*   मी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. मला अध्यापन क्षेत्रात करिअर करण्यात रस आहे. तर आता मी बी.एड. किंवा डी.एड. करू शकतो का?

-शिवाजी फिरंगे

तुला प्राथमिक, माध्यमिक वा उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक व्हायचे असल्यास डी.एड./बी.एड. करावे लागेल. मात्र तू एम.टेक केल्यास तुला खासगी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकवण्याची संधी मिळू शकते. पीएचडी करून ठेवल्यास तुला भविष्यात आयआयटी वा इतर शासकीय अभियांत्रिकी संस्थांमध्ये अशी संधी मिळू शकते. काही खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये बी.ई. झालेल्या उमेदवारांनासुद्धा शिकवण्याची संधी देतात. तू राहत असलेल्या परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात जाऊन तुझी इच्छा प्रदर्शित कर.

’   मी बी.ए.ची पदवी घेतली आहे. आता यानंतर मला एम.ए आणि एल.एल.बी असे दोन्ही अभ्यासक्रम करता येतील. परंतु एम.ए. केले तर पदव्युत्तर पदवी दोनच वर्षांत मिळेल. एल.एल.बी केल्यानंतर एल.एल.एम. या पदव्युत्तर पदवीसाठी पाच वर्ष लागतील. माझा गोंधळ उडाला आहे. मी नेमके काय करू? एम.ए की एल.एल.बी? 

-अनिकेत महल्ले

अशा प्रकारे गोंधळ उडणे, काही नवे नाही.

तसेच विचित्रही नाही. सर्वप्रथम तुला एखादी पदवी का घ्यायची आहे, याचा विचार कर. एम.ए. करून तुला काय करायचे आहे आणि एल.एल.बी. केल्यानंतर तुला काय करायचे आहे, ते आधी स्पष्ट करून घे. केवळ ज्ञान प्राप्तीसाठीच शिकायचे असल्यास काहीही केलेस तरी तसा कोणताच फरक पडत नाही. एम.ए. करून थेट नोकरी मिळण्याचा सध्याचा काळ नाही. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा द्यावीच लागेल. जर तुझा कल वकिली करण्याकडे असेल, तर एलएलबी करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. एलएलबीच्या विषयांचे ज्ञान उत्तम मिळवले असल्यास व संवादकौशल्य चांगले विकसित केले तर सनद मिळाल्याबरोबर स्वतंत्र करिअर सुरू होऊ  शकते. एलएलएम केल्यावर स्पेशलाइज्ड वकील म्हणून संधी मिळू शकते. यातील कामगिरी अशिलांच्या पसंतीस उतरली तर तुला अधिक काम मिळू शकते. ज्याप्रमाणे स्पेशलाइज्ड डॉक्टरकडे गर्दी होते, त्याला जराही उसंत मिळत नाही, तसेच इकडेही घडू शकते.