डॉ. अमृता इंदुरकर

गोलंदाज

‘झहीर खान, इरफान पठाण, आशीष नेहरा, लसित मलिंगा, जॅक कॅलिस, ब्रेट ली हे सर्व खेळाडू तोफ डागण्याचे काम करतात.’ हे वाचल्यावर कोणालाही हे वाक्य चुकले आहे असे वाटेल. कारण सर्वानाच माहिती आहे की हे सर्व खेळाडू तोफ डागण्याचे काम करीत नाहीत तर गोलंदाजी करतात. पण खरे तर वाक्य कुठेही चुकले नाही. अर्थानुसारदेखील अगदी बरोबर आहे. फक्त हा अर्थ थोडय़ा जुन्या काळातला आहे. गोलंदाज हा शब्द ‘गोलन्दाझ्’ या मूळ पुल्लिंगी फारसी शब्दावरून तयार झाला आहे. ज्याचा खरा अर्थ आहे तोफ डागण्याचे काम करणारा किंवा तोफची. युद्धकाळात तोफगोळा फेकणाऱ्याला गोलंदाज म्हटले जात असे.

आता मात्र जे गोलंदाजी करतात ते तोफेचा गोळा न फेकता चेंडू फेकतात, हेच परिवर्तन झाले, असेच म्हणावे लागेल.

बिलंदर

‘तो तर फारच बिलंदर निघाला!’ किंवा ‘तो महाबिलंदर माणूस आहे बरं; त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू नकोस.’ मराठीत बिलंदर हा शब्द धूर्त, लफंगा, पक्का, अट्टल, ठकबाज इत्यादी अर्थच्छटांनी वापरला जातो. पण ज्यावरून या अर्थच्छटा रूढ झाल्या ते मूळ कारण मात्र निराळे आहे. खरे तर मूळ फारसी शब्द आहे बलन्द्; बुलन्द्. शिवकालीन मराठीत त्याचे बिलंद झाले. बिलंद चा खरा अर्थ आहे उंच, दुर्गम, अथांग.बखरींमध्ये, पत्रव्यवहारांमध्ये या अर्थाचे बरेच उल्लेख आढळतात. जसे – ‘अशीरगड किल्ला, मातबर बिलंद आहे’  किंवा  ‘या जागी बिलंद किल्ला बांधून वसवावा.’ यावरून हे स्पष्टच होते की, जे चढण्यास, सर करण्यास, आकलन होण्यास, अंदाज येण्यास अतिशय कठीण आहे अशा बांधकामाला बिलंद म्हटले जात असे. पुढे चढाई करण्यास कठीण असलेल्या गोष्टीसाठी बिलंदर हा शब्द वापरला जाऊ  लागला.  जसे- ‘पहाडी किल्ला असा एका दिवसात यावा असे काही नाही; किल्ला फार बिलंदर!’ यावरूनच पुढे एखाद्या अट्टल, पक्क्या, चिवट पण तितक्याच ठकबाज, धूर्त व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी बिलंदर ही शब्दप्रतिमा वापरली जाऊ  लागली. तर दुसरीकडे सकारात्मक अर्थाने मुख्य, प्रधान, श्रेष्ठ किंवा अतिशय चतुर, हुशार व्यक्तीसाठीदेखील वापरला जातो. शब्दकोशामध्ये या तिन्ही अर्थविस्तारांची नोंद आहे.