सांकेतिक भाषा कोश

उच्च शिक्षण घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षी वाढते आहे. तरीही एक मोठा वर्ग मात्र शिक्षण घेण्याची बौद्धिक, आर्थिक कुवत असूनही सुरळीतपणे उच्च शिक्षण पूर्ण करू शकत नाही. हा वर्ग आहे, मूकबधिर किंवा बोलण्याची आणि ऐकण्याची पुरेशी शारीरिक क्षमता नसलेला वर्ग. परदेशामध्ये या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठे आहेत. मात्र भारतात अशी काही सोय नाही. या विद्यार्थ्यांसाठी पुरेशा सुविधांचा अभावच आहे. या विद्यार्थ्यांना शिकवताना सर्वात मोठी अडचण असते, ती भाषेची. या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा मार्ग म्हणजे खाणाखुणांची भाषा. मात्र ती भाषा सगळ्यांनाच कळत नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संवादात अडचणी निर्माण होतात. यावर काही प्रमाणात दिलासा आता मिळाला आहे. मूकबधिर आणि कर्णबधिर लोकांसाठी काम करणाऱ्या इंडियन साईन लँग्वेज रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, दिल्ली या संस्थेने खाणाखुणांच्या या सांकेतिक भाषेचा एक शब्दकोश तयार केला आहे. शासनाच्या सामाजिक न्याय आणि विकास विभागांतर्गत ही संस्था काम करते. गेल्या साधारण दीड वर्षांपासून ही संस्था या शब्दकोशाचे काम करीत आहे. या कोशात साधारण तीन हजार खुणा आणि त्यांचे अर्थ आहेत. ध्वनी चित्रफीत आणि लेखी अशा दोन्ही प्रकारांत हा कोश तयार करण्यात आला आहे. रोजच्या वापरातील शब्द आणि त्याच्या सांकेतिक खुणांबरोबरच कायदा किंवा विधी क्षेत्राशी संबंधित २३७ शब्द आणि संकल्पना, वैद्यकीय क्षेत्रातील २०० शब्द आणि संकल्पना, तांत्रिक बाबींशी संबंधित अभियांत्रिकी क्षेत्रातील २०४ संकल्पना आणि २०६ शब्दांसाठीच्या खुणा स्पष्ट करणारी ध्वनिचित्रफीत, विज्ञान, गणित, समाजशास्त्र या विषयांशी संबंधित २२९ ध्वनिचित्रफिती आणि २१२ शब्द यांचा या कोशात समावेश आहे.

पदवी मिळते तरीही..

अद्यापही बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षण दुरापास्त आहे, तर दुसरीकडे अनेक जण उच्चशिक्षण घेतात तरी नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत नसल्याचे बोर्नमाऊथ विद्यापीठाच्या (Bournemouth University) अभ्यासकांच्या संशोधनाअंती समोर आले आहे. यापूर्वीही अनेक संस्थांनी केलेल्या अभ्यासातून ही परिस्थिती समोर आली होती. या शोधनिबंधासाठी २७० उद्योगसमूहाच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यात आला. त्यापैकी ६५ टक्के उद्योजकांनी असे सांगितले की,  विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारात करता येत नाही. भारतातील विद्यापीठांमधले शिक्षण अद्ययावत आहे, असे मत केवळ ३७ टक्के लोकांचे होते. ग्लोबल टॅलेंट इन इंडिया या शोधनिबंधात विद्यापीठातील शिक्षण हे रोजगाराभिमुख नसल्याचे जळजळीत वास्तव मांडण्यात आले आहे. (संदर्भ – टाइम्स हायर एज्युकेशन)