पंकज व्हट्टे
या लेखामध्ये आपण मौर्योत्तर कालखंड, गुप्त कालखंड, गुप्तोत्तर कालखंड आणि आद्या मध्ययुगीन कालखंडाबाबत चर्चा करणार आहोत. यातील पहिले तीन घटक हे प्राचीन भारताच्या इतिहासाचा भाग मानले जातात. इसवी सन ६४७ ते १२०६ हा कालखंड आद्या मध्ययुगीन कालखंड मानला जातो कारण या कालखंडात भारतातील सरंजामी/सामंती युगाची सुरुवात झाली असे मानले जाते. यामध्ये प्राचीन काळातील काही अभिजात वैशिष्ट्येदेखील आढळून येतात.

मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर मौर्योत्तर काळात भारतातील राजकीय व्यवस्थेचे तुकडे झाले होते. या काळात अनेक नवीन राजकीय सत्तांचा उदय झाला. भारतीय उपखंडात वायव्य भारतातून इंडो ग्रीक, शक, कुषाण, पर्थियन आले आणि त्यांनी आपले राज्य स्थापन केले. पूर्व भारतात शुगांनी मौर्यांची जागा घेतली कालांतराने कण्वांनी शुगांना बाजूला करून सत्ता आपल्या ताब्यात घेतली. दख्खनमध्ये सातवाहनांचा उदय झाला. दक्षिण भारतात महापाषाण काळाने चेर, चोळ आणि पांड्य यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग सुकर केला. संगम साहित्यातून आपल्याला या काळातील दक्षिण भारताची माहिती मिळते.

History of Budget in Marathi | अर्थसंकल्पाचा इतिहास
History of Budget : भारतातील अर्थसंकल्पांचा इतिहास; स्वातंत्र्यपूर्व अन् नंतर कसं बदललं चित्र?
Plague: Why Europe’s late stone age population crashed
तब्बल ५००० वर्षांपूर्वी प्लेगमुळे झाली होती अश्मयुगीन लोकसंख्येत घट; नवीन संशोधन काय सांगते?
History of geography The imminent baby El Niño
भूगोलाचा इतिहास: उपद्व्यापी बाळ एल निनो
lokmanas
लोकमानस: राजकीय कारणांसाठी जनगणना टाळू नये
beaufort wind scale developed in 1805 by sir francis beaufort of england
भूगोलाचा इतिहास : असाही एक ‘वायुदूत’
Hiramandi
ब्रिटिश नाही तर औरंगजेब ठरला होता हीरामंडीच्या ऱ्हासास कारणीभूत; संजय लीला भन्साली यांच्या कथानकात किती सत्य?
calves of Tadobas empress Kuwani enjoyed the greenness of the first rains
Video : ताडोबाची सम्राज्ञी ‘कुवानी’च्या बछड्यांनी लुटला पहिल्या पावसातील हिरवळीचा आनंद
Chandrababu Naidu announces Amaravati as sole capital city of Andhra Pradesh
चंद्राबाबू नायडूंनी निवडलेली नवीन राजधानी ‘अमरावती’; बौद्ध  स्तूपाचा वारसा असलेले हे शहर का आहे महत्त्वाचे?

मौर्योत्तर काळात अनेक राजकीय चढउतार घडून आले तरी व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात स्थैर्य होते. व्यापारी श्रेणी हा समाजातील अतिशय प्रभावशाली घटक होता. या काळातील व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातील समृद्धीमध्ये व्यापारी श्रेणीचा मोलाचा वाटा होता. व्यापारातील समृद्धीमुळे नागरीकरणास चालना मिळाली. याचे प्रतिबिंब तत्कालीन कला, साहित्य, विज्ञान आणि वास्तुकला यामध्ये पडल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांनी या सर्व आयामांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

आणखी वाचा-यूपीएससी सूत्र : इराणमधील चाबहार बंदराचे महत्त्व अन् झेनोट्रांसप्लांटेशन शस्त्रक्रिया, वाचा सविस्तर…

२०१३ सालच्या मुख्य परीक्षेत संगम साहित्यातून आकलन होणाऱ्या सामाजिक आर्थिक परिस्थितीबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाबाबत आपण पूर्वीच्या लेखामध्ये चर्चा केली आहे. २०१४ आणि २०१९ सालच्या मुख्य परीक्षेत गांधार कला शैलीमध्ये आढळून येणाऱ्या रोमन, ग्रीको बँक्ट्रियन आणि मध्य आशियाई वैशिष्ट्यांबाबत प्रश्न विचारला होता.

गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड यांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी गुप्त घराण्यासोबत इतर राजघराण्यांचा अभ्यास करावा. त्यांची वैशिष्ट्य, तत्कालीन सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि विशेषत: सांस्कृतिक क्षेत्रातील विकास या घटकांवर भर द्यावा कारण गुप्त कालखंड हा सांस्कृतिक उत्कृष्टतेसाठी ओळखला जातो. २०१७ सालच्या मुख्य परीक्षेत गुप्त कालखंडातील नाण्यांच्या उत्कृष्टतेवर (नाण्यांची ही उत्कृष्टता नंतरच्या काळात आढळत नाही) प्रश्न विचारला होता.

प्राचीन कालखंड कधी संपतो आणि मध्ययुगीन कालखंड कधी सुरू होतो याबाबत इतिहासकारांमध्ये मतैक्य नाही. परंतु पुष्यभूती घराण्यातील राजा हर्षवर्धनच्या मृत्यूबरोबर प्राचीन कालखंड संपला असे मानले जाते. हर्षवर्धन स्वत: साहित्यिक होता. त्याच्या व्यक्तित्वामुळे आणि कार्यामुळे तो लोकप्रिय शासक होता. त्याला ऐतिहासिक प्रसिद्धी मिळाली. याप्रकारच्या व्यक्तीमत्वावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात.

बहुतांशवेळा प्राचीन भारतीय इतिहासावर सर्वसाधारण प्रश्न (कोणताही विशिष्ट कालावधी नमूद न करता) विचारले गेले आहेत. आपल्या सोयीसाठी आपण यापूर्वी विचारल्या गेलेले प्रश्न आणि ज्या भागांवर प्रश्न विचारले गेले ते भाग यांची यादी पाहूया…

  • मुख्य परीक्षा २०१३: आद्या भारतीय शिलालेखांमध्ये नमूद केल्याप्रमाणे तांडव नृत्य.
  • मुख्य परीक्षा २०१४: नालंदा विद्यापीठाप्रमाणे तक्षशिला विद्यापीठास आधुनिक पद्धतीचे विद्यापीठ मानता येत नाही.
  • मुख्य परीक्षा २०१५: भारतीय उपखंडातील प्राचीन सभ्यतेची परंपरा आणि संस्कृती ही कोणत्याही विरामाशिवाय सलगपणे वर्तमानाशी जोडल्या आहेत.
  • मुख्य परीक्षा २०१७: प्रेम आणि सहिष्णुता केवळ आद्या कालखंडापासून भारतीय समाजाचे वैशिष्ट्य नसून वर्तमानकाळाचादेखील महत्त्वाचा भाग आहे.
  • मुख्य परीक्षा २०१८ : भारतीय कला आणि वारसा यांचे जतन.
  • मुख्य परीक्षा २०२२ : भारतीय कला, वास्तुकला आणि पुराशास्त्रातील वृषभ आणि सिंह यांच्या प्रतिमांचे महत्त्व.
  • मुख्य परीक्षा २०२३: प्राचीन भारताच्या विकासामधील भौगोलिक घटकांची भूमिका.

विद्यार्थ्यांनी प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना त्याचे सर्व आयाम कवेत घेणारा समग्र दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे. या घटकांचा अभ्यास करताना बदल, उत्क्रांती आणि महत्वाच्या घटना यावर विशेष भर द्यावा. कला आणि वारसा यांचे महत्त्व आणि त्याचे संवर्धन याचा अभ्यास करायला हवा, हे वरील प्रश्नांवरून स्पष्ट होते.

आणखी वाचा-Success Story: शाब्बास पोरा! पहिल्याच प्रयत्नात UPSC JE सिव्हिल परीक्षेत ऑल इंडिया रँक (AIR) 1

आद्या मध्ययुगीन कालखंडाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्तर भारतातील त्रिपक्षी संघर्ष आणि दक्षिण भारतातील चोळ साम्राज्याचा उदय. त्रिपक्षी संघर्ष/तिहेरी संघर्ष हा कन्नौज शहरावरील वर्चस्वासाठी गुर्जर-प्रतिहार, राष्ट्रकूट आणि पाल या राजघराण्यातील संघर्ष होता. गुर्जर-प्रतिहार हे पहिले राजपुत घराणे होते. पाल आणि सेन घराणे (ज्यांनी कालांतराने पालांची जागा घेतली) हे भारतातील शेवटचे बौद्ध राजघराणे होते. ‘‘भारतातील बौद्ध धर्माच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा कालखंड म्हणजे पाल कालखंड होय’’ याबाबत २०२० सालच्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला होता.

दक्षिण भारतातील अनेक राजघराण्यांपैकी चोळ घराण्याने साम्राज्य स्थापन केले. अनेक इतिहासकार चोळ कालखंडाला भारतातील शेवटचा अभिजात कालखंड मानतात. चोळ साम्राज्य हे त्यांच्या श्रीलंका, मालदीव आणि इंडोनेशिया येथील नाविक मोहिमांसाठी ओळखले जाते. गुप्त काळाप्रमाणे चोळ कालखंड हा सांस्कृतिक उत्कर्षाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. विशेषत: मंदिर वास्तुकला आणि शिल्पकला यांबाबत.

मंदिर वास्तुकलेच्या उत्क्रांतीमध्ये चोळ वास्तुकलेने परमोच्च बिंदू गाठला होता, या विधानाबाबत चर्चा करा असा प्रश्न २०१३ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता. भारतीय संस्कृती आणि वारशाला गुप्तकाळ आणि चोळ काळाने कोणते योगदान दिले असा प्रश्न २०२२ सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता. सांस्कृतिक घटकांसोबतच चोळ प्रशासनाचा देखील अभ्यास करायला हवा.

आद्या मध्ययुगीन कालखंडात सामाजिक, आर्थिक क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल घडून आले. विद्यार्थ्यांनी भारतात आद्या मध्ययुगीन कालखंडात सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात जे बदल घडून आले त्यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. उदा. या काळात जे बदल झाले त्यांचे दूरगामी परिणाम घडून आले. या परिणामांमध्ये सरंजामशाहीचा आणि उतरंडीच्या जातीव्यवस्थेचा उदय झाला. विद्यार्थ्यांनी उत्तर प्राचीन कालखंड आणि आद्या मध्ययुगीन कालखंडात भारताला भेट दिलेल्या परकीय प्रवाशांचा अभ्यास करणे, अपेक्षित आहे. २०१८ सालच्या मुख्य परीक्षेत चिनी आणि अरब प्रवाशांच्या नोंदी भारताच्या इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी कशाप्रकारे महत्त्वाच्या ठरतात असा प्रश्न विचारला होता.

यापूर्वीच्या आणि या लेखामध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि यापूर्वी विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून चर्चा केली. हा अभ्यास करताना एक सूचना विसरता कामा नये जी आपण पहिल्या लेखामध्ये नमूद केली होती आणि ते म्हणजे सर्व आयामांचा अभ्यास करताना सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करणे. उदा. गुप्त कालखंड हा अभिजात साहित्यासाठी ओळखला जातो, हे उपरोक्त चर्चेत नमूद केलेले नाही. यासोबतच राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि आर्थिक आयामांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. पुढील लेखामध्ये आपण याच पद्धतीने मध्ययुगीन भारताच्या इतिहासाबाबत चर्चा करूया.
(अनुवाद – अजित देशमुख)