24 February 2019

News Flash

दमदार कारकीर्द घडवा!

एखादा अभ्यासक्रम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे म्हणजे करिअर घडणे नाही.

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे म्हणाले, दमदार कारकीर्द घडवण्यासाठी प्रयत्नशील राहा. ताणाला घाबरू नका तर त्याचा सकारात्मक पद्धतीने सामना करा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

एखादा अभ्यासक्रम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे म्हणजे करिअर घडणे नाही. स्पर्धेत वेगळे काही करताना आपण बहुतेक वेळा वर्षांनुवर्षांचा जुना-पुराणा मार्ग पत्करतो. सगळे एकाच दिशेने विचार करतो. त्यात गैर काहीच नाही. मात्र प्रत्येकाने आपला मार्ग तयार करावा. मात्र एकदा तो निवडला की त्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. वेगळा मार्ग हा कठीण असतो, त्याला तोंड देण्याची तयारी हवी. मग पालकांना त्यासाठी जबाबदार ठरवायचे नाही. कारण वेगळे काही करायचे असे म्हणणे सोपे असते, पण प्रत्यक्षात तसे जगणे कठीण असते. वेगळा मार्ग चोखाळताना तसे कष्टही घ्यावे लागतील हे कायम लक्षात ठेवा. यश मिळवण्यासाठी आपला दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.

मुलांच्या या प्रवासात पालकांनीही काही ठोस भूमिका घेणे आवश्यक असते. मात्र मुलांवर कोणतीही सक्ती करू नये. पालक सतत तक्रारी करत असतात, त्यामागची काळजी स्वाभाविक आहे. तरीही मुलांना प्रयोग करून पाहण्याची संधी दिली पाहिजे. मुलांना मनापासून जे वाटते ते करू द्या. यामध्ये पालकांची भूमिका काय असावी, तर मुले ज्या क्षेत्रात जाऊ  इच्छितात त्या क्षेत्रातील व्यक्ती, जीवनशैली याची जाणीव त्यांना करून द्यावी. काही वेळा पालक मुलांना मोकळीक देतात. कधी कधी मुलांकडूनही काही चुकीचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे मुलांनी जे क्षेत्र निवडले असेल त्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती कोण, त्यातील आव्हाने काय आहेत, कामाचे स्वरूप काय आहे याची जाणीव मुलांना करून देणे हे पालकांचे काम आहे. त्याच वेळी मुलांनीही त्या क्षेत्राची ओळख करून घेणे, त्यातील व्यक्तींना भेटणे हे करताना आपल्याला या क्षेत्रात काम करताना खरेच आनंद मिळणार आहे का? तो कशात मिळणार आहे, हे पाहणेही गरजेचे आहे. हे पाहिल्यावर कधी कधी लक्षात येते की, अरे, आपल्याला या क्षेत्रात जे छान वाटत होते, ते प्रत्यक्षात तसे नाहीये. अशा वेळी पुन्हा नव्याने विचार करणे शक्य होते.

हे सगळे असले तरीही कोणत्याही टप्प्यावर मार्ग बदलणे, यूटर्न घेणे शक्य असते हे लक्षात ठेवा. अनेक अशी उदाहरणे देता येतील की ज्यांनी एका क्षेत्रात शिक्षण घेतले, पण दुसऱ्याच क्षेत्रात काम करत आहेत. पण या सगळ्या प्रक्रियेत एक पथ्य पाळायचे की काहीही अर्धवट सोडायचे नाही. जे हाती घ्यायचे ते काम पूर्ण करायचे. काम पूर्ण करण्यात एक वेगळा आनंद असतो. घाबरून किंवा कंटाळून मार्ग बदलायचा नाही. मुळात कशातही अडचण नसतेच, आपण अडचणीला घाबरतो ही अडचण असते.

करिअरचा मार्ग

आपली आवड आणि क्षमता काय आहे हे लक्षात घ्या. त्यासाठी आवश्यक असल्यास अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट करून घ्या. मात्र सामूहिक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या चाचण्या टाळा.

करिअर करणे आणि अभ्यासक्रम निवडणे यात फरक आहे. कोणत्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे म्हणजे करिअर, फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे म्हणजे करिअर नाही. त्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेची चाचणी करा. त्याचबरोबर कोणत्या मार्गाने तुम्ही शिकू शकता हे पाहा. ऐकणे, वाचणे आणि कृतीतून शिकणे असे तीन प्रकार आहेत. तुम्ही या तीन माध्यमांपैकी कोणत्या माध्यमाचा वापर करून चांगले शिकू शकता हे शोधा.

आपली प्रत्यक्ष बुद्धी हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा. बुद्धी कितीही असू दे, मात्र ती पूर्ण क्षमतेने वापरणे आवश्यक आहे. कंटाळा आला हे कारण देऊन बुद्धीचा वापर होत नसेल तर ते चुकीचे आहे. आपल्याला काय आवडते या प्रश्नाचे उत्तर झोपायला आवडते हे असेल तर तेही नक्कीच चुकीचे आहे. असा चुकीचा तिसरा मुद्दा म्हणजे मोबाइल गेम्स खेळायला आवडणे. बुद्धिमत्ता, आवड या नंतरचा मुद्दा म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व. व्यक्तिमत्त्वामध्ये पाच प्रकार असतात. यात पहिला प्रकार आहे अनुभवाचा. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यायला तुमच्या मनाची तयारी आहे का, तुम्हाला नव्याने विचार सुचतात का, एखादी गोष्ट सांगितल्यानंतर पटकन समजते का, कठीण शब्द आले की मजा येते का, तुमची कल्पनाशक्ती चांगली आहे का हे ओळखणे अपेक्षित आहे. दुसरा प्रकार आहे, व्यवस्थित काम करणे. तुम्हाला दिलेले काम व्यवस्थित करता येत असेल, वेळापत्रक पाळता येत असेल तर तुम्ही करिअरमध्ये दिलेली कामे नक्कीच वेळेत पूर्ण कराल. तिसरा प्रकार आहे, लोकांशी संवाद साधण्याचा. जर तुम्हाला लोकांशी संवाद साधायला आवडत नसेल तर तुम्ही या व्यक्तिमत्त्वाच्या विरोधी आहात. चौथा प्रकार आहे, आपल्या सहकाऱ्यांना समजून घेण्याचा. सहकाऱ्यांना समजून घेण्याची वृत्ती तुमच्यामध्ये असणे हेदेखील करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आपल्यासोबत काम करणाऱ्यांसोबत मनमिळाऊपणे वागणे, हे करिअर घडविण्यात मदत करते. पाचवा प्रकार आहे, लहान गोष्टींचा तणाव मनात येणे. प्रत्येक करिअरमध्ये तणाव असतो, परंतु तो तणाव आपण कितपत झेलू शकतो हे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही ताणाला नियंत्रित करू शकाल तर नक्कीच तुम्ही यशस्वी करिअर घडवू शकता. व्यक्तिमत्त्वाच्या या पाच प्रकारांपैकी आपण कोणत्या प्रकारात बसतो, याचा विचार करा. यातला कोणताही प्रकार वाईट किंवा चांगला नाही. किंबहुना मानसशास्त्रात चांगले किंवा वाईट असे काही नाहीच. एखादी गोष्ट आपल्याकडे आहे किंवा नाही यात चांगले किंवा वाईट असे काही नसते. जे नसेल ते विकसित करणे हा यातील मुद्दा आहे.

व्यक्तिमत्त्व, क्षमता, कामातील आनंद ओळखला तर यशाचा मार्ग नक्की सापडतो. आपल्यातल्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करा.

First Published on June 13, 2018 1:01 am

Web Title: loksatta marg yashacha 30