scorecardresearch

Premium

UPSC-MPSC : भारताचा भूगोल : गंगा नदी प्रणाली

Indian Geography : मागील लेखातून आपण सिंधू नदी प्रणालीविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण गंगा नदीप्रणालीविषयी जाणून घेऊ या.

ganga river system, indian river system in marathi
भारताचा भूगोल : गंगा नदीप्रणाली ( फोटो- लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

सागर भस्मे

Indian River System In Marathi : गंगा ही भारतातील सर्वात मोठी व सर्वात लांब नदी असून तिचा उगम पश्चिम हिमालयात सुमारे ६६०० मी. उंचीवरील गंगोत्रीजवळ भगीरथी या हिमनदीतून होतो. पुढे तिला देवप्रयाग येथे अलकनंदा व रुद्रप्रयाग येथे मंदाकिनी या उपनद्या येऊन मिळतात. या प्रवाहाला गंगा नदी म्हणतात. गंगा ही भारतातील महत्त्वाची नदी असून गंगा-ब्रह्मपुत्रा-मेघना खोरे देशाच्या एकचतुर्थांश भौगोलिक प्रदेशात पसरलेले आहे. गंगा नदीचा विस्तार उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड व पश्चिम बंगाल या पाच राज्यात आहे. यमुनोत्री या हिमनदीतून उगम पावलेली यमुना नदी अलाहाबादजवळ गंगेला मिळते. गंगा नदीच्या पाणलोट क्षेत्राने भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे २६ टक्के क्षेत्र आणि देशातील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकसंख्या गंगा नदीखोऱ्यात येते. तिची भारतातील लांबी सुमारे २५२५ कि.मी. असून तिचे पाणलोट क्षेत्र ८,६२,४०४ चौ.कि.मी. आहे. पुढे गंगा नदी बंगालच्या उपसागराच्या दिशेने वाहत असताना तिला डाव्या किनाऱ्यावरून महानंदा, रामगंगा, घागरा (शरणू), गंडक, भागमती, कोसी या हिमालयात उगम पावलेल्या नद्या येऊन मिळतात, तर उजव्या किनाऱ्यावरून हिमालयात उगम पावणारी यमुना व माळव्याच्या पठारावरून वाहत येणारी शोण व दामोदर नदी मिळते.

AJIT PAWAR
अजित पवारांचा जरांगे पाटलांना इशारा, मराठा आक्षणावर बोलताना म्हणाले; “आपण काय बोलतोय…”
kamalnath
भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर कमलनाथ यांनी सोडले मौन; म्हणाले, “माझा…”
krishna River System
UPSC-MPSC : भारताचा भूगोल : कृष्णा नदी प्रणाली
Indian Geography
UPSC-MPSC : भारताचा भूगोल : सिंधु नदी प्रणाली

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : सिंधु नदीप्रणाली

गंडक नदी

दक्षिण तिबेटमध्ये हिमालयात ७६०० मी. उंचीवर धौलगिरी शिखराजवळ गंडक नदीचा उगम होतो. तिची एकूण लांबी ६७५ कि.मी. असून भारतात तिची लांबी ४२५ कि.मी. आहे. ती पाटण्याजवळ गंगेला येऊन मिळते. नेपाळमध्ये गंडक नदीला ‘काली नदी’ असे म्हणतात. गंडक नदीचे भारतातील जलप्रणाली क्षेत्र ९५४० चौ.कि.मी. आहे. काली व त्रिशूली यांच्या एकत्रित प्रवाहास गंडक म्हणतात. तिला शालिग्रामी तसेच नारायणी या नावाने नेपाळमध्ये ओळखले जाते.

शोण

अमरकंटक पठाराच्या उंच भागात शोण नदीचा उगम होतो. शोण नदीची लांबी ७८४ कि.मी. असून क्षेत्रफळ ७१२५९ चौ.कि.मी. आहे. शोण नदी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये वाहते. उगमापासून काही अंतर गेल्यावर ती अमरकंटकच्या पठारावरून खाली उतरते व बिलासपूर व रेवा या जिल्ह्यातून वाहत जाऊन उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात तिने रुंद व खोल अशा दऱ्या तयार केल्या आहेत. काही ठिकाणी ह्या दऱ्या खोल घळईच्या स्वरूपाच्या असून बिहार राज्यात आल्यावर दिनाजपूर शहराच्या उत्तरेस पाटणा येथे ती गंगा नदीला येऊन मिळते. पाटण्याच्या पूर्वेस राजमहाल टेकड्यांना वळसा घालून गंगा नदी दक्षिणेला वळते, तेव्हा तिला अनेक उपफाटे फुटतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : भारतीय सरोवरे

रामगंगा

या नदीचा उगम उत्तराखंडमधील गडवा जिल्ह्यात होत असून तिची एकूण लांबी २५६ किलोमीटर आहे. ही नदी उत्तर प्रदेशात गंगेला मिळते व तेथे तिच्यावर रामगड नावाचे धरण तयार करण्यात आले आहे.

गोमती नदी

या नदीचा उगम उत्तर प्रदेशातील पिलिभीत शहराजवळ होत असून तिची एकूण लांबी २४० किलोमीटर आहे. ही नदी उत्तर प्रदेशातील गाझीपूर जवळ गंगेला डाव्या किनाऱ्यावर मिळते.

दामोदर नदी

या नदीचा उगम झारखंडमध्ये छोटा नागपूरच्या पठारावर होत असून तिची एकूण लांबी ५४१ किलोमीटर आहे. ही नदी झारखंड व पश्चिम बंगाल या दोन राज्यातून प्रवास करते. पुढे ती कोलकत्ता शहराजवळ हुबळी येथे गंगा नदीला मिळते. छोटा नागपूरचे पठार खनिज संपत्तीने समृद्ध असल्यामुळे दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये अनेक औद्योगिक प्रकल्प पाहायला मिळतात.

महानंदा

या नदीचा उगम पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग क्षेत्रांमध्ये होतो. ही नदी भारत व बांगलादेशच्या सीमेवरून वाहते. महानंदा ही गंगेची उत्तर प्रदेशातील शेवटची उपनदी आहे.

चंबळ

चंबळ ही यमुनेची सर्वात महत्त्वाची उपनदी असून ही नदी विंध्य पर्वतात उगम पावते व माळवा पठारावरून वाहत जाते. नंतर सुमारे ९६ कि.मी. लांबीच्या घळईतून चंबळ नदी कोटापर्यंत वाहत जाते. चंबळच्या प्रवाहमार्गात अनेक खोल घळ्या आहेत. गांधीसागर, राणा प्रतापसागर, जवाहरसागर हे चंबळ नदीवरील प्रकल्प आहेत. ही नदी मध्य प्रदेश व राजस्थान या दोन राज्यांच्या सीमेवरून वाहते. चंबळ नदी ही घळ्या, दऱ्या-खोऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

घागरा नदी

ही नदी तिबेटमध्ये मानसरोवराच्या दक्षिणेस गुरला मंधोटा शिखराजवळ उगम पावते व छाप्राजवळ गंगेला येऊन मिळते. घागरा नदीची एकूण लांबी १०८० कि.मी. असून या नदीने अनेकदा प्रवाह बदलले असल्याचे पुरावे मिळतात. अयोध्या प्रदेशातील ही सर्वात मोठी नदी असून तिच्या पात्रात काही प्रमाणात दळणवळण चालते. घागरा नदी हीच शरयू नदी म्हणून ओळखली जाते व तसेच ही नदी नेपाळमध्ये मांचू व कर्नाली या नावाने ओळखली जाते.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारताचा भूगोल : द्वीपकल्पीय पठारावरील नद्या व त्यांचा विस्तार

कोसी नदी

या नदीचा उगम नेपाळ, सिक्किम व तिबेटमधील हिमाच्छादित शिखरांवरून उगम पावणाऱ्या सात शीर्षप्रवाहाचे नेपाळमध्ये एकत्रीकरण होऊन झालेला आहे. कोसी नदीला सप्तकोसी असेदेखील म्हणतात. सप्तकोसी, संबाकोसी, तलखा, दुधकोसी, बेतियाकोसी, अरुण आणि तांबर या कोसीच्या उपनद्या आहेत. हनुमाननगरजवळ ही नदी भारतात प्रवेश करते, तिची एकूण लांबी ७३० कि.मी. असून गेल्या २०० वर्षांत तिने पश्चिमेला सुमारे ११२ कि.मी. अंतरापर्यंत प्रवाह बदलला आहे. कोसी स्वभावोद्भूत नदी आहे. नदीपात्र बदलत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीव व वित्तहानीची शक्यता असल्याने या नदीला ‘खट्याळ नदी’ असेही म्हणतात.

यमुना

हिमालयातील तिहरी जिल्ह्यातील यमुनोत्री या हिमनदीपासून यमुना ही गंगेची उपनदी उगम पावते. तिच्या उगमापासून अलाहाबादपर्यंत यमुनेची लांबी १३७६ कि.मी. असून जलप्रणाली क्षेत्र ३,६६,२१६ चौ.कि.मी. आहे. यमुना ही गंगेची सर्वात लांब पश्चिमेकडील नदी असून ही नदी हरयाणा व उत्तर प्रदेश यांच्यातील सीमा निश्चित करते. गंगा नदीच्या उपनद्यांमधील सर्वात लांब व महत्त्वाची नदी यमुना नदी आहे. यमुनेला डाव्या किनाऱ्यावरून हिंदन रिप टोन्नर, कारवान, सेंगर तर उजव्या किनाऱ्यावरून गिरी, बाणगंगा, चंबळ, सिंध, बेटवा, केन या उपनद्या येऊन मिळतात. यमुनाकाठी आग्रा येथे प्रसिद्ध ताजमहाल आहे. अलाहाबादजवळ यमुना गंगेला मिळते. या संगमाला ‘त्रिवेणी संगम’ म्हणतात. यमुना नदीचा राजकीय विस्तार क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमानुसार मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हरयाणा या राज्यांत झालेला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc mpsc indian geography ganga river system mpup spb

First published on: 21-06-2023 at 17:40 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×