20 January 2019

News Flash

विद्यापीठ विश्व : महिला शिक्षणाचे महत्त्व

१९१६ साली  भारतात खास महिलांसाठीच्या विद्यापीठाची सुरुवात केली. 

‘एसएनडीटी’चे मुख्य संकुल चर्चगेट येथे आहे.

प्रत्येक देशातील विद्यापीठे, तेथील अभ्यासक्रम, विद्यार्थीवर्ग हे त्या देशाच्या शैक्षणिक स्थितीविषयी बरेच काही सांगत असतात. त्यामुळे विद्यापीठाच्या विश्वाविषयी माहिती करून घेणे नक्कीच रोचक ठरते. या नव्या वर्षांत अशाच निरनिराळ्या विद्यापीठांची ओळख करून घेणार आहोत, ‘विद्यापीठविश्व’ या नव्या सदरातून. दर मंगळवारी हे सदर आपल्या भेटीला येणार आहे.

दक्षिण-पूर्व आशियातील पहिले महिला विद्यापीठ म्हणजे ‘श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ’ म्हणजेच एसएनडीटी वुमन्स युनिव्हर्सिटी. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कल्पनेतून साकारलेले विद्यापीठ म्हणजे एसएनडीटी. अधिकाधिक महिलांनी, मुलींनी शिक्षण घ्यावे, एक स्वओळख बनवावी या हेतूने या विद्यापीठाची स्थापना झाली.

स्थापना – महिलांना उच्चशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्यास, त्यांच्या सर्वागीण विकासाला चालना मिळेल आणि त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षमही होता येईल, ही बाब विचारात घेत महर्षी कर्वेनी महिला शिक्षणासाठीचे धोरणात्मक प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी १९०७ साली स्वतंत्र महिला विद्यालयाची सुरुवात केली होती. आणि पुढे १९१६ साली  भारतात खास महिलांसाठीच्या विद्यापीठाची सुरुवात केली.  विद्यापीठ उभारणीच्या खर्चाचा भार पेलला विठ्ठलदास ठाकरसी यांनी.

संकुले – ‘एसएनडीटी’चे मुख्य संकुल चर्चगेट येथे आहे. त्याच जोडीने मुंबईमधील जुहू आणि पुण्यातील कर्वे रस्त्यावरील संकुलामधून या विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक सोयी – सुविधा पुरविल्या जातात. बाहेरगावाहून मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ५०० व्यक्तींच्या निवासक्षमतेचे वसतीगृहही उभारले आहे. या तिन्ही संकुलांमध्ये विद्यापीठाने टप्प्याटप्प्याने ग्रंथालयाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांसोबतच गुजराती आणि संस्कृत भाषेमधूनही संदर्भ साहित्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठात विविध विषयांसाठीचे जवळपास ३९ पदव्युत्तर विभाग चालतात. त्यातील मराठी, हिंदी, संगीत, कला आणि रंगकला, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, वाणिज्य, शिक्षणशास्त्र या आठ विभागांमधील अभ्यासक्रमांच्या सुविधा या दोन संकुलांमधून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पदव्युत्तर विभागांव्यतिरिक्त या दोन संकुलांमधून विद्यापीठ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालय अशी तीन महाविद्यालयेही चालविते. जुहूच्या संकुलामध्ये चालणारे रिसर्च सेंटर फॉर विमेन्स स्टडिज, दूरशिक्षणाच्या माध्यमातून निरनिराळे २९ अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे ‘सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन’, एज्युकेशन टेक्नोलॉजी विषयासाठीचा स्वतंत्र विभाग, तसेच श्रीवर्धन येथील महर्षी कर्वे मॉडेल कॉलेज ही या विद्यापीठाची आणखी काही वेगळी वैशिष्टय़े ठरतात.

विद्यार्थिनींना प्रत्यक्ष कार्यानुभव मिळावा, यासाठी विद्यापीठाने गेल्या काही काळापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये ‘इंटर्नशिप’चाही समावेश केला आहे. तसेच ‘सबजेक्ट असोसिएशन’च्या माध्यमातून पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर समान विषय शिकणाऱ्या विद्यर्थिनींना एकत्र आणण्याचे प्रयत्नही विद्यापीठाने केले आहेत. तसेच विद्यार्थिनी साहित्य संमेलनासारखे वेगळे उपक्रमही विद्यापीठ राबवत असते. या सगळ्याचीच नोंद घेत ‘नॅक’ने विद्यापीठाला ‘ए’ ग्रेडचे मानांकन दिले आहे.

अभ्यासक्रम – पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच महिलांसाठी विशेष व्यावसायिक आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांची आखणी केली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींसाठी आजमितीला विविध विद्याशाखांमधून जवळपास ६२ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम. ३२ पदवी अभ्यासक्रम आणि २३ पदविका अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत. कला, शिक्षणशास्त्र, गृहविज्ञान, विज्ञान, समाजकार्य, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र, वाणिज्य, ललित कला, विधी, व्यवस्थापनशास्त्र, सामाजिक शास्त्रे, तंत्रज्ञान आदी विद्याशाखांमधून उपलब्ध असलेल्या या अभ्यासक्रमांच्या जोडीने विद्यापीठामध्ये पीएच.डी.साठीच्या संशोधनाचे अभ्यासक्रमही चालविले जातात. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या जोडीने विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या वेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये एम. ए. अप्लाइड लिंग्विस्टिक्स, मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट्स, एम. ए डेव्हलपमेंट कौन्सेलिंग, एम. ए. नॉन फॉर्मल एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, सोशल एक्स्क्लुजन अ‍ॅण्ड इन्क्ल्युजिव्ह पॉलिसी असे वेगळ्या वाटेने जाणारे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. फूड सायन्स अ‍ॅण्ड न्यूट्रिशन, क्लिनिकल न्युट्रिशन्स अ‍ॅण्ड डायटेटिक्स, एक्स्टेन्शन एज्युकेशन, अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन, कम्युनिकेशन मीडिया फॉर चिल्ड्रन, ह्य़ुमन इकोलॉजी अ‍ॅण्ड कम्युनिटी डेव्हलपमेंट, टेक्सटाइल सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅपरल डिझायनिंग या विषयांसाठी एम. एस्सीचे अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये चालविले जातात. विशेष विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आवश्यक असलेला एम. एड. स्पेशल एज्युकेशन हा शिक्षणशास्त्रामधील अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे.

औद्योगिक क्षेत्राच्या नेमक्या गरजा ओळखून विद्यापीठाने मास्टर ऑफ पर्सनल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इंडस्ट्रिअल रिलेशन्स, तसेच जुहू येथील जानकीदेवी बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिजमध्ये बिझनेस कम्युनिकेशन असे वेगळे अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. पदव्युत्तर पातळीवरील या अभ्यासक्रमांच्या जोडीने विद्यापीठाने पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्येही अभिनव पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. इंटिरिअर डिझायनिंग, ज्वेलरी डिझायनिंग, क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स आदी विषयांमधील बी. एस्सीचे अभ्यासक्रम विद्यापीठामार्फत चालवले जातात. भाषांतर, पर्यटन, शालेय समुपदेशन, कम्प्युटर एडेड टेक्स्टाइल डिझायनिंग, हॉस्पिटॅलिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, फूड सव्‍‌र्हिस अ‍ॅण्ड इव्हेंट मॅनेजमेंट, एज्युकेशन मॅनेजमेंट, इन्व्हायर्न्मेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट आदी विषयांमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. करिअरसाठी नव्याने पुढे येणारी क्षेत्रे नेमकेपणाने विचारात घेत विद्यापीठाने ऑप्थॅल्मिक टेक्नोलॉजी, ज्वेलरी डिझायनिंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग अशा विषयांसाठी पदविका अभ्यासक्रमही सुरू केले आहेत.

काळाच्या बरोबरीने चालताना विद्यापीठाने काही वेगळे अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. त्यात मराठी विभागामध्ये पटकथा लेखनाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, चर्चगेटच्या संकुलामध्ये एम. ए. लँग्वेज टीचिंग हा अभ्यासक्रम, तसेच जुहू येथील संकुलामध्ये उपलब्ध असलेला एम. ए. (ई-लìनग) या अभ्यासक्रमांचा समावेश होतो.

योगेश बोराटे – borateys@gmail.com

First Published on January 9, 2018 4:14 am

Web Title: importance of women education