलन भाग-१

भारत आणि आभासी चलन :

या आधुनिक काळातील चलनाच्या धर्तीवरच आरबीआयद्वारेही पाऊल उचलण्यात आले आहे. ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून रिझर्व्ह बँकेने स्वतः डिजिटल चलन निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बिटकॉइन आणि भारतीय आभासी चलन यामध्ये फरक आहे. या चलनाला CBDC (Central Bank Digital Currency) असे म्हटले आहे. याला वैध चलन म्हणून मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच त्यावर आरबीआयचे नियंत्रण असणार आहे. हे व्यवहार अत्यंत सुरक्षित, शीघ्र, स्वस्त व जागतिक असणार आहेत. त्यामध्ये मध्यस्थी म्हणून इतर बँकेचा सहभाग नसून, केवळ आरबीआयद्वारे हे व्यवहार चालवण्यात येतील. त्यामुळे व्यवहार शीघ्र गतीने होण्यास मदत होईल. बिटकॉइनला सामान्य स्वीकृती नसते; परंतु सीबीडीसी हे वैध चलन असल्याने अर्थव्यवस्थेत सामान्य स्वीकृती असणार आहे. सीबीडीसीद्वारे घाऊक, तसेच किरकोळ दोन्ही व्यवहार करणे शक्य आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian economy money and currency part 3 difference money and currency and what is bitcoin mpup spb
First published on: 17-07-2023 at 13:27 IST