मी मुक्त विद्यापीठातून बीए करीत आहे. सध्या पहिल्या वर्षांला आहे. मला इतिहास विषयात खूप रुची आहे. वाचनाची आवड आहे. मला इतिहासकार व्हायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

– मोईन काबरा, सुलतानपूर

खूपच वेगळय़ा स्वरूपाची इच्छा तुझ्या मनात आहे. मात्र त्याचा रस्ता बराच लांबचा आणि प्रचंड अभ्यासाचा आहे हे लक्षात ठेवावेस. आता आपण त्याची वाटचाल पाहू या.

वाचन खूप आवडते. मात्र त्यासाठी एक शिस्त लावून घेणे हे गरजेचे राहील. उदाहरणार्थ, काहीही वाचायला घेतले तर ते आपण कशासाठी आणि का वाचणार आहोत याची स्पष्ट कल्पना तुझ्यासमोर हवी. तसेच त्या लेखनाचा कालखंड, लेखकाचे अन्य लेखन व समकालीन संदर्भ हेही हळूहळू तुला लक्षात राहू लागणे आवश्यक आहे.

इतिहास म्हणजे घटनांच्या नोंदी नसतात, तर त्यामधले सामाजिक, राजकीय, आर्थिक संदर्भ व भूगोलाचासुद्धा विचार करून केलेले नेमके वर्णन असते. मात्र त्यामध्ये इतिहासकार मनाने, विचाराने न अडकता अलिप्त नजरेने पाहात असतो. हे ज्या क्षणी तुला जाणवेल तेव्हा तुझी त्यातली पहिली पावले पडू शकतील. प्रथम पदवी, नंतर रीतसर विद्यापीठात प्रवेश घेऊन एम.ए. पूर्ण करावेस. त्यानंतर एम.फिल व नंतर डॉक्टरेट करणे गरजेचे राहील. समजा, हे नाही जमले तरीही संशोधनाची साधने, पद्धती व त्यातून काढले जाणारे निष्कर्ष हे शिकावेच लागेल.

शक्य झाल्यास उर्दू, फारसी आणि मोडी या तीन भाषांशी तोंडओळख पदवीदरम्यान करून घ्यावीस. कारण भारतीय इतिहासाचे असंख्य संदर्भ या तिन्ही भाषांमध्ये दडलेले आहेत.

एक छोटीशी सुरुवात तुला सुचवतो. तुझे गाव, तालुका याची माहिती गॅझेटमधून वाचून काढ. त्यात भर घालता येते का, याचा प्रयत्न कर. तुझ्या पणजोबांच्या आधीच्या पूर्वजांची काही माहिती गोळा करणे जमते का, याचा अंदाजसुद्धा तुला इतिहासकार बनणे म्हणजे काय असते याची झलक दाखवून जाईल.

या सगळ्याच्या जोडीला चिकाटी, सातत्य, नेमकेपणा याची गरज तर कायमच भासणार आहे.

मी सध्या अकरावी कलाशाखेत शिकत आहे. बारावीनंतर अर्थशास्त्रात बी.ए. करू का बी.बी.ए.? यापैकी कोणत्या क्षेत्रात उत्तम नोकरी, अनुभव पुढील पदव्या मिळवण्यासाठी संधी असेल? याव्यतिरिक्त कोणत्या क्षेत्रात मला चांगली संधी मिळू शकते?

– कल्याणी जग

बी.बी.ए. हा मॅनेजमेंट संदर्भातील प्राथमिक अभयासक्रम आहे. त्यानंतर एम.बी.ए. केल्याशिवाय उत्तम नोकरी मिळत नाही. शिवाय एमबीए उत्तम संस्थेतून केलेले असेल तरच नोकरीच्या चांगल्या संधी असतात. मात्र अर्थशास्त्र घेऊन बी.ए. केल्यानंतरही एम.बी.ए. करणे सहज शक्य आहे. अर्थशास्त्रातून पुढे जायचे का मॅनेजमेंटमध्ये जायचे असे दोन पर्याय तुला त्या वेळी नक्की मिळतील.

अर्थशास्त्रातून मास्टर्सची पदवी घेताना अनेक विषयांतून तुझा अभ्यास पुढे जातो. कदाचित त्यातून विविध संधी तुला मिळू शकतात. साऱ्यांचा जंत्रीवजा उल्लेख करत नाही, पण मायक्रो फायनान्स, रुरल इकॉनॉमिक्स, मार्केट रीसर्च, एनजीओबरोबर रुरल डेव्हलपमेंट असे वेगळे पर्याय मिळू शकतात. ते सारे रस्ते बी.बी.ए.नंतर सुरू होत नाहीत. पुस्तकी वाचनाखेरीज अर्थशास्त्राशी संबंधित रोज काही तरी वृत्तपत्रातून वाचायची सवय लावून घेणे त्यासाठी गरजेचे आहे. ते वाचन नसेल तर सुरू करावेस. इतक्या मोठय़ा प्रमाणावर शेतकरी मोर्चा घेऊन मुंबईला का गेले? बोंडअळी व गारपीट यामुळे राज्याचे किती व कसे नुकसान झाले? कर्जे बुडवून गेल्यामुळे बँकांचे काय बिघडले? अशा रोजच येणाऱ्या बातम्यांमध्ये दडलेले अर्थशास्त्र जर तुला खुणावू लागले तर तो रस्ता स्वीकारावास. अन्यथा बी.बी.ए. आहेच की!

विद्यापीठ ‘हिंदी’चेच..

विद्यापीठ विश्व या सदरातील लेखाच्या शीर्षकामध्ये ‘राष्ट्रभाषेचे संवर्धन’ असा उल्लेख झाला आहे. त्यावर काही वाचकांनी, न्यायालयीन निकालांनुसार हिंदी ही ‘राष्ट्रभाषा’ ठरत नसल्याचा आक्षेप नोंदविला. हा मुद्दा व त्यामागील भावनांचा आदर राखून या शीर्षकातील अनवधानाने झालेली चूक मान्य करण्यात येत आहे.

याचप्रमाणे ३ एप्रिलच्या अंकात ‘नोकरीच्या संधी’ या सदरामध्ये एमपीएससीसंदर्भातील संधीमध्ये संकेतस्थळाचा पत्ता चुकीचा दिला गेला होता. विद्यार्थ्यांनी https://mahampsc.mahaonline.gov.in  हा योग्य पत्ता पाहावा.