मी २०१६मध्ये एम.कॉम. उत्तीर्ण झाले आहे. आता नेट ,सेट द्यावी बी.एड करावे? कृपया मला मार्गदर्शन करावे.

अंजली गडावे

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
New standards for facilities safety in nurseries
पाळणाघरांतील सुविधा, सुरक्षिततेबाबत नवीन मानके

तुमच्या मनात नेमका कशामुळे गोंधळ आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. अध्यापनाच्या क्षेत्रात करिअर करावयाचे असल्यास नेट/ सेट/ बी.एड करणे कधीही उत्तमच ठरू शकते. एम.कॉम.मध्ये बँकिंग, फायनान्स आदी विषयांचा समावेश असतो. त्यामुळे तुम्ही खासगी किंवा शासकीय बँकिंग अथवा विमा क्षेत्रात करिअर करू शकता. वित्त, अर्थशास्त्र, मार्केट याविषयी प्राथमिक माहिती असल्याने स्टॉक मार्केटविषयी अभ्यासक्रम करून गुंतवणूक सल्लागार म्हणूनसुद्धा करिअर करता येऊ  शकते. विविध स्पर्धा परीक्षांचा पर्याय सर्वासाठीच उपलब्ध असतो. फक्त त्यासाठी अतिशय नियोजनबद्द परिश्रम करणे गरजेचे असते.

 

माझ्या मुलीने जाहिरात या विषयाच्या स्पेशलायझेशनसह मास मीडियामध्ये पदवी घेतली आहे. तिला मार्केटिंग रिसर्च या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करायचा आहे. त्याला भविष्यात काय संधी आहेत? कोणत्या महाविद्यालयातून तो करावा? त्यासाठी प्रवेश परीक्षा आहे का?

सीमा कोरगावकर

कोणत्याही व्यवसाय वा उद्योगाची उभारणी आणि विकासासाठी त्या संबंधीच्या सूक्ष्म संशोधन आणि संख्यात्मक विश्लेषणावर भर दिला जातो. या विषयातील तज्ज्ञ हे त्यासंबधीचा आराखडा देऊ  शकतात. त्यामुळे मार्केट रिसर्च या विषयातील तज्ज्ञांना चांगली संधी उपलब्ध होऊ  शकते. एमआयसीए (MICA)- मुद्रा इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन अहमदाबाद या संस्थेने एक वर्ष कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट व मार्केट रिसर्च अँड डेटा अ‍ॅनॅलिटिक्स हा अभ्यासक्रमसुद्धा सुरू केला आहे. संपर्क- /www.mica.ac.in/academic-programmes.

मार्केटिंग आणि ग्राहकांच्या अंतरंगाचा शोध घेण्याची तज्ज्ञता प्राप्त केलेल्या निल्सेन या संस्थेच्या सहकार्याने नॉर्थ पॉइंट इंडिया या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मार्केट रिसर्च, हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- ११ महिने.

संपर्क- http://www.northpointindia.com /PostGraduatePrograms/MarketingResearch.aspx

 

मी विज्ञान शाखेतून बारावी केलं आहे. अभियांत्रिकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांत खंड पडला आहे. त्यामुळे मी क्षेत्र बदलू शकतो का? मला एका खासगी विद्यापीठातून एक वर्ष कालावधीची बी.एस्सी. पदवी मिळत आहे. ही पदवी वैध असेल का? कृपया मार्गदर्शन करावे?

एक नियमित वाचक

अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठ अनुदान आयोग वा तंत्र शिक्षण मंडळाची मान्यता न घेता वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करतात. त्यामुळे तुम्ही करत असलेला अभ्यासक्रम या संस्थांनी मान्यता दिलेला अधिकृत आहे किंवा नाही याची तपासणी तुम्हाला संस्थेकडे करावी लागेल. सध्या करत असलेला बी.एस्सी. हा अभ्यासक्रम नेमका कोणत्या विषयातील आहे व त्याचा कालावधी खरोखरच एक वर्षांचा आहे का, याची स्पष्ट माहिती संबंधित संस्थेकडून घेणे अत्यावश्यक आहे. भारतात विद्यापीठ अनुदान आयोगाचा मान्यताप्राप्त पदवीस्तरीय बी. एस्सी. अभ्यासक्रम हा तीन वर्षे कालावधीचा असतो.

 

मी बी.कॉम. केलं आहे. आता मला एल.एल.बी करायचं आहे. त्याबद्दल माहिती द्यावी.

संजय राजपूत

पदवीनंतरचा एलएल.बी. अभ्यासक्रम तीन वर्षे कालावधीचा आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सीईटी सेलमार्फत एलएल.बी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी तुला द्यावी लागेल. या परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून तुला महाराष्ट्रातील शासकीय आणि शासनमान्य विधी महाविद्यालये अथवा संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठीची सीईटी पार पडली आहे. त्यामुळे तुला पुढील शैक्षणिक वर्षांसाठी ही परीक्षा द्यावी लागेल.

 

मी डी.फार्म. आणि वर्षांचा नॅचरोपथी अभ्यासक्रम केला आहे. मला हेल्थ आणि मलेरिआ इन्स्पेक्टर व्हायचे आहे.

प्रियंका रघटाटे

तुला जर हेल्थ आणि मलेरिया इन्स्पेक्टर व्हायचे असेल तर त्यासाठी हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टरचा पदविका अभ्यासक्रम करायला हवा.

 

बी..(मेकॅनिकल) केलेला विद्यार्थी गेट(GATE) परीक्षेशिवाय रेल्वेमध्ये नोकरी मिळवू शकतो का? पदवीस्तरीय विद्यार्थ्यांसाठी गेट देणं आवश्यक आहे का? पदवीस्तरीय विद्यार्थ्यांना नोकरीच्या कोणत्या संधी आहेत? कृपया मार्गदर्शन करावे

चिराग पाटणकर

रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी गेट देण्याची आवश्यकता नाही.  रेल्वेतील अभियंत्यांच्या निवडीसाठी जागांच्या उपलब्धेतनुसार जागा जाहीर केल्या जातात. याविषयी संपूर्ण माहिती http://www.railwayrecruitment.co.in या संकेत स्थळावर प्रकाशित केली जाते. इंडियन इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसच्या माध्यमातून रेल्वेतील वरिष्ठ पदे मिळू शकतात. सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी/ पॉवर ग्रीड/ गेल इंडिया/ भारत पेट्रोलियम / बीएचईल/ इस्रो/ डीआरडीओ इत्यादी या संस्था प्राथमिक चाळणीसाठी गेट (GATE) परीक्षेतीलच गुण ग्राह्य़ धरतात. त्यामुळे या संस्थांमधील प्रवेशासाठी गेटमध्ये उत्तम गुण असणे आवश्यक आहे. बीई पदवीस्तरावरच्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळू शकतात. इतर ज्ञानशाखेतील पदवीधर विद्यार्थी नोकरीसाठी ज्या स्पर्धा परीक्षा देऊ  शकतात, त्या सर्वच परीक्षा हे विद्यार्थी देऊ  शकतात.

 

मी यंदा बारावीला आहे. मला अकाऊंट्समध्ये खूप रस आहे. त्यातच करिअर करायचं आहे. मला सरकारी नोकरीही करायची आहे. त्यासाठी कोणता अभ्यासक्रम निवडू?

सिद्धी पवार

कोणत्याही ज्ञान शाखेतील पदवीधराला स्पर्धा परीक्षेद्वारे शासकीय नोकरीमध्ये प्रवेश मिळू शकतो. बी.कॉम. केल्यानंतर तुला सर्व स्पर्धा परीक्षा देता येतील. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ओएनजीसी, भारत पेट्रोलियम अशासारख्या अनेक शासकीय संस्थांना चार्टर्ड अकाऊंटंट्सची गरज भासत असते. उपलब्ध जागेनुसार त्याविषयी वेळोवेळी जाहिरात दिली जाते. त्यामुळे सी.ए. अभ्यासक्रम निवडल्यास थेट या संस्थांच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळू शकते.

 

माझा मुलगा पुणे विद्यापीठातील बीसीए अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांला आहे. त्यानंतर  त्याला मुंबई विद्यापीठातून एमसीए करावयाचे आहे. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात आहे का? आणि कोणत्या महाविद्यालयात तो आहे?

कविता सुरवाडे

एम.सी.ए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत सीईटी घेतली जाते. त्यातील गुण आणि संस्थेचा पर्याय यावर आधारित महाराष्ट्रातील शासनमान्य संस्थांमधील एमसीएला प्रवेश मिळू शकतो. मुंबई विद्यापीठांतर्गत अनेक संस्थांमध्ये एम.सी.ए. अभ्यासक्रम चालवला जातो. सीईटी परीक्षेद्वारे तुमच्या मुलाला त्यात प्रवेश मिळू शकतो. प्रत्येक विद्यापीठामध्ये २० टक्के जागा संबंधित विद्यापीठाच्या क्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयांव्यतिरिक्त इतर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या अंतर्गतही तुमचा मुलगा मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयातील एम.सी.ए. अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतो. मुंबई विद्यापीठांतर्गत असलेल्या आणि एम.सी.ए अभ्यासक्रम चालविण्यात येणाऱ्या संस्थांची नावे  http://www.dtemaharashtra.gov.in  या संकेतस्थळावर बघू शकाल.