आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास या घटकाची माहिती घेणार आहोत. सर्वसाधारणपणे आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात १८व्या शतकाच्या सुरुवातीपासून समजली जाते. आजच्या लेखामध्ये आपण १८वे शतक आणि १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजेच १८५७पर्यंतच्या इतिहासाची तयारी कशी करावी, याची चर्चा करणार आहोत. गतवर्षीच्या मुख्यपरीक्षामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या आधारे परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या बाबींकड लक्ष देणार आहोत.

सर्वप्रथम आपण या घटकाची थोडक्यात माहिती घेऊ या. १८ व्या शतकाची काही महत्त्वाची वैशिष्टय़े सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. या शतकामध्ये मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली होती, त्यामुळे सर्वात शक्तिशाली साम्राज्य हा मुघल साम्राज्याचा नावलौकिक कायम राहिलेला नव्हता. या शतकामध्ये भारताच्या विविध प्रदेशामध्ये प्रादेशिक देशी सत्ताचा उदय झालेला होता. यातील काही सत्तांची स्थापना मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रांतीय सुभेदारांनी केलेली होती (उदा. बंगाल, अवध आणि हैदराबाद), तसेच काही सत्तांचा उदय हा मुघल साम्राज्याच्या विरोधात उठाव करून झालेला होता (उदा. मराठे, अफगाण, जाट आणि शीख) व काही सत्ता या स्वतंत्ररीत्या उदयाला आलेल्या होत्या (उदा. राजपूत, म्हैसूर, त्रावणकोर) तसेच याच्या जोडीला १५व्या शतकापासून सागरी मार्गाचा वापर करून युरोपमधून आलेले व्यापारी वर्ग (पोर्तुगीज, डच, ब्रिटिश/इंग्रज, दानिश आणि फ्रेंच) होताच. त्यांची भारतासोबत होणाऱ्या व्यापारावर स्वतची मक्तेदारी प्रस्थापित करण्यासाठी लागलेली स्पर्धा आणि यामध्ये अंतिमत: इंग्रजाचा झालेला विजय या महत्त्वाच्या घटनांच्या सखोल माहितीचा सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो. याचबरोबर भारतामध्ये ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेचा इतिहास अभ्यासताना नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे ब्रिटिशांना भारतात सत्ता स्थापन करता आली याची योग्य आणि मुद्देसूद माहिती असावी लागते. तसेच याच्या जोडीला ब्रिटिश सत्तेचा भारतावर झालेला परिणाम या अंतर्गत आपणाला राजकीय आíथक, सामाजिक व  सांस्कृतिक परिणामाची माहिती असावी लागते. गव्हर्नर जनरल व त्यांचे कार्य व  ब्रिटिशांनी भारतामध्ये स्थापन केलेली प्रशासन व्यवस्था आणि ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे व त्यांचा परिणाम, याचबरोबर या कालखंडातील भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती व त्यांनी केलेले कार्य याची माहिती असणे गरजेचे आहे. भारतीयांनी या कालखंडामध्ये ब्रिटिशांना कशा पद्धतीने प्रतिसाद दिलेला होता व या प्रतिसादामुळे भारतीयांच्या राजकीय, आíथक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये नेमका कोणता बदल झालेला होता, याची सखोल माहिती असावी लागते. अशा पद्धतीने या घटकाचा अभ्यास आपणाला करावा लागतो हे खालील मागील काही वष्रे विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या विश्लेषणांवरून आपण समजून घेऊ शकतो.

२०१३मधील मुख्य परीक्षेत, ‘वेगवेगळ्या पद्धतीने लॉर्ड डलहौसीने आधुनिक भारताचा पाया रचला. विस्तार करा.’ हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न समजून घेताना आपणाला लॉर्ड डलहौसीने  राजकीय, आíथक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कोणत्या पद्धतीची कामगिरी केलेली होती याचा दाखला द्यावा लागतो. तसेच त्याने आधुनिक भारताचा पाया कसा रचला याचे कारणमीमांसेसहित उत्तर लिहावे लागते. यामुळे उत्तर अधिक मुद्देसुद्द व समर्पक आणि प्रश्नांचा योग्य आशय प्रमाणित करणारे ठरते.

२०१४ च्या मुख्य परीक्षेत ‘१७६१ मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. पानिपत येथेच अनेक साम्राज्यांना धक्का देणाऱ्या लढाया का झाल्या?’ हा प्रश्न एका विशिष्ट ठिकाणाचा संदर्भ देऊन विचारण्यात आलेला आह. याचे आकलन करताना आपणाला १५२६मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईचा संदर्भ लक्षात घ्यावा लागेल. त्यानुसार हे स्थान व्यूहात्मकदृष्टय़ा कसे महत्त्वाचे होते या अनुषंगाने उत्तर लिहावे लागते. हा प्रश्न परीक्षार्थीचे विषयाचे ज्ञान व समज कशी आहे याचा कस लावणारा आहे. याच वर्षी ‘ब्रिटिशांच्या आíथक धोरणाच्या १८व्या शतकाच्या मध्यापासून ते स्वातंत्र्यपर्यंतच्या विविध पलूचे समीक्षात्मक विश्लेषण करा’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचे आकलन करताना आपणाला ब्रिटिश ध्येयधोरणे ही ब्रिटिश साम्राज्यवादाला कशी पूरक होती आणि जास्तीतजास्त याचा फायदा व्यापारासाठी कसा होईल हा मूलभूत विचार ब्रिटिशांच्या आíथक धोरणाच्या रणनीतीचा भाग होता हे समजून घेणे गरजेचे आहे आणि त्यानुसार काळानुरूप ब्रिटिशांच्या आíथक धोरणाच्या रणनीतीमध्ये कोणते बदल करण्यात आले याचा उदाहरणासह परामर्श उत्तरामध्ये देणे अपेक्षित आहे.

२०१५च्या मुख्य परीक्षेत या कालखंडाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. २०१६च्या मुख्य परीक्षेत ‘स्पष्ट करा की १८५७चा उठाव हा वसाहतिक भारतातील ब्रिटिश धोरणाच्या विकासातील महत्त्वाची घटना होती’. असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी कंपनी काळातील ब्रिटिश धोरणे याची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे, त्याशिवाय हा प्रश्न योग्य पद्धतीने लिहिता येत नाही कारण १८५७च्या उठावानंतर जे काही बदल करण्यात आलेले होते याला कंपनी काळात राबविण्यात आलेली ब्रिटिश धोरणे कारणीभूत होती आणि उत्तरे लिहिताना या धोरणाचा उत्तरामध्ये दाखला देऊनच उत्तर लिहावे लागते व १८५७च्या उठावाचे महत्त्व नमूद करावे लागते.

उपरोक्त प्रश्नाच्या विश्लेषणावरून आपणाला या घटकाची तयारी कशी करावी याची एक सुस्पष्ट दिशा मिळते. या घटकाचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी आपणाला बिपिनचंद्र लिखित ‘आधुनिक भारत’ हे जुने एनसीईआरटीचे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बी. एल. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टशिन’ या संदर्भग्रंथाचा उपयोग होतो. यापुढील लेखामध्ये आपण आधुनिक भारताच्या १८५७ ते १९४७ पर्यंतच्या कालखंडाचा सर्वागीण आढावा घेणार आहोत.