हृषिकेश बडवे
अर्थशास्त्र विषयाला यूपीएससी पूर्व अणि मुख्य परीक्षेमध्ये खूप महत्त्व आहे. सर्वसाधारणपणे पूर्व परीक्षेतील पेपर १( GS) मधील १५ ते ३० टक्के प्रश्न म्हणजेच २०० गुणांपैकी ३० ते ६० गुण हे अर्थशास्त्र या विषयावर विचारले जातात. त्याचबरोबर मुख्य परीक्षेतील GS3 या पेपरमध्ये सर्वसाधारणपणे ११५ ते १३० गुणांपर्यंत या विषयावर प्रश्न विचारले जातात. परीक्षेच्या दृष्टीने जिथे १-२ गुणांमध्ये हजारो विद्यार्थी Cut off घालवतात अशावेळी एवढय़ा मार्काचा पेपर किती महत्त्वाचा आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या लेखमालेच्या रूपाने आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील अर्थशास्त्राचा अभ्यास कसा करावा यावर थोडाप्रकाश टाकणार आहोत. परंतु त्याआधी या विषयाचे स्वरूप समजावून घेऊ.
अर्थशास्त्र हे सूक्ष्मलक्षी आणि समग्रलक्षी अशा स्वरूपात विभागलेले असते. त्यापैकी यूपीएससीसाठी समग्रलक्षीअर्थशास्त्र (म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था) महत्त्वाचा घटक आहे. असे असले तरी अर्थशास्त्राचा उगम सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामधून झाला असल्यामुळे, त्यामधील महत्त्वाच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. या दोन्ही संकल्पनांच्या तयारीसाठी इयत्ता १२वी (NCERT) चे microeconomics हे पाठय़पुस्तक महत्त्वाचे ठरते. परंतु या पुस्तकाचे सिलेक्टिव रीडिंग करणे गरजेचे आहे.
अभ्यासाची सुरवात करताना सर्वप्रथम अर्थशास्त्र अणि अर्थव्यवस्था यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे ठरते. अर्थशास्त्र हे मानवाच्या अमर्यादित गरजा व त्या पूर्ण करण्यासाठी असणारी मर्यादित संसाधने यांचा ताळमेळ लावणारे शास्त्र आहे. म्हणजेच मनुष्यप्राणी हा स्वत:च्या गरजा भागवण्यासाठी निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित विविध संसाधनांचा वापर करून वस्तू व सेवा निर्माण करत असतो व त्याद्वारे आपल्या गरजा, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. वस्तू वा सेवांचे फक्त उत्पादन करून चालत नाही, तर त्यांचे वितरण, विनिमय व उपभोग घेतल्यावरच मानवाच्या गरजांचे समाधान होते. म्हणजेच उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग यांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र होय. या प्रयत्नांतून तो समाजातील विविध घटकांशी विविधरूपी व्यवहारांमध्ये स्वत:ला बांधून घेतो, अशा व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हणतात. हे आर्थिक व्यवहार सुरळीत चालण्यासाठी समाजातील उत्पादन करणाऱ्या संस्था (Firms); वितरण करणाऱ्या संस्था (Firms/ Traders / व्यापारी/ दुकानदार इत्यादी); उपभोग घेणारे लोक (Household); व इतर संस्था (Firms, सरकार इत्यादी) हे एकमेकांशी विविध व्यवहार, नियम अथवा परस्परसंबंधाने बांधले गेलेले असतात. समाजातील या घटकांना व त्यांच्यातील अशाप्रकारच्या संरचनेला अर्थव्यवस्था असे म्हणतात. अर्थव्यवस्थेच्या ज्या विविध बाबींचा अभ्यास आपल्याला मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाचाआहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे –
१. भारतीय अर्थव्यवस्था – नियोजन व संबंधित समस्या, संसाधन विकास व एकत्रीकरण, आर्थिक वाढ, आर्थिक विकास, रोजगार.
२. सर्वसमावेशक वाढ व संबंधित समस्या
३. अर्थसंकल्प
४. कृषी अर्थशास्त्र –
A. प्रमुख पिके व पीक पद्धती
१. देशातील विविध भागातील मुख्य पीक-पीक पद्धती,
२. सिंचन, सिंचनाचे प्रकार व पद्धती
३. शेतमालाची साठवणूक, वाहतूक व विपणन – संबंधित समस्या व अडथळे
४. इ-तंत्रज्ञान व त्यापासून शेतकऱ्यांना होणारा फायदा
B. किमान आधारभूत किंमत आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुदाने संबंधित मुद्दे
C. सार्वजनिक वितरण प्रणाली
१. उद्दीष्टे २. कामकाज ३. मर्यादा ४. सुधार ५. बफर साठा आणि अन्न सुरक्षा, ६. तंत्रज्ञान मोहीम ७. पशु संगोपन
D. भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग-
१. व्याप्ती आणि महत्त्व
२. स्थान
३. अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम आवश्यकता
४. पुरवठा साखळी व्यवस्थापन.
E. भारतातील जमीन सुधारणा
१. अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम
२. औद्योगिक धोरणात बदल आणि औद्योगिक विकासावर त्याचे परिणाम.
३. पायाभूत सुविधा : ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे
१. गुंतवणूक मॉडेल
मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम अभ्यासाची चौकट निश्चित करण्यात अतिशय खात्रीशीर स्त्रोत आहे, आजपर्यंत मुख्य परीक्षेत आलेले प्रश्न हे अभ्यासक्रमाला धरून असल्याने अभ्यासक्रम हा मुख्य परीक्षेचा प्रमुख पथदर्शक ठरतो. म्हणूनच वरील मुद्दय़ांशी संबंधित सर्व सिद्धांत योग्य अशा संदर्भ ग्रंथांमधून अभ्यासणे गरजेचे आहे. असे करत असताना जर स्वत:च्या नोट्स तयार केल्यास आणखी फायदा मिळू शकतो.
यासाठी बाजारात विविध प्रकारचे संदर्भ ग्रंथ तसेच पुस्तके उपलब्ध आहेत, उदा. Indian Economy by Ramesh Singh, Indian Economy by Mishra and Puri, Indian Economy byDattaSundaram, Indian Economy by Uma Kapila इ. अर्थशास्त्रामध्ये रोज काही घडामोडी घडत असतात. संदर्भ ग्रंथ व पुस्तके या रोज बदलणाऱ्या घटनांचा मागोवा घेऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे आपण जर UPSC GS3 च्या मागील काही वर्षांतील प्रश्नपत्रिका पाहिल्या तर आपणास असे आढळून येते की, बहुतांश प्रश्न प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे चालू घडामोडींवर विचारलेले असतात. म्हणूनच सिद्धांताच्या अभ्यासाबरोबरच चालू घडामोडींचा अभ्यास करणे देखील गरजेचे आहे. चालू घडामोडी अभ्यासण्यासाठी वृत्तपत्रांचे वाचन महत्त्वाचे ठरते. मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक मराठी व एक इंग्रजी वृत्तपत्र वाचणे गरजेचे आहे. वृत्तपत्र वाचन योग्य पद्धतीने केले व त्याच्या नोट्स काढून अभ्यास साहित्य बनवले तर मुख्य परीक्षेला त्याचा प्रचंड फायदा होतो. वृत्तपत्रातून तयार केलेले अभ्यास साहित्य व सिद्धांत यांची योग्य सांगड घालून अभ्यास केल्यास GS3 मध्ये निश्चितच चांगला फायदा मिळू शकतो.